घरपोच माल देताना ठराविक दुकानांची सक्ती नको
आ.अनिल पाटील यांच्या प्रांताधिकाऱ्यांना विविध सूचना
अमळनेर-किडनीच्या विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिस अत्यंत आवश्यक असल्याने परवानगी साठी त्यांची फरफट होऊ न देता तात्काळ परवानगी देण्याचा प्रयत्न करा आणि शहरातील गर्दी कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवा घरपोच देण्याची योजना योग्य असली तरी ठराविक दुकान अथवा विक्रेत्यांकडूनच माल मागविण्याची सक्ती न करता ग्राहकास जेथे सोईचे असेल तेथून माल मागविण्याची मुभा द्या अश्या अनेक महत्वपूर्ण सूचना आ.अनिल पाटील यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना केल्या.
लॉक डाऊन व संचारबंदी काळात डायलिसिस रुग्णांसह जनतेला काही समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने आ.अनिल पाटील यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांचे दालन गाठून यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली,यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे,डीवायएसपी राजेंद्र ससाणे,तहसीलदार मिलिंद वाघ,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड, संजय चौधरी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.लॉक डाऊन सुरू झाल्यापासून किडनी विकाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना डायलिसिस करण्यासाठी बाहेर गावी जाताना प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असल्याने यासाठी त्यांच्या नातलगांची मोठी दमछाक होत होती सुरवातीला आमदारांच्या सूचनेनुसार अनेक डायलिसिस रुग्णांना प्रांताधिकारी यांनी परवानग्या दिल्याने त्यांना सोईचे झाले परंतु अमळनेर येथे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर सीमा बंदी करण्यात आल्याने डायलिसिस रुग्णांना परवानगी मिळविताना मोठी अडचण येत असून यासाठी ऑनलाइन पद्धत असली तरी ती देखील वेळखाऊ आणि क्लिष्ट असल्याने अनेक रुग्णांची डायलिसिस तारीख टळत होती यामुळे त्यांच्या जीवास धोकाही निर्माण झाला होता,प्रत्यक्षात अनेक रुग्णांना आठवड्यातून किमान एकदा अथवा दोनदा डायलिसिससाठी धुळे अथवा नाशिक जावे लागत असते,ही सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर आ पाटील यांनी प्रांताधिकारी यांनाही या आजाराच्या रुग्णांचे गंभीर्य लक्षात आणून देत परवानगीची प्रक्रिया सोपी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
ठराविक दुकानदारांकडून माल घेण्याची सक्ती नको
शहरातील गर्दी कमी करण्यासाठी दि 27 पासून किराणा भाजीपाला,दूध आणि औषधी आदी वस्तू घरपोच मागविण्याची योजना पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली असून यासाठी प्रभागनिहाय दुकानदार व विक्रेत्यांची नेमणूक करण्यात आली आहे,खरे पाहता शहरातील गर्दी कमी करण्यासाठी योजना चांगलीच आहे परंतु या योजनेबाबत जनता संभ्रमात असून अनेक दूध व किराणा विक्रेत्यांनी पहिल्याच दिवशी घरपोच वस्तू देण्यास असमर्थता दाखविली आहे,यासाठी खरोखरच जे दुकानदार अथवा विक्रेते घरपोच वस्तू देण्यास इच्छुक असतील त्यांचीच नावे व नंबर प्रसिद्धीस द्यावे आणि कोणत्याही ग्राहकास त्याला सोईस्कर अथवा परिचित असलेल्या दुकानदार अथवा विक्रेत्यांकडून माल मागविण्याची मुभा द्यावी जेणेकरून पैसे नसल्यास उधारीवर देखील त्याला माल मिळू शकेल,आणि अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल दुकानांवर जास्तीचे निर्बंध लादू नयेत आदी सूचना आमदारांनी केल्यात.
पत्रकार बांधवाना अपडेट माहिती नियमित द्या
लॉक डाऊन काळात प्रशासनाचे निर्णय विविध बैठकामध्ये होत असतात,त्याबाबत पत्रकारांना अवगत केले जात नसते,परंतू गोपनीय व्यतिरिक्त जी माहिती जनतेपर्यंत पोहोचवायची असेल ती माहिती नियमितपणे पत्रकार बांधवाना प्रेसनोट अथवा इतर माध्यमातून दिली गेली पाहिजे जेणेकरून योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचून चुकीच्या अफवा पसरणार नाहीत,आज प्रशासनासोबत अमळनेरसह ग्रामिण भागातील सर्वच पत्रकार बांधव देखील जोखीम पत्करून सेवेचे कार्य करीत आहेत,त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे,यासाठी प्रशासनाकडून देखील त्यांना सहकार्य होणे अपेक्षित असल्याची भावना आमदार या नात्याने अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षांसाह पत्रकार बांधवांनी आपल्याकडे केली आहे,तरी त्यांच्या मागणीची दखल घेऊन मीडिया सेंटर ची निर्मिती करावी अशी सूचना आमदार पाटील यांनी प्रांताधिकाऱ्यांना केली.
यासह अनेक महत्वपूर्ण सूचना आ. पाटील यांनी केल्याने प्रांत सीमा अहिरे यांनी यावर उचित कारवाई करण्याची ग्वाही आमदारांना दिली.