वेतन पथक माध्यमिक जळगावचा भोंगळ कारभार, ९१ लाख रुपयांचे डबल वाटप ..
चौकशी करून कारवाई करण्याची जळगांव माध्यमिक संघटनेचे सेक्रेटरी शालीग्राम भिरूड यांची मागणी
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जळगाव जिल्ह्यातील अनुदानित माध्यमिक शाळांचे वेतन व भविष्य निर्वाह निधी बाबत कार्यवाही करण्यासाठी असलेल्या वेतन पथक कार्यालयाचा भोंगळ कारभार जिल्हा सहकारी बँकेच्या सतर्कतेमुळे
चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील सहा सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना दिनांक ४ जुलै रोजी ९१ लाख रुपये भविष्य निर्वाह निधी पोटी अदा करण्यात आलेले होते. याच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पुन्हा २२ जुलै
रोजी ९१ लाख रुपये जमा करण्याबाबत धनादेश जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्यात आला. जळगाव शहरातील दगडी बँकेतील कर्मचाऱ्याने सदर धनादेशातील रक्कम एका शिक्षकाच्या खात्यावर जमा
करत असतांना ही बाब लक्षात आल्याने जिल्हा बँकेत मुख्य शाखेत चौकशी केली असता वेतन पथकामार्फत डबल देयक कोषागारातून मंजूर करून ही रक्कम कोणतीही खात्री किंवा तपासणी न
करता वेतन पथकातील लिपिक किर्ती पाटील, सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर , तत्कालीन अधिक्षक स्वाती हवेले यांनी दोन वेळा सदर रकमा बँकेत जमा केल्या असल्याचे निदर्शनास आले. तेव्हा वेतन पथकात तातडीने हालचाली सुरू झाल्या व याबाबत बँकेस पत्र देण्यात आले असल्याचे कळते.एकीकडे देशात व राज्यात करोना संकटामुळे भिषण आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली असताना राज्य कर्मचाऱ्यांचे वेतनासाठी कठीण परिस्थितीतून तरतुद करीत आहे. शिक्षकही याबाबतीत शासनास सहकार्य करीत आहे. आणि अशा परिस्थीतीत बेजबाबदार कर्मचारी व अधिकारी दोन वेळा
रकमा पारित कसे करतात? हे कळत नाही . या मागे संगनमत करून अपहार करण्याची योजना तर नसावी अशी शंका येते. याबाबतीत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची विभागीय चौकशी व्हावी
अशी मागणी जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी व माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरूड यांनी केली आहे.