कोविड १९ या जागतिक महामारीचे संकट संपूर्ण जगात पसरले असून त्याचा मोठा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. शिक्षण क्षेत्रही त्यातून सुटले नसल्याने पुढील काळात ऑनलाईन शिक्षण काळाची गरज बनणार असल्याचे मत भाजपा शिक्षक आघाडीचे मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले आहे.
राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाने दि. २८ एप्रिल रोजी एक शासन परिपत्रक निर्गमित केले असून कोविड १९ या विषाणूजन्य साथीच्या रोग प्रसारामुळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुरू करण्यासाठी लर्निंग फ्रॉम होम ही संकल्पना राबविण्याचे निर्देश यात दिले आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधीने अनिल बोरनारे यांचे मत जाणून घेतले. त्यावर बोरनारे म्हणाले की राज्यशासनाने इयत्ता १ ली ते ८ वीच्या परीक्षा रद्द केल्या, ९ वी व ११ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देत आहेत. मार्च-एप्रिल या दोन महिन्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी राज्यातील अनेक शाळांनी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांशी ऑनलाईन अभ्यास सुरू केला आहे. यामध्ये अनेक वर्गांचे व्हाट्सअप्प ग्रुप तयार करणे, शालेय शिक्षण विभागाच्या दीक्षा अँप सह अन्य अँप चा प्रभावी वापर करणे सुरू केले आहे. शाळेतील इयत्तावर व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले असून त्यावर विद्यार्थ्यांना विषयवार अभ्यास दिला जातो आहे तसेच त्यांच्या शंका समाधानासाठी शिक्षकही ऑनलाईन उपलब्ध राहून त्यांचे निरसन करीत आहेत. कोविड १९ चा प्रादुर्भाव भविष्यात कमी झाला तरी काही काळ फिजीकल डिस्टन्स ठेवूनच व्यवहार सुरू होतील. पण शाळांमधील विद्यार्थी संख्या पाहता अंतर कसे ठेवावे असा प्रश्न पडणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये सप्टेंबर मध्ये सुरू करण्याची शिफारस सरकारला केली असून शाळा देखील जून-जुलै मध्ये कश्या सुरू कराव्यात असा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे सध्यातरी काही काळ ऑनलाईन शिक्षण हाच पर्याय दिसत असून अनेक शाळा व शिक्षकांनी तो राबवायला सुरवात केली असल्याचेही अनिल बोरनारे यांनी सांगितले.
