मालेगाव शहर कोरोनाचे हाटस्पाॅट बनत असताना या भिषण संकटाच्या काळातही पोलिस दलातील अनेक अधिकारी,कर्मचारी आपलेआजारपण ,आरोग्य, कौटुंबिक समस्या बाजूला ठेवून आपले कर्तव्य बजावण्यात व्यस्त आहेत.मालेगाव शहरातील कॅम्प पोलिस ठाण्यातील जमादार व मुळचे जळगाव जिल्ह्यातील हातेड येथील रहिवासी असलेले श्री राजेंद्र लक्ष्मणराव सोनवणे अशाच कर्तव्यदक्ष कर्मचार्याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.गेल्या चार वर्षांपासून ते डायालिसिसवर आहेत.आठवड्यातून दोन वेळा तपासणीसाठी दवाखान्यात जावे लागत असताना ते सध्या कॅम्प परिसरात रावळगाव नाक्यावर बंदोबस्तासाठी तैनात आहेत.कोरोनाचे संकट भीषण असले तरी त्यास परतवून लावू असा विश्वास ते व्यक्त करतात.त्याचवेळी अधिकारी यांचे पाठबळ व जनतेच्या सेवेचे घेतलेले व्रत हीच आमची प्रेरणा असल्याचे ते सांगतात.
गेल्या तेहतिस वर्षांपासून ते पोलिस दलात कार्यरत आहेत.त्यांना चार वर्षापूर्वी मुतखड्याचा त्रास जाणवला औषधोपचार घेताना एक किडणी खराब झाल्याने ती काढून टाकावी लागली.तर दुसरी किडणी केवळ पस्तीस टक्के कार्यरत आहे.गेल्या चार वर्षांपासून ते या आरोग्याच्या समस्येशी झुंज देत कर्तव्य बजावत आहेत.त्यांनी आजवर अनेक विपरीत परिस्थितीत काम केले आहे.मात्र कोरोनाचे संकट गंभीर आहे या संकटाला हरवायचे असेल तर लोकांनी घरात थांबणे हाच एक पर्याय आहे.लोकांचे प्राण वाचावेत म्हणून आम्हाला रस्त्यावर उभे राहावेच लागेल.लोकांना समजावून देखील जेव्हा विनाकारण रस्त्यावर येतात तेव्हा काळजी वाटते आणि कायद्याचा बडगा उगारावाच लागतो असेही ते म्हणाले.
सध्या कामाचा ताण असला तरी स्वःताचे आरोग्य सांभाळून कर्तव्य बजावत असून.मी केवळ प्रातिनिधिक उदाहरण असल्याचे सोनवणे नम्रपणे सांगतात.कुटुंबातील पत्नी,मुलगा,मुलगी हेदेखील या काळात धीर देत असून त्यामुळे मी येथे खंबीर उभा असल्याचे सांगताना.ह्या संकटाला आपण सर्व मिळून नक्की हरवू असा विश्वास ते व्यक्त करतात
