Halloween party ideas 2015

*शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात*

मुंबई, दि. 22 : कोव्हीड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे.

महसुली उत्पन्नात झालेली घट लक्षात घेता खर्चात काटकसर करण्याच्या उद्देशाने सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन माहे मार्च 2020 पासून दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने माहे मार्च 2020 च्या वेतनाचा पहिला टप्पा अदा करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

एप्रिल महिन्यात मार्च 2020 च्या उर्वरित वेतनाचा दुसरा टप्पा व एप्रिल 2020 चा पहिला टप्पा प्रदान करण्याचे विचाराधीन होते. तथापि प्रत्येक महिन्यात पंधरा-पंधरा दिवसाची दोन देयके तयार करावी लागल्याने देयके तयार करणारी आस्थापना व कोषागारांचा कामावरचा ताण वाढला असता. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने शासकीय कार्यालये सध्या 10 टक्के एवढ्या कर्मचारी क्षमतेवर सुरू आहेत. काही विभागांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक महिन्यात दोन देयके तयार करण्यामुळे वेतन प्रदान करण्यास आणखी विलंब झाला असता त्यामुळे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मार्च 2020 चे उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील वेतन शक्यतो गणेशोत्सवाच्या वेळी प्रदान करणे प्रस्तावित असून याबाबत स्वतंत्ररीत्या आदेश निर्गमित करण्यात येतील, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.

*

जळगांव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष व माध्यमिक शिक्षक संघाचे सेक्रेटरी शालीग्राम भिरूड यांनीहि दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे एप्रिल महिन्याच्या पगाराबाबत पत्राद्वारे पाठपुरावा केला होता.. त्यांचेही मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांनी आभार मानले आहे.
०००

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.