Halloween party ideas 2015


सर्वांचा प्रेरणा स्रोत रतन टाटा यांचा जन्मदिवस त्यानिमित्ताने शब्दप्रपंच.
टाटा भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती! टाटांनी केलेली संपत्तीनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत साऱ्यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण ! 28 डिसेंबर रतन टाटा यांचा जन्मदिवस.
भारतातील एखाद्या उद्योगसमूहाचा तुलनात्मक संदर्भ देताना ‘हे काय कोणी टाटा-बिर्ला लागून गेले आहेत का?’ असे सहजगत्या म्हटले जाते. टाटा हे नाव भारतीय उद्योगक्षेत्रात कायम क्रमांक एकवर राहिले आहे. याची सुरुवात नवसारीच्या नुसरेवानजी टाटांपासून होते. नुसरेवानजी टाटा यांना वयाच्या १७ व्या वर्षी- ३ मार्च १८३९ रोजी अपत्यप्राप्ती झाली. जमशेट असे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले. हाच मुलगा पुढे जाऊन भारतीय उद्योगविश्वाचा पाया घालणार होता. नुसरेवानजी आपल्या पत्नी व मुलासह नवसारीहून मुंबईला आले. त्यांनी कापसाचा व्यापार सुरू केला. पण अगदी लहान प्रमाणात. कारण त्यांच्याकडे फारसे भांडवल गाठीशी नव्हते. त्यांचे भांडवल त्यांचा मुलगा जमशेट हेच होते. जमशेट १७ वर्षांचा असताना भारतात प्रथमच इंग्रजी भाषेचे शिक्षण मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये सुरू झाले. जमशेटला जागतिक व्यापाराची जाण इंग्रजी भाषेच्या ज्ञानामुळे होऊ लागली. त्याने पहिला परदेश दौरा केला तो चीनचा. आपल्या पहिल्याच दौऱ्यात हाँगकाँगमध्ये ‘जमशेटजी अ‍ॅण्ड अर्देशिर’ या नावाने कंपनी स्थापन केली. ही कंपनी धंदा करणार होती दोन गोष्टींचा.. एक म्हणजे कापूस आणि दुसरी- अफू. अर्थात हा व्यापार मुख्यत: ब्रिटिश कंपन्यांबरोबर होत असे. युरोपातील यांत्रिकीकरणामुळे वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आले होते. जमशेटजींनी एका जन्मात जी काही स्वप्नं पेरली, त्यावर भारत नावाच्या पुढे स्वतंत्र झालेल्या देशाला आपल्या पायांवर उभं राहण्याचं औद्योगिक बळ मिळालं.
जमशेटजींनी घातलेल्या भक्कम पायावर त्यांच्या वारसांनी टाटा उद्योगसमूह पुढे वाढवत नेला. अनेक उद्योग सुरू केले. ते भरभराटीला आणले. कापड गिरण्या (एम्प्रेस मिल्स, टाटा टेक्स्टाइल), वीजनिर्मिती (टाटा पॉवर), पोलाद (टिस्को- आता ‘टाटा स्टील’), विमान वाहतूक (एअर इंडिया), अवजड वाहनेनिर्मिती, रेल्वे-रूळ व डबे (टेल्को- आता ‘टाटा मोटर्स’), इंडियन हॉटेल्स (ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स), हाफकिन इन्स्टिटय़ूट (लस-संवर्धन), टाटा समाजविज्ञान संस्था (समाजकार्य), टाटा प्रेस (मुद्रण व प्रकाशन), तनिष्क (सोने, दागिने), एनसीपीए (सांस्कृतिक कार्य), टाटा स्वच्छ (शुद्ध पाणी व्यवस्था), टाटा ग्लोबल बेव्हरेजेस (पाणी, पेये), टाटा स्काय (टेलीव्हिजन सिग्नल वितरण यंत्रणा), ट्रेंट (व्यापारउदीम), टाटा हाऊसिंग (घरबांधणी), टायटन (घडय़ाळे), टॉम्को (साबण, श्ॉम्पू), नेल्को (रेडिओ), लॅक्मे (सौंदर्यप्रसाधने), एसीसी (सीमेंट), चहा उद्योग (टाटा टी), मीठ (टाटा सॉल्ट), कॉस्टिक सोडा (टाटा केमिकल्स), कीटकनाशके (रॅलीज), मोबाइल फोन (डोकोमो), सॉफ्टवेअर (टी. ई. सी.), इंटरनेट (हाय टेलीकम्युनिकेशन), तयार कपडे (वेस्टसाइड), इलेक्ट्रॉनिक्स (क्रोमा), कॉफी शॉप्स (स्टारबक्स) अशा आणि अनेक यशस्वी कंपन्या टाटा समूहाने जगाला दिल्या. आस्रेलर ही इंग्लंडमधील सर्वात अधिक कर्मचारी असणारी महाकाय पोलाद कंपनी, आलिशान जग्वार आणि लँडरोव्हर या वाहनांचे ब्रँड्स आणि कारखाने असे काही नामांकित परदेशी उद्योगही आज टाटा उद्योगसमूहाच्या ताब्यात आहेत.
टाटा यांनी 21 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत सुमारे पावणेपाच लाख कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या उद्योगास जागतिक किर्ती मिळवून दिली. व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे नेहमी बोलले जाते. उद्योगासाठी लागणार्या अनेक परवान्यांसाठी सरकारी अधिकार्यांनर उपकृत करावे लागते. त्याशिवाय उद्योग सुरूच होऊ शकत नाही. त्याची भरभराट हा नंतरचा भाग झाला. रतन टाटा यांनी मात्र आपण कोणालाही लाच देणार नाही आणि कोणाकडून लाचही घेणार नाही याच तत्वाने कारभार केला. त्यांच्या कोणत्याही उद्योगाची उभारणी लाच दिलेल्या पैशांवर झालेली नाही, हे टाटाच नव्हे तर त्यांच्या कोणत्याही उद्योगातला साधा कर्मचारीही सांगू शकेल. त्यांच्या उद्योग समूहात नोकरी दिली जाते तेव्हाच लाच द्यायची नाही आणि घ्यायचीही नाही हे त्या कर्मचार्याला सांगितले जात असते. आपल्या कामाला थोडा जादा वेळ लागला तरी चालेल मात्र लाच देऊन कामे करून घेतली जाणार नाही हे या कर्मचार्यांच्या मनावर बिंबवण्यात येते. औद्योगिक क्षेत्रात टाटांनी एवढा मानमरातब मिळवला तो केवळ या सचोटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर.  टाटा उद्योगसमूह ही रतन टाटा यांची खासगी कंपनी. त्यामुळे त्यांना कोणी या अध्यक्षपदावरून `जा’ असे सांगू शकत नव्हते किंवा सांगू शकले नसते. तरीही वयाच्या पंच्याहत्तरीनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. या मागे त्यांचे या समूहावर असलेले प्रेम तर आहेच, शिवाय आपला उद्योग समूह नव्या पिढीच्या ताब्यात देण्याचे औदार्यही आहे. आपला वारस म्हणून कुटुंबातल्या कोणाकडेही या उद्योग समूहाची सूत्रे सोपवणे त्यांना सहज शक्य होते. मात्र तो धोपट मार्ग न अनुसरता उद्योगाच्या अध्यक्षपदी त्याच तोलामोलाची व्यक्ती विराजमान व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. रतन टाटा 1962 मध्ये टाटा समूहात दाखल झाले. त्यापूर्वी त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी मिळवली होती. 1971 मध्ये ते नॅशनल रेडियो अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे संचालक झाले. तर 1981 मध्ये त्यांच्यावर टाटा इंडस्ट्रिजच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत रतन टाटा यांनी `टाटा टेलीसर्व्हिसेस’ची स्थापना करून दूरसंचार क्षेत्रात पदार्पण केले. `टाटा इंडिका’ या संपूर्ण देशी बनावटीच्या कारद्बारे `टाटा मोटर्स’ने प्रवासी वाहन क्षेत्रात पदार्पण केले. ब्रिटनच्या `टेंटले समूहा’चा ताबा `टाटा टी’ या कंपनीने घेतला. परदेशी कंपनी आपल्या ताब्यात घेणारा टाटा हा पहिलाच भारतीय उद्योग ठरला. टाटा एजीआय, टाटा इंडिकॉम, टाटा स्वच्छ, टाटा हौसिंग, टाटा स्काय, टाटा केमिकल्स अशा नव्या कंपन्यांची स्थापना रतन टाटा यांच्याच कारकिर्दीत झाली. मध्यम वर्गासाठी `टाटा नॅनो’ ही भारतीय बनावटीची लहान आकाराची मोटार तयार करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आणि एक लाख रुपयात `नॅनो’ ग्राहकांना मिळू शकेल हे पाहिले. या वाटचालीत अनेक वादळांना त्यांना तोंड द्यावे लागले. `टाटा नॅनो’चा प्रकल्प पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जी यांच्या हट्टामुळे हलवावा लागला. तो गुजरातेत सुरू करून या मोटारीचे लाँचिंग त्यांनी केले. केवळ भारतातच नाही तर श्रीलंका, नेपाळ, ब्रिटनमध्येही या मोटारीला मागणी आहे. टाटा हौसिंगद्बारे मध्यमवर्गाला परवडतील अशा सदनिका बांधण्याच्या प्रकल्पाची घोषणाही त्यांनी 2009 मध्ये केली. बोइसरनजिक हा प्रकल्प अस्तित्वात येतो आहे. ब्रिटनच्या `जग्वार’ आणि `लँड रोव्हर’ या अलिशान वाहन बॅंडची खरेदीही त्यांच्याच काळात झाली. हा सारा व्याप सांभाळतानाच आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून त्यांनी अनेक सामाजिक प्रकल्पही सुरू केले. 
अविरत परिश्रम, सचोटी आणि प्रामाणिक या तत्वावर टिकून आपले व्यवसायविश्‍व निर्माण करणार्‍या रतन टाटा यांनी शैक्षणिक क्षेत्रात देखील व सामाजिक क्षेत्रात देखील मोठे योगदान दिलेले आहे तेजस प्रकल्पांतर्गत आमच्यासारखे कॉर्डिनेटर घडण्यामागे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या इंग्रजी विकास शिक्षकविकास कार्यक्रमात ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने व शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या तेजस प्रकल्पमोहिमेत त्यांचा सक्रीय असा आर्थिक सहभाग आहे.तेजस प्रकल्पाचा टॅग कॉर्डिनेटर एरंडोल तालुका  म्हणून निवड झाल्याने मला या गोष्टीची विशेष अशी या निमित्ताने जाणीव आहे .जन्मभूमी साठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या व सर्वांना प्रेरणा देणाऱ्या या महान उद्योगपतीचे जन्मदिनानिमित्त शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीच्या वतीने व शिक्षक मित्रांच्या वतीने पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभीष्टचिंतन!
किशोर पाटील कुंझरकर.
राज्य समन्वयक राज्य समन्वय समिती शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य.7030887190

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.