आजकाल झटपट क्रिकेट व फटाफट धावा बनवून लगेच निकाल बघण्याची सवय लोकांना लागली आहे. मग ते क्रिकेट कसोटी, वनडे किंवा टि- २० या पैकी कोणतेही असो. खास करून टि-२० ने लोकांची अभिरूची पुरी बदलूनच टाकली आहे. परंतु क्रिकेटचे असली प्रारूप गणले जाणाऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये संयमी व धैर्याने खेळी करणाऱ्या खेळाडूला नावाजले जाते, नव्हे तर त्याच्या कौशल्याची तारीफच केली जाते. सफेद चेंडूच्या खेळात जलद खेळ बघायची सवय लागलेल्या रसिकांना लाल - गुलाबी चेंडूच्या खेळातील शांत व धीमी खेळी रुचत नाही. परंतु पाच दिवसांच्या कसोटीत परिस्थितीनुसार फलंदाजांना पवित्रा घ्यावा लागतो. परिणामत: खेळ कधी कधी रटाळवाणा होतो. पण सामना वाचविणे अथवा संघाची पडझड रोखण्यासाठी खेळाडूंना नाईलाजाने का होईना संथगतीने फलंदाजी करावीच लागते.
आजच्या लेखात आपण जास्तीत जास्त चेंडू खेळून अर्धशतक बनविणाऱ्या फलंदाजाच्या संथ खेळावर एक नजर टाकूया.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त चेंडू खेळून अर्धशतक झळकविण्याचा मान इंग्लंडच्या टॉम बेलीला जातो. सन १९५८- ५९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्द ब्रिस्बेन येथे अॅशेस मालिकेदरम्यान त्याने अर्धशतक बनवायला तब्बल ३५० चेंडू घेतले. म्हणजे ५८.२ षटके त्याला फक्त ५० धावा बनवायला लागल्या होत्या. त्या खेळीत त्याने ६८ धावा बनविल्या होत्या.
कसोटी क्रिकेटमध्ये दुसरं हळूवार अर्धशतक बनविलं आहे ऑस्ट्रेलियाचा तत्कालीन फलंदाज अॅलन बॉर्डरने. सन १९८८-८९ मध्ये सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पडत्या डावाचा डोलारा सावरताना बॉर्डरने विंडीजविरुद्ध २६२ चेंडूत अर्धशतक काढले होते. त्या डावात बॉर्डरने ३३० चेंडूत ७५ धावांची खेळी साकारली होती.
या कासवछाप फलंदाजांच्या क्लबमधील तिसरा फलंदाज आहे न्यूझिलंडचा ईव्हान ग्रे. सन १९८६ मध्ये नॉटींगहॅम कसोटी ग्रे ने इंग्लंडविरुद्ध २३८ धावांचा सामना केल्यानंतर ५० धावा जमविल्या होत्या.
सन १९८२ रोजी पाकिस्तानविरूद्ध लॉर्डस कसोटीत इंग्लंड संघ अडचणीत आला असता त्यांचा तत्कालीन अव्वल फलंदाज ख्रिस टॅव्हरेने नांगर टाकून अर्धशतक बनविताना २३६ चेंडू खेळले. त्या डावात त्याने ८२ धावांची खेळी सजविली. परंतु २८२ चेंडू त्यासाठी खर्च केले.
पाकिस्तानच्या खतरनाक गोलंदाजीचा सामना करताना ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज पिटर टेलर याने अर्धशतक बनवायला २३५ चेंडू घेतले. सन १९८८-८९ च्या पाकिस्तान दौऱ्यात कराची कसोटीत टेलरने ५४ धावांची नाबाद खेळी करुन ऑस्ट्रेलियाला सन्मानजनक स्थितीत नेले होते. त्या खेळीदरम्यान टेलरने २५१ चेंडूंचा सामना केला होता.
कसोटी क्रिकेटमध्ये आणखीही बऱ्याच फलंदाजांच्या संथ खेळ्या आहेत, परंतु पहिल्या पाच जणांचा येथे उल्लेख केला आहे. अश्या जास्त चेंडू खेळलेले फलंदाजांचे डाव तुम्हाला रटाळ वाटत असतील परंतु त्यांच्या त्या खेळामुळे त्यांच्या संघांनी पराभव वाचविले आहेत तर काही संघांनी सामनेही जिंकले आहेत.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
