Halloween party ideas 2015


कसोटी क्रिकेटमधील फलंदाजांचे मॅरेथॉन डाव

कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचं मुळ व पहिलं प्रारूप. सतत पाच दिवस कसोटी सामना खेळला जातो. या पाच दिवसात दोन्ही संघ दोन - दोन वेळा बॅटींग व बॉलिंग करून आपले कौशल्य पणास लावू शकतात. त्यामुळे फलंदाज व गोलंदाजांना स्वतःला सिध्द करण्यास भरपूर वाव मिळतो. गोलंदाजांचा तुलनेत फलंदाजांसाठी कसोटीत अनेक संधी असतात. संघाच्या परिस्थिती नुसार आपला खेळ ते ढाळू शकतात.
फलंदाजाला कसोटीत यशस्वी व्हायचे असेल तर शारिरीक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन व तांत्रिक कौशल्य अंगीकृत असणे गरजेचे आहे. क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात २३०० पेक्षा जास्त सामने खेळले गेले आहेत. यात अनेक धीरोदात्त, गंभीर व खंबीरपणे खेळणारे फलंदाज होऊन गेले. परंतु मॅरेथॉन खेळी खेळण्यात फार मोजके फलंदाज यशस्वी ठरले आहेत.
कसोटीत फलंदाजी किती वेळ करायची, किती चेंडू खेळायचे याला बंधन नसते. पण जास्त वेळ चेंडू खेळण्याचे कसब आतापर्यंत फक्त तीनच फलंदाजांना दाखविता आले आहे. आज आपण तीच माहिती जाणून घेणार आहोत.
लेन हटन हा इंग्लंडचा माजी कर्णधार व सलामीवीर. सन १९३७ ते १९५५ या कालखंडात त्याने ७९ कसोटीत ६९७१ बनविल्या. त्यामध्ये त्याने १९ शतके व ३३ अर्धशतके झळकवली. तसेच एक गोलंदाज म्हणून ३ बळीही लेनने मिळविले आहेत.
याच लेन हटन याच्या नावावर कसोटीत एका डावात सर्वात जास्त चेंडू खेळण्याचा विश्वविक्रम आहे. ऑगष्ट १९३८ अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना लेन हटन याने ३६४ धावांची त्रिशतकी खेळी साकारली होती. त्या खेळीत तब्बल ८७४ चेंडू म्हणजे १४१ षटके एकटया हटन याने खेळलेे. ४२.९७ च्या स्ट्राईक रेटने खेळताना ३५ चौकारही त्या खेळीत होते. कसोटीच्या या एका डावात ८०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा लेन हटन कसोटी क्रिकेटमधील एकमात्र फलंदाज आहे.
न्यूझिलंडचा महान सलामीवीर व कर्णधार ग्लेन टर्नर कसोटीच्या एका डावात सर्वात जास्त चेंडू खेळण्यात दुसऱ्या स्थानावर आहेत. एप्रिल १९७२ च्या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिज विरूध्द खेळताना ग्लेनने पहिल्या डावात ७५९ चेंडू म्हणजे १२६.५ षटके एकट्याने खेळले. या दरम्यान ३४.१२ च्या सरासरीने २२ चौकारांसह २५९ धावा काढल्या.
ग्लेन टर्नरने न्यूझिलंडकडून खेळताना ४१ कसोटीत ७ शतके व १४ अर्धशतकांच्या साह्याने २९९१ धावा फटकविल्या तर वनडेमध्येही ४१ सामने त्याच्या वाटयाला आली. त्यात ३ शतके व ९ अर्धशतकांसह १५९८ धावा त्याने कुटल्या.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार बॉबी सिम्प्पसन हा कसोटी सामन्याच्या एका डावात ७०० पेक्षा अधिक चेंडू खेळणारा तिसरा फलंदाज आहे. सन १९५७ ते १९७८ या कालखंंडात त्याने ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधीत्व करताना १० शतके व २७ अर्धशतकांसह ४८६९ धावा ठोकल्या. त्याचबरोबर गोलंदाजीतही त्यांनी ७१ फलंदाजांना मामा बनविले.
जुलै १९६४ मध्ये अॅशेस मालिकेच्या चौथ्या सामन्यात सलामीला येत कर्णधार असताना ७४३ चेंडू म्हणजे १२३ षटके एकटया सिम्पसन याने खेळून ४१.८५ च्या स्ट्राईक रेटने २३ चौकार व १ षटकार ठोकून ३११ धावा केल्या.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.