२९ व ३० एप्रिल या सलग दोन दिवसात चित्रपट सृष्टीला मोठे हादरे बसले. बॉलीवूडचे दिग्गज स्टार व हॉलीवूडपर्यंत दस्तक दिलेले महान कलाकार इरफान खान व ऋषी कपूर दोघांनाही कॅन्सरने आपले शिकार बनविले. आपल्या सहज सुंदर अभिनयाने सिनेरसिकांना खिळवून ठेवणारे हे दोनही कलाकार अचानक काळाच्या पडद्याआड गेले. क्रिकेटमध्ये जसे सलग दोन चेंडूवर फलंदाज बाद होतात तेंव्हा प्रेक्षकांना फार यातना होतात त्यापेक्षाही भयानक वेदना तमाम भारतीयांना झाल्या. या दोनही गुणवान कलाकारांना आपणा सर्वांच्या वतीने
आदरपूर्वक अभिवादन ! भावपूर्ण आंदरांजली !! व खरीखुरी श्रद्धांजली !!!
आधीच संपूर्ण जगभर व भारतातही कोरोना व्हायरसने थैमान घातल्यानंतर क्रिकेटही ठप्प झाल्याने खेळाडू सक्तीची विश्रांती घेत आहेत. त्याचबरोबर २९ मार्च पासून सुरू होणारी जगातील सर्वात मोठी लिग स्पर्धा आयपीएलही कोविड -१९ ची शिकार ठरली. यापूर्वी या कालखंडात तमाम क्रिकेटप्रेमी आयपीएलचा स्कोअर बघायचे, परंतु यंदा त्यांच्यावर कोरोनाचा स्कोअर बघण्याची दुर्दैवी वेळ आली, आणि यातही आश्चर्याची बाब म्हणजे आयपीएलमध्ये जशी मुंबई इंडियन्स टॉपला असते अगदी तशीच मुंबई सुध्दा कोरोना पिडीतांच्या स्कोअरमध्ये अव्वल स्थानी आहे.
या दुःखद घटनांच्या सावटाखालीच ३० एप्रिल रोजी भारतीय क्रिकेट संघाचा सफेद चेंडूच्या खेळाचा उपकर्णधार रोहीत शर्माचा तेहतीसावा वाढदिवस आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे सध्यातरी देशभर लॉकडाऊन असल्याने सार्वजनिकरित्या कुठलेही समारंभ होत नसल्याने कितीही मोठा व्यक्ति असला तरी त्याला सरकारचे नियम पाळणे बंधनकारक आहे. रोहीतचा वाढदिवसही यावेळी बंद दरवाजा मागची बाब घडणार आहे. तूर्त आपण रोहीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया.
आज खरं तर रोहीतच्या सनसनाटी कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणारा लेख लिहायचा होता. परंतु माझ्यासह आपणा सर्वांचे आयडॉल असलेले इरफान खान व ऋषी कपूर यांचे अचानक एक्झिट मनाला दुःख देऊन गेले. हे दोन्ही कलाकार चित्रपटसृष्टीतील मातब्बर व्यक्ती असले तरी क्रिडाप्रेमी होती. सर्वच सिनेकलावंता प्रमाणे हे दोघेही क्रिकेटचे निस्सीम चाहते होते.
कोरोना व्हायरसमुळे देशभर लॉकडाऊन आहे. शिवाय सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन केले जात असल्यामुळे या दोन्ही मान्यवर कलावंताच्या अत्यंविधीला अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच लोकांना परवानगी असल्याने नेहमीप्रमाणे आपल्या लाडक्या कलाकारांच्या अंतिम दर्शनाची संधीही त्यांच्या चाहत्यांना मिळू नये ही सुध्दा नियतीची अजब खेळीच म्हणावी लागेल.
इरफान खानबाबत आणखी चुटपूट लावणारी गोष्ट म्हणजे त्याच्या मृत्यूपूर्वी दोन दिवस अगोदरच त्याच्या मातोश्रीचे दुःखद निधन झाले होते. लॉकडाऊन व तो स्वतः आजारी असल्याने त्याला आईचे अंतिम दर्शनही ऑनलाईनच घ्यावे लागले. या गोष्टीची सल इरफान सहन करू शकला नाही.
प्रत्येक गोष्टीचा शेवट निश्चित असल्याने आपणा सर्वांना कितीही दुःख आले तरी ते पचविण्याची ताकद सृष्टी निर्मात्याने प्रत्येकाला निसर्गतःच दिली आहे. तरी आपण आपल्या भावनांना आवर घालून लॉक डाऊन व सोशल डिस्टन्सींगचे भान ठेवणे गरजेचे आहे.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
