*शाळेत बोलविण्याच्या हट्टापायी शिक्षक कोरोनाच्या विळख्यात- अनिल बोरनारे यांचा आरोप*
शिक्षकांना शाळेत बोलावू नका- भाजपा शिक्षक आघाडीची मागणी
मुंबई (प्रतिनिधी) वर्क फ्रॉम होम असूनही मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात शिक्षकांना शाळांमध्ये विनाकारण बोलाविण्यात येत असल्याने अनेक शिक्षक कोरोनाच्या विळख्यात सापडत असून राज्यात काही ठिकाणी शिक्षकांचा मृत्यूदेखील झाला असून प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत शिक्षक-शिक्षकेतरांना शाळेत बोलावू नका अशी मागणी मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी आज मुंबईच्या शिक्षण उपसंचालक व शिक्षण निरीक्षकांकडे केली आहे.
याबाबत अनिल बोर नारे यांनी आज पुन्हा मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक व उत्तर, पश्चिम व दक्षिण विभागाच्या शिक्षण निरीक्षकांना निवेदन पाठविले आहे.
कोरोनाच्या काळात प्रत्यक्ष शाळा भरविणे शक्य नसल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत. दि २४ जूनच्या परिपत्रकानुसार वर्क फ्रॉम होम ची सवलत देण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत महिला शिक्षक, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार व ५५ वर्षांवरील पुरुष शिक्षकांना शाळेत बोलावू नये अशा सूचना परिपत्रकात दिल्यावर सुद्धा अनेक ठिकाणी विनाकारण शाळेत बोलविण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे शिक्षकांना आर्थिक, मानसिक त्रास होत असून कोरोना संसर्गाची भीती वाटत आहे. तर राज्यात अनेक ठिकाणी शिक्षक-शिक्षकेतर कोरोना संक्रमण होऊन मृत्युमुखी पडत आहेत.
२४ ऑगस्ट रोजी याबाबत अनिल बोर नारे यांनी शिक्षण उपसंचालक व शिक्षण निरीक्षकांना निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोपही बोरनारे यांनी केला असून तातडीने शिक्षण उपसंचालकांनी मुंबई विभागातील शिक्षण निरीक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करून शाळांना तसे आदेश द्यावेत असेही पत्रात नमूद केलं असल्याचे भाजपा शिक्षक आघाडी मुंबई विभागाचे सह संयोजक सचिन पांडे, सुभाष अंभोरे, बयाजी घेरडे व विजय धनावडे यांनी सांगितले.