मुंबई प्रतिनिधी
- जुनी पेन्शन योजनेत अभ्यासगट स्थापन करुन काही होणार नाही तो पळपुटेपणा आहे असा आरोप करतानाच नवीन अध्यादेश काढून शिक्षकांना पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत केली.
जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज विधानसभेत लावून धरला.
जे निर्णय सरकार घेते ते निर्णय समाजाच्या भल्यासाठी नसतील तर आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. नवीन कायदा करायचा असेल तर आणि त्यात कोर्टाचा अवमान होवू नये असे असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत असेही अजितदादा पवार म्हणाले.
मागच्या काळात होतं हे सांगणं बंद करा. आमच्याकडून राहून गेलं म्हणून आम्हाला इकडे बसवलं व तुम्हाला तिकडे बसवलं आता हे काढायचं बंद करा असा टोला लगावतानाच आता काळ तुमचा आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमच्या हातात दिलं आहे तर लोकांची कामे करा असा सल्लाही अजितदादा पवार यांनी दिला.
शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक आहे. शिक्षक नवीन पिढी घडवण्याचे काम करतात म्हणून त्यांना पेन्शन मिळायला हवी अशी मागणी केली.
सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना पुर्ण पगारावर घेतलं असतं कुठलंही सरकार असलं तरीही पेन्शन द्यावीच लागली असती असेही अजितदादा पवार म्हणाले.
आज अधिवेशन संपत आहे. विधी न्याय खात्याशी चर्चा करुन करा परंतु अभ्यासगट काही करु शकणार नाहीत. पळवाट काढण्याऐवजी तुम्ही सभागृहात शिक्षकांना पेन्शन योजना लागू करु असा शब्द द्या अशी मागणीही अजितदादा पवार यांनी केली.