Halloween party ideas 2015


सेवानिवृत्ती........
एका उपक्रमशील मुख्याध्यापकाची : प्रा.बी.एन.चौधरी.....!

(संकलन : बी आर महाजन सर)

शिक्षकापासून ते मुख्याध्यापकांपर्यंत विविध पदे कार्यकुशलतेने भुषवून, त्यावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवून ३४ वर्ष सेवा बजावणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे धरणगाव येथील पी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक प्राध्यापक बी एन चौधरी. सर आज ३० जून रोजी सेवा निवृत्त होत आहेत. त्यानिमीत्त त्यांच्या कार्याचा आढावा आपल्या समोर मांडतांना मला आनंद होत आहे.
२३ जून १९६२ रोजी जन्मलेले बी एन चौधरी सर अर्थात भटू नारायण चौधरी धरणगाव येथील एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेले परंतु आई आणि वडील यांच्या सुसंस्कृत संस्काराने वाढलेले चौधरीसर यांचे शिक्षण एम एस्सी बी एड,एम ए (मराठी),डी सी एम झाले आहे. सरांची नोकरीला सुरुवात २३ सप्टेंबर १९८८ साली धरणगांव येथे ज्युनिअर प्राध्यापक म्हणून झालीं.
सरांची एकूण सेवा ३४ वर्षात २ वर्ष ज्युनिअर प्राध्यापक, २२ वर्ष माध्यमिक शिक्षक, ७ वर्ष पर्यवेक्षक,१ वर्ष उपमुख्याध्यापक व शेवटी २ वर्ष मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवे बरोबर गोर गरीब तसेच तळागाळातील विद्यार्थ्यांच्या प्रगती बरोबरच आपल्यातील छंदाना जोपासत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सरांनी लेखक कवी पत्रकार व्यंगचित्रकार व समीक्षक अश्या विविध क्षेत्रांत आपला कार्याचा ठसा उमटवलेला दिसुन येतो. संपूर्ण महाराष्ट्र हे त्यांचे कार्यक्षेत्र झाले असून त्यांना मानणारा व त्यांचेवर निखळ प्रेम करणारा मित्रांचा एक मोठा गोतावळा आहे.
आज खान्देशामध्ये बोटावर मोजता येणारे रसिकमान्य कवी आणि साहित्यिक आहेत त्यामध्ये बी एन चौधरी सरांचा स्थान सर्वोच्च दिसून येते. सरांनी लेखन क्षेत्रात "ह्याला जीवन ऐसे नाव" हा ई-बुक कथासंग्रह संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेला आहे. यामध्ये एकूण एकूण ४० कथा असून या ई बुक कथासंग्रहाचे ३,४०,००० वाचक आज दिसून येत आहेत. सरांच्या "बंधनमुक्त" काव्यसंग्रह, "उध्वस्त" कथासंग्रह, "काव्य गंध" समीक्षा संग्रह यात १५० कवी, कवितांचे दैनिकातील सदर एकत्रित केलेले आहे. तसेच संपादन सहाय्य म्हणून लोकसंख्या शिक्षण हस्तपुस्तिका, त्यांच्या शाळेची परानंद" शताब्दी महोत्सव स्मरणिका तयार केली आहे. एवढेच नाही, तर स्वर्गीय मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे व्यंगचित्रकलेतील प्रतिष्ठेचा "मार्मिक" व्यंगचित्रकार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सरांना गौरवण्यात आलेले आहे. त्याच बरोबर राज्यस्तरीय बहिणाबाई काव्य पुरस्कार, काव्य दिंडी राज्य पुरस्कार ,सुवर्णयोग राज्य पुरस्कार, काव्य साधना राज्यपुरस्कार, भावना राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, मालन राज्यस्तरीय कथा पुरस्कार, लोकसंख्या शिक्षण राज्य पुरस्कार, यशवंत युवा गौरव राज्य पुरस्कार, आचार्य अत्रे व्यंगचित्रकार पुरस्कार, जि प आदर्श शिक्षक शिक्षक पुरस्कार दोन वेळा, दादाजी कोंडदेव राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकमत दिवाळी अंक २०१४,२०१५,२०१७ चे काव्य पुरस्कार, खान्देश रत्न पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, पूज्य साने गुरुजी पुरस्कार, दर्पण सदर लेखन पुरस्कार ,तापी-पूर्णा काव्य पुरस्कार असे असंख्य पुरस्कार देऊन सरांना गौरवण्यात आलेले आहे.
सरांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक शिक्षकांच्या शैक्षणिक साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार जवळपास पाच वेळा मिळवलेले आहेत. असा विक्रम करणारे जिल्ह्य़ातील एकमात्र विज्ञान शिक्षक आहेत. त्यांनी सी. सी. आर. टी. या नवी दिल्ली या केंद्रीय प्रशिक्षण संस्थेद्वारा नवी दिल्ली, उदयपूर हैदराबाद येथे विविध कलांसंदर्भात प्रशिक्षण घेतले आहे. एस. सी. ई. आर. टी. पुणे या प्रशिक्षण संस्थेतही अनेक नवोपक्रम राबविले आहेत, अखिल भारतीय अहिराणी, मराठी साहित्य संमेलनात सहभाग, व्यंगचित्रकार संमेलनांना उपस्थिती, आकाशवाणी दूरदर्शन बालचित्रवाणी, ई टीव्ही, स्टार माझा वर मुलाखती आणि महाराष्ट्रातील अनेक दिवाळी अंकांमध्येसुद्धा सरांनी आपले कविता, लेख प्रकाशित झाले आहेत.
सरांचा अनेक साहित्यिकांशी स्नेह संबंध आहे. त्यांना आपल्या कार्यकाळात अनेक मान्यवरांचे शुभेच्छा पर संदेश पत्रसुद्धा प्राप्त आहेत त्यामध्ये देशाचे माजी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा, प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव ,शरदचंद्रजी पवार माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक, तसेच जवाहरलालजी दर्डा, राजेंद्रजी दर्डा, वि वा शिरवाडकर, पु ल देशपांडे, जगदीश खेबुडकर, मंगेश पाडगावकर ,गंगाधर पानतावणे, बाबा महाराज सातारकर, भीमराव पांचाळे, विकास सबनीस ,वसंतराव सरवटे या मान्यवरांचे आशीर्वाद व शुभेच्छा पत्रही सरांना मिळालेली आहेत.
सरांचे विशेष कार्य म्हणजे महाराष्ट्रात शंभरावर ठिकाणी लोकसंख्या विस्फोट व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन. प्रत्येक जिल्ह्यात या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. महाराष्ट्र शासनाने याची विशेष दखल घेतली होती. वृत्तपत्रांमधून त्यांची चिमटे, शाब्बास पठ्ठे, अहो ऐकलत का, किरण जात, भेळपुरी या व्यंगचित्र मालिका प्रचंड लोकप्रिय झालेल्या आहेत, खानदेशातील १५० कवींच्या कवितेची दैनिक देशदूतच्या काव्यगंध सदरातून समीक्षण केले आहे. प्रौढ साक्षरांसाठी पाच कथा पुस्तकांचे लेखन केले आहे. किशोर जीवन, शिक्षण लर्न मोअर, शिक्षण संक्रमण या शैक्षणिक मासिकातून सुद्धा सातत्याने सरांचे लेखन दिसून येते.
सरांचे शैक्षणिक क्षेत्र बरोबर सामाजिक क्षेत्रात सुद्धा उल्लेखनीय कार्य दिसून येते. त्यामध्ये विशेष कार्यकारी अधिकारी, धरणगाव येथील झुमकराम सार्वजनिक नगरपालिका वाचनालय अध्यक्ष, तसेच साहित्य कला मंच धरणगावचे अध्यक्ष, स्वर्गीय जिभाऊ स्मृती प्रतिष्ठान धरणगावचे अध्यक्ष, बहिणाबाई प्रतिष्ठान भडगावचे सचिव म्हणून आजही कार्यरत आहेत.
माझ्या पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात सुरुवातीला विज्ञान प्रदर्शनाचे मार्गदर्शन मला सरांकडूनच मिळालेले आहे. मी आज पर्यंत तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शन, इंस्पायर अवार्ड प्रदर्शन व तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम काम करीत असलो तरी या यशात सरांचा सिंहाचा वाटा आहे. मला सुरुवातीचं मार्गदर्शन सरांनी दिल्यानेच मी आज या ठिकाणावर पोहचलो आहे. मला जे काही तुटपुंजे यश प्राप्त झाले आहे त्यात सरांचा उल्लेख करणं माझं कर्तव्य आहे. म्हणूनच माझे मार्गदर्शक बी एन चौधरी सर आज सेवानिवृत्त होत असतांना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ दाटला आहे. सरांना आपल्या ज्ञानाचा अहंकार नाही, पदाचा गर्व नाही, पुरस्कारांचा डामडौल नाही. अश्या अष्टपैलू,आदर्श व्यक्तिमत्वाला उर्वरित आयुष्य सुखाचे, समाधानाचे व भरभराटीचे जावो अशी मी प्रभू चरणी प्रार्थना करतो.

संकलन :- श्री बी आर महाजन
(उपशिक्षक : अनोरे हायस्कूल, ता.धरणगांव)
उपाध्यक्ष : धरणगांव तालुका माध्यमिक शिक्षक संघ.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.