Halloween party ideas 2015


जागतिक स्तरावर वेगवान शतक ठोकणारे फलंदाज

क्रिकेटच्या खेळात फलंदाजांच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक मोठया फटक्याला सोन्या चांदी पेक्षा जास्त भाव प्रेक्षक वर्गातून मिळतो. क्रिकेट हा खेळ फलंदाजांच्या सतत ईर्द किर्द फिरत असतो. त्यामुळे त्याला प्राधान्यक्रम मिळणं ओघाने आलंच. क्रिकेटचा सामना सुरू असताना भर मैदानात मान्सुनचा सिझन नसताना फलंदाजांच्या बॅटबधून धावांचा पाऊस पडू लागताच प्रेक्षक आनंदाने ओलेचिंब होऊन जातात. आता तर झटपट क्रिकेट व आक्रमक फलंदाजीचा जमाना असल्याने फलंदाजही आपल्या बॅटचं पाणी दाखविण्यास उतावीळ झाले आहेत.
प्रस्तुत लेखात जगभरात आजवर खेळल्या गेलेल्या विविध स्पर्धात कमीत कमी चेंडूत शतक फटकविणाऱ्या चार जांबाज फलंदाजांच्या बेधुंद फटकेबाजीची कहाणी आज आपणास सांगणार आहे.
जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा महापराक्रम केला आहे क्रिकेटचे पितामह सर डॉन ब्रॅडमन यांनी. तुम्ही म्हणाल त्यांच्या काळात तर वन डे, टि-२० क्रिकेट नव्हते तर मग त्यांनी कसा काय हा कारनामा केला ? परंतु गुणवत्तेला व नैसर्गिक आक्रमकतेला सामना झटपट क्रिकेटचाच असायला पाहिजे असे काही नाही. सर डॉन ब्रॅडमन तर फलंदाजीच्या प्रत्येक कलागुणांनी निपुण होते. हे त्यांचे कसोटीतील शतके, धावा, सरासरी यावर नजर टाकल्यास आपोआप सिद्ध होते. त्यांनी ज्या सरासरीने फलंदाजी केली ती त्यांच्या नंतरच्या कोणत्याच देशाच्या फलंदाजाला साधता आली नाही.
सर डॉन ब्रॅडमन यांनी सन १९३१ मध्ये ऑस्ट्रेलियातील क्लब क्रिकेट स्पर्धेत ब्लॅकॅहॅथ क्लबकडून खेळताना लिथगो क्लब विरूद्ध अवघ्या २२ चेंडूत शतक ठोकले होते. त्यांच्या त्या खेळीत ९ चौकार व १० षटकारांचा समावेश होता. जागतिक क्रिकेटच्या कोणत्याही स्तरावरील ही सर्वात वेगवान शतकी खेळी असल्याची आजही नोंद आहे. त्या सामन्यात त्यांनी १४ षटकार व २९ षटकारांसह २५६ धावा तडकावल्या होत्या
टि-२० क्रिकेटची लोकप्रियता आकाशाला भिडली असताना टि -१० क्रिकेटनेही आता डोके वर काढायला सुरूवात केली आहे. पाकिस्तानातील शाहीद आफ्रिदी फौंडेशन द्वारा आयोजित टि -१० लिग स्पर्धेत पाकिस्तानच्या बाबर आझमने शाहिद आफ्रिदी रेड टिमविरूध्द ग्रिन टिमकडून खेळताना आझमने केवळ २६ चेंडूत शतक केले होते. त्यात ११ षटकार व ७ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्याने त्या सामन्यात एका षटकात ६ षटकार मारण्याचा कारनामाही केला होता.
क्रिकेट इतिहासातलं तिसरं वेगवान शतक सन २०१३ च्या आयपीएल सत्रात निघालेे. पुणे वॉरियर्सविरूध्द रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूविरूध् खेळताना युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने मात्र ३० चेंडूत शतक फटकविले होते. त्या सामन्यात गेलने पुण्याच्या गोलंदाजीचा चुथडा करताना ६६ चेंडूत १३ चौकार व १७ षटकारांंच्या मदतीने १७५ धावांची नाबाद खेळी साकारली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रारूपातील सर्वात जलद शतक एकदिवसीय सामन्यात निघाले आहे आणि तो मान मिळाला दक्षिण आफ्रिकेच्या अब्राहम बेंजामिन डिव्हीलर्स याला. एबीडीने जानेवारी २०१५ मध्ये वेस्ट इंडिज विरूध्द फक्त ३१ चेंडूत शतक ठोकले होते. त्या खेळीत त्याने १४९ धावा फटकविल्या होत्या. त्यामध्ये ९ चौकार व १६ षटकारांचा समावेश होता. हे क्रिकेट इतिहासातलं सर्वात वेगवान असं चौथं शतक ठरलं.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.