Halloween party ideas 2015


अंधश्रद्धा-समाजातील विघातक सत्य.

समाजामध्ये अनेक रुढी-परंपरा आपण नेहमी जपत असतो. माणसाने नेहमी श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नसावी हे एक साधेसरळ गणित आहे.जून महिना सुरु झाला की सणवाराची सुरुवात होते. आणि प्रत्येक महिन्यात एकतरी सण येतो. या निमित्ताने उपवास आणि दानधर्म केले जाते. परंतु दानधर्म करताना खूप वेळा असे होते की समोरच्या व्यक्तीला त्याची आवश्यकता नसताना दानधर्म केले जाते.आणि ज्याला खरोखर आवश्यकता आहे अशी व्यक्ती समोर असूनही त्याचा विचार आपल्याला येत नाही,हे एक कटू सत्य आहे.आपल्या आसपास अनेक लोक असतात मग ती आपल्याकडे काम करणारी मावशी असो किंवा आपल्या आसपास अनेक अशी माणसे आहेत त्यांना खरोखर मदतीची गरज असते .आपण आपल्या परंपरा जपतो पण त्याचा उपयोग कितपत होतो हे पाहणे आवश्यक आहे. फक्त कोणी तरी सांगते किंवा पिढीजात हे चालू आहे. म्हणून करायचे हे कितपत योग्य आहे.
आजच्या या धावपळीच्या जीवनात सुद्धा अनेक लोक त्या परंपरा नियमित जपतात,ही एक चांगली गोष्ट आहे परंतु हे करत असताना स्वतः ला त्रास होत नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. समजा एखादी आजारी व्यक्ती आहे. आणि तिला तिच्या घरचे आणि डाँकटर उपवास करण्यास मनाई करुनसुदधा फक्त परंपरा मोडू नये किंवा इतके वर्ष आपण उपवास करत आलो आहोत आणि आताच फक्त आजारामुळे उपवास मोडावा लागतो म्हणून उपवास करण्याचा हट्ट हा सुद्धा अंधश्रद्धेचा भाग आहे.
स्त्रिया घरी राहणाऱ्या असो किंवा बाहेर जाऊन काम करणाऱ्या असो त्यांना बरीच कामे असतात. बाहेर काम करणाऱ्या स्त्रियांना तर घर आणि बाहेरची जबाबदारी सांभाळावी लागते.मग रोजच्या या ताणताणवात तिने आपले आरोग्य,मन:स्थिती, आजूबाजूचे वातावरण याची तर काळजी घेणे किती आवश्यक आहे आणि नेमकी याच गोष्टीकडे दुर्लक्ष होते.फक्त हजारो वर्षांपासून ही परंपरा चालू आहे म्हणून आपण ते करावे पण यापेक्षा आपल्या हे योग्य वाटते म्हणून मी आपण ते करतो,यात समाधान असणे आवश्यक आहे.घरामध्ये स्वतःला
सुद्धा महत्त्व दिले पाहिजे.नको त्या गोष्टीचा ताण घेऊ नये.काही वेळा फक्त अट्टाहासामुळे आपल्यामुळे इतरांनाही त्रास होतो. म्हणून रुढी-परंपरा जपताना स्वतः ला जपणे हे प्रत्येक स्त्रीने केले पाहिजे.
आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता तिचा स्वीकार करणे ही सुद्धा एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. काळी जादू, तंत्र-मंत्र,जादूटोणा, नरबळी, भूत-प्रेत ,पिशाच्च या संबंधित अंधविश्वास आणि अफवा पसरवणे आणि प्रत्यक्ष कृती करताना इतर प्राण्यांना त्याचा त्रास होणे हे सर्व अंधश्रद्धेचे प्रकार आहे.आणि भारतात याचे परिणाम जास्त आहे, याला लोकांचा अशिक्षितपणा, एखाद्या गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास यासारखे अनेक घटक जबाबदार आहेत, आणि यात काहीवेळा सुशिक्षित लोकांचा सुद्धा समावेश असतो ही खरंच दुदैवाची गोष्ट आहे,आणि यामुळे भारतदेश किती तरी मागे गेलेला पाहायला मिळतो.
व्हँटिकनमध्ये "एक्साँरसिजम"नावाचा भूत उतरवण्याचा कोर्स शिकवला जातो आणि याची सुरुवात२००५ साली झाली.
समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक वूत्तीकडून होणारे शोषण थांबावे यासाठी २०१३ साली महाराष्ट्राने एक कठोर कायदा केला,व त्याला "महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा निवारण आणि उच्चाटन कायदा २०१३"असे संक्षिप्त नाव देण्यात आले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा मान्य करावा लागला.२६ आँगस्ट २०१३ पासून महाराष्ट्रात हा कायदा अंमलात आणला आणि आज तो "अंधश्रद्धा निर्मूलन कायदा"म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जेथे हा कायदा अस्तित्वात आहे परंतु या कायद्याची अंमलबजावणी अजूनही हवी तशी होताना दिसत नाही.
व्यावहारिक जीवनात पण तसेच सर्वसामान्यपणे श्रद्धा ही बेसिक चिकित्सा करून ठेवली जाते परंतु ज्यावेळी ही बेसिक चिकित्सा पण होत नाही तेव्हा ती अंधश्रद्धा होते.उदा-आपल्याकडे जे पैसे आहे त्याचे दुप्पट करून देईन असे जो सांगतो त्यावर आपला लगेच विश्वास बसणे हा अंधश्रद्धेचा भाग आहे. आणि दुदैवाने काही वेळा लोक याला बळी पडतात.महाराष्ट्रात या कायद्यावरुन विरोधाभास दिसून येतो. परंतु श्रद्धा आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचे?या प्रश्नाचे उत्तर सोप नाही. मुळात अतिश्रद्धा ही अंधश्रद्धा आहे.
महाराष्ट्र पूर्वीपासून अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला होता. आधी संतांनी वेगवेगळ्या प्रवचनातून समाज प्रबोधन करून अंधश्रद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळात समाजसुधारकांनी यासाठी प्रयत्न केला,परंतु हवी तशी सुधारणा अजूनही झाली नाही.
आज बदलत्या काळात सुद्धा अंधश्रद्धा कमी झाली नाही याला लोकांच्या मनात असलेली भापक कल्पना, दुसऱ्याबद्दल असलेली वाईट आणि नकारात्मक वूत्ती ,आणि समाजातील एका विशिष्ट गटाकडून अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार या गोष्टी जबाबदार आहेत आणि या जोपर्यंत समूळ नष्ट होणार नाही,आणि आपले चांगले आणि वाईट यातील फरक कळणार नाही तोपर्यंत देशाने आणि समाजाने किती ही प्रगती करु दे पण अंधश्रद्धा काही प्रमाणात राहील.
महाराष्ट्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून सातारा येथे ९ आँगस्ट १९८९ साली "महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती" स्थापन करून समाजप्रबोधनचे काम केले आणि आजही ते सुरू आहे.
अंधश्रद्धा जरी समाजातील विघातक सत्य असेल तरी याचे समूळ उच्चाटन होणे लोकांच्या हातात आहे. कितीही कायदे आणि आंदोलन या विरोधात झाली तरी जोपर्यंत लोकांची आणि समाजाची मानसिकता बदलत नाही ,सुशिक्षित लोक याला पूर्णपणे विरोध करत नाही आणि अशिक्षित लोकांना अंधश्रद्धा आणि त्याचे होणारे वाईट परिणाम याचे महत्त्व पटत नाही तोपर्यंत अंधश्रद्धा कमी होणार नाही.
आता फक्त एकच प्रयत्न तो म्हणजे "अंधश्रद्धा समूळ नष्ट करण्यासाठी जनजागृती करणे".आणि समाजातील प्रत्येक घटक जर यात सहभागी असेल तर याचे उच्चाटन नक्कीच होईल. जरी अंधश्रद्धा समूळ नष्ट झाली नाही तरी ती वाढणार नाही याकडे लक्ष दिले तर समाज आणि देश दोन्ही प्रगतशील होईल.

लेखिका,
अमिता कदम,
प्राध्यापिका,
पुणे.
9819395788.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.