Halloween party ideas 2015


पावले चालती पंढरीची वाट-आषाढी एकादशी निमित्त टाकलेला प्रकाश.

पंढरपूरचा वारी सोहळा हे जसे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभव आहे. तसेच ते भक्तीतत्त्वाच्या सामाजिकतेचे लोकवैभवही आहे. वारी म्हणजे भक्तीचे सामाजिकीकरण. संपूर्ण वारी सोहळा हा पंढरपूरचा श्रीविठ्ठल आणि विठ्ठलभक्त यांच्या भोवती गुंफला गेला आहे. ही गुंफणही ज्ञान आणि भक्तीच्या धाग्यांना साधणारी आहे.
आषाढी वारी (पंढरपूर)म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय.वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी होय.या वारीमध्ये अनेक जातीधर्माचे लोक तसेच मराठा, महार,लिंगायत व इतर जातींचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी हा एक आनंद सोहळा असतो.ही वारी महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन आषाढी एकादशीला पंढरपूर येथे संपते.ही वारी महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन वेळा होते. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.
संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होते. वारकरी संप्रदायात भेदभाव केला जात नाही. नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजे "वारी"होय.आणि जो नियमित वारी करतो तो "वारकरी" .हे वारकरी जो धर्म पाळतात त्याला "वारकरी धर्म"असे म्हणतात.
"पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान आणिक दर्शन विठोबाचे"या इच्छेपोटी वारकरी कधीही वारी चुकवत नाही. त्यामुळे आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला आणि पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानतात.हे वारकरी भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाचे भक्त आहेत. आपले कर्तव्यकर्म निष्ठेने करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ घालतात.या माळेचा जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय,ती गळ्यात घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो.स्नान करून भाळी गोपीचंदनाचा टिळा लावावा. नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा.संतांचे ग्रंथ वाचावे, देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे. भजन कीर्तनात सहभाग घ्यावा. पंढरपूरवारी आणि एकादशीचा उपवास करावा. त्याशिवाय सात्विक आहार, सत्वाचरण करावे, परोपकार आणि परमार्थही करावा. जीवनातील बंधनातून, मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे, नामस्मरण करावे असा साधा परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे.
वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। असा जयघोष केला जातो.
पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा खूप जुनी आहे.तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचा उल्लेख आढळतो.संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्याचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आहे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातीच्या समाजाला एकत्रितपणे या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा पुढे चालवली. तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती.आषाढी वारीला सर्व संतांच्या पालख्या आपापल्या गावाहून पंढरपूर येथे येतात. आणि याच पालख्या पुन्हा कार्तिक वारीला पंढरपूरहून पुन्हा आपापल्या गावी जातात.हैबतबाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.त्यांनीच आळंदीतून ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी-समारंभासह ऐश्वर्याने आणि सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा सुरू केली. तिला आज आणखी वैभव प्राप्त झाले आहे.या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती, घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब(औंध)यांच्याकडून येत. या खर्चास साहाय्य त्या त्या वेळचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असे. पुढे कंपनी सरकारचा(इंग्रज) अंमल सुरु झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे.यासाठी सरकारने इ.स.१८५२ साली पंचकमिटीची स्थापना करुन त्यांच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीची व्यवस्था केली.तुकाराम महाराज स्वतः चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीला पंढरपूराला जात असत.तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रुपांतर पालखी सोहळ्यात केले. त्यांनी वारीची परंपरा पण चालू ठेवली आणि देहू देवस्थानाचा सर्वागीण विकास आणि वाढ दोन्ही केले.या पालख्यांबरोबर निवूत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, सावता माळी यांच्या पालख्या पंढरपूरात येतात.या वारीत लाखो भाविक सहभागी होतात.आणि ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात, अभंग म्हणत,रिंगण आणि पारंपरिक खेळ खेळत पालख्या पंढरपूरला जातात.वारीला जाणाऱ्या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी असते. प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो आणि तो स्त्री किंवा पुरुष या दोन्हीपैकी एक असतो. काही धार्मिक संस्थाने, मंदिरे यांच्या दिंडयाही वारीत सामील होतात. वारकरी मंडळींची भोजन व्यवस्था ,निवास आणि अन्य सुविधा या दिंडीमार्फत केली जाते. या दिंडयाची नोंदणी झालेली असते आणि यांना दिलेल्या क्रमांकाने रथाच्या पुढे आणि पाठी मार्गस्थ होतात .हा एक शिस्तीचा भाग असल्याचे मानले जाते.
वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचे एक वैशिष्ट्य आहे. कडूस,फाटा, वेळापूर आणि वाखरी असे रिंगण असून ही एक पवित्र संकल्पना आहे. मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो.याला आदराने "माऊलीचा अश्व"म्हणतात.या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरुढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे.वारीत रिंगणाला जसे महत्त्व आहे तसे धावा म्हणजे धावणे याला महत्त्व आहे. असे मानले जाते की पंढरपूरला पायी जाताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्या टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या ओढीने ते तेथून पळत पंढरपूर पर्यंत पळत गेले.याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूर ते पंढरपूर हा शेवटचा टप्पा धावत जातात.
वारीला जाणाऱ्या वारकरी समुदायाची सेवा वेगवेगळ्या संस्थेमार्फत होते. काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर अशी सेवा पुरवितात. ज्यात वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरविणे, पाण्याची व्यवस्था, कपडे पुरविणे या गोष्टीचा समावेश असतो. तसेच वैद्यकीय संस्था, रुग्णालये वारकरी भक्तांच्या शारिरिक चाचणी आणि उपचाराची काळजी घेतात. तसेच पालखी मार्गाची पाहाणी करणे, रस्त्याची स्वच्छता ,वैद्यकीय सेवा, पिण्याचे पाणी याची व्यवस्था महाराष्ट्र शासनाने करते.

आज कोरोनाच्या संकट आल्याने इतक्या वर्षांची वारीची परंपरा खंडित झाली .परंतु पुन्हा नव्या जोमाने आणि नावीन्यपूर्ण पालखी सोहळा आणि वारी होईल ही आशा करुया. आधुनिक संगणक युगात ही वारीची परंपरा समाजातील सर्व स्तरांतील लोकांचा आस्थेचा विषय आहे.वारीची परंपरा पुढच्या पिढीला माहिती व्हावी यासाठी शालेय स्तरावर वारीचे आयोजन केले जाते. विद्यार्थी वारकरी पोशाख घालतात, पालखी सोहळा होतो. आता शहरी भागातील शाळासुद्धा अशा प्रकारचे आयोजन करून विद्यार्थ्यांना पालखीचे महत्त्व पटवून देतात.
आजच्या आधुनिक काळात सुद्धा पालखी आणि वारीची परंपरा सुरु आहे आणि यापुढे येणाऱ्या अनेक काळात सुद्धा ही परंपरा अशीच अखंडित राहील.
आज "डॉक्टर डे"पण आहे. आज कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, सफाई कामगार हे दिवसरात्र झटत आहे ."डॉक्टर डे" आणि "आषाढी एकादशी"हे एकाच दिवशी येणे हा विलक्षण योगायोग आहे.

लेखिका,
अमिता कदम,
प्राध्यापिका,
(Venus world school ,Hadsper )
पुणे,
9819395788.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.