Halloween party ideas 2015


एकदिवसीय सामन्यातील पहिल्या हॅट्रीकची कहाणी

५ जानेवारी १९७१ रोजी जगातला पहिला एकदिवसीय सामना झाला. त्यानंतर एकदिवसीय सामन्यातील पहिली हॅट्रीक २० सप्टेंबर १९८२ रोजी झाली. वनडेतील पहिली ऐतिहासीक हॅट्रीक घेण्याचा मान मिळविला तो पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज जलालुद्दीन याने. एकदिवसीय सामन्यांना सुरुवात झाल्यानंतर तब्बल १५८ सामन्यानंतर हि ऐतिहासिक हॅट्रीक झाली.
सन १९८२ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना वनडे मालिकेतील हैद्राबाद येथील पहिल्या सामन्यात संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज इम्रान खान दुखापतीमुळे संघाबाहेर गेला. कर्णधार झहीर अब्बासने श्रीलंकेविरुद्ध एक वनडे सामना खेळून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या जलालुद्दीनला संघात संधी दिली. त्यापूर्वी मार्च १९८२ मध्ये श्रीलंकेविरूध्द आपल्या वनडे करिअरची सुरूवात करणाऱ्या जलालुद्दीनने ५ षटकात १४ धावा दिल्या होत्या मात्र बळींची पाटी कोरीच राहीली होती. त्या काळी पाक संघात जलदगती गोलंदाजांची फौजच असल्याने त्या सामन्यानंतर तो संघाबाहेरच होता. मात्र हैद्राबादच्या त्या सामन्यात त्याला संधी मिळाली व त्याने ऐतिहासीक चमत्कार करून दाखविला.
हैद्राबादच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले. त्या काळी वनडे सामने प्रत्येकी ४० षटकांचे असल्याने पाकने आपल्या निर्धारीत ४० षटकात ६ बाद २२९ धावा बनविल्या. त्यामध्ये सलामीवीर मोहसिन खानच्या शानदार शतकाचा (१०४ धावांचा) समावेश होता.
   २३० धावांच्या विजयी लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात झकास झाली. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी १०० मिनिटात १०४ धावा बनवून विजयाकडे कूच केली असतानाच पाकचा ऑफस्पिन गोलंदाज तौसिफ अहमदने दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखविला. त्यानंतर कर्णधार किम ह्यूजही आल्या पावली परतल्याने कांगारूंच्या गोटात खळबळ माजली. एलन बोर्डर व जॉन डायसनने खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न केला. परंतु एका मागोमाग एक तीन गडी झटपट बाद झाल्याने धावगती मंदावली व ऑस्ट्रेलियावरचा दबाव वाढायला लागला.
               बॉर्डर - डायसनची चौथ्या गडयासाठी ४८ धावांची भागीदारी झाली होती. ती गोष्ट पाकसाठी चिंतेची बाब ठरतेय असे दिसताच कर्णधार झहीर अब्बासने चेंडू सहा महिन्याने संघात परतलेला व आपला दुसराच सामना खेळत असलेल्या जलालुद्दीनच्या हाती सोपविला. त्याच षटकात जलालुद्दीनच्या एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडण्याचा एलन बॉर्डरचा प्रयत्न अंगाशी आला. बॅटची किनार चाटून गेलेला चेंडू यष्टीरक्षक वासिम बारीच्या हाती जाऊन स्थिरावला व बॉर्डर बाद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावालाही गळती लागली.
                जलालुद्दीनने आपले सातवे षटक सुरू केले, त्यातील पहिले तीन चेंडू निर्धाव गेले. चौथ्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज रॉडनी मार्श त्रिफळाबाद झाला. पाचव्या चेंडूवर ब्रुस यार्डलीचा झेल यष्टीरक्षक वासिम बारीने टिपला तर सहाव्या चेंडूवर जलालुद्दीनने जेफ लॉसनलाही त्रिफळाचित करून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिली हॅट्रीक आपल्या नावे कोरली.
               जलालुद्दीनने आठ षटकांच्या भेदक माऱ्यात एक षटक निर्धाव टाकताना ३२ धावात ४ महत्वपूर्ण बळी घेऊन कांगारुंना १७० धावात गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. परिणामतः कांगारूंना ५९ धावांनी सामना गमवावा लागला.
                आजच्या जमान्यात प्रत्येक विक्रमाची खडा न् खडा माहीती प्रेक्षक, खेळाडू, समालोचक व धावलेखकांना असते. मात्र त्या काळी वनडे सामन्यांना आजच्या इतकी लोकप्रियता नसल्याने त्यावेळी घडणारे विशेष पराक्रम - विक्रम कोणाच्या खिजगणतीतही नसायचे. अगदी तोच प्रकार या हॅट्रीकच्या बाबत घडला. जलालुद्दीनने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सलग तिन चेंडूवर तीन बळी घेवून पहिली हॅट्रीक नोंदवली याची मैदानात उपस्थित असलेल्या कोणालाच पुसटशीही कल्पना नव्हती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काही तज्ञांनी विक्रमांचे पुस्तक चाळल्यानंतर त्यांना हा ऐतिहासिक चमत्कार झाल्याचे समजले. त्यानंतर गोलंदाज जलालुद्दीनने आपला आनंद हॅट्रीक घेतल्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला.
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.