न्यूझिलंड दौरा भारतासाठी आव्हान ठरेल ?
प्रबळ प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत पिछाडीवरून हरवल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला भारतीय संघ न्यूझिलंडच्या अवघड दौऱ्यावर जात आहे. या भरगच्च दौऱ्यात भारत ५ टि-२०, ३ वनडे व २ कसोटी सामने खेळणार आहे. तसे बघाल तर भारताची न्यूझिलंडमधील भूतकाळातील कामगिरीही फारशी समाधानकारक नाही. न्यूझिलंड संघ इतर संघांप्रमाणे मायदेशात " घर का शेर " आहे. त्यामुळे भारतीय संघ मानांकनात कितीही उंच असला तरी न्यूझिलंडकडून त्यांना कडवा प्रतिकार होऊ शकतो. त्याचे कारण असे की, सध्या सर्वच बाबतीत संतुलीत असलेल्या भारतीय संघाला महत्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीने सतावले आहे. शुक्रवारी २४ जानेवारी पासून या बहुचर्चित दौऱ्याला टि - २० आंतरराष्ट्रीय सामन्याने सुरूवात होत आहे. या दौऱ्यात न्यूझिलंडकडून काही खेळाडू भारताला त्रासदायक ठरू शकतात. त्या निवडक खेळाडूंवर एक नजर टाकूया.
केन विल्यमसन - हा छोटया चनीचा खेळाडू न्यूझिलंडच्या फलंदाजीचा मुख्य कणा आहे.तोच न्यूझिलंडचा कर्णधार असल्याने त्याच्या बुध्दीचातुर्याचाही भारतीयांना मोठया प्रमाणात सामना करावा लागेल. न्यूझिलंडची संध बांधणी त्याने मोठया शिताफीने केली असल्याने या सलामीवीरास जेरबंद करण्यास भारतीय गोलंदाजांना विशेष तयारी करूनच मैदानात उतरावे लागेल. तरीही विल्यम्सन भारतीय संघाची मोठी डोकेदुखी ठरण्याचीच शक्यता आहे.
मार्टीन गप्टील : - हा न्यूझिलंडचा दुसरा सलामीवीर. अतिशय आक्रमक फलंदाज. त्याच्या जोरदार फलंदाजीचा तडाखा जगभरातल्या अनेक नामवंत गोलंदाजांना बसला आहे. विश्वचषक स्पर्धेत याच्याच अचूक फेकीवर धोनी धावबाद व भारत विश्वचषकातून बाद झाला होता. भारतीय गोलंदाजांना याला सुरूवातीलाच बाद करावे लागेल. कारण जर का तो एकदा खेळपट्टीवर जमला तर त्याला बाद करणं अवघड होऊन जातं व नंतर तो आरामात आपला कार्यभाग उरकतो.
टिम साऊदी : - न्यूझिलंड संघातील सद्यस्थितीतला सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. मायदेशात तर अधिक धोकादायक ठरतो. भारतीय फलंदाजांना त्याच्या विरूद्ध खेळाताना नियोजनबध्द खेळ करावा लागेल. शिवाय स्वत: च्या तंत्र व कौशल्याकडे बारकाईने लक्ष दयावे लागेल. साऊदी चेंडूला दोन्ही बाजूला स्विंग करण्यात तरबेज आहे. त्यामुळे सुरुवातीच्या षटकात त्याची गोलंदाजी खेळणे भारतीय फलंदाजांची कसोटीच ठरेल.
कॉलीन मन्रो : - न्यूझिलंड संघातील अतिशय आक्रमक फलंदाज. पहिल्या तीन पैकी कुठल्याही क्रमांकावर खेळतो. सफेद चेंडूच्या खेळात याचा स्ट्राईक रेट १४५ पेक्षा जास्त आहे. टि.२० मध्ये त्याच्या नावे चार शतकांची नोंदही आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांसाठी त्याला आवरणे एक आव्हानच ठरणार आहे. त्याला जितके लवकर बाद कराल तितके भारतीय संघासाठी फायदयाचे ठरणार आहे.
कॉलिन डी ग्रँडहोम : - हा न्यूझिलंडचा अतिशय धोकादायक खेळाडू. बॅट व बॉल या दोन्ही शस्त्रांनी प्रतिस्पर्ध्याला घायाळ करण्याची याची खासीयत. मधल्या फळीत संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करण्यात याचा हातखंडा आहे. तर मधल्या षटकात विरोधी संघाला पेचात टाकणारी गोलंदाजी याची जमेची बाजू आहे. अशा या हरहुन्नरी खेळाडूकडून भारताला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे भारतीय खेळाडूंना त्याला हलक्यात घेऊन जमणार नाही.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.