*तीन वर्षात अठरा हजार पुस्तके मोफत वाटप-92 शाळांमध्ये वाचनालये स्थापन...*
कोठली येथील प्रवीण महाजन यांचा उपक्रम-
--वाचन प्रेरणा दिनविशेष--
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
-लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीचा विकास व्हावा, वाचन चळवळ वृद्धीगंत व्हावी यासाठी नंदुरबार,धुळे जळगाव जिल्ह्यातील वाचनालय नसलेल्या माध्यमिक शाळांमध्ये पुणे येथील विविध कंपन्या,सेवाभावी संस्था,युवकांचे ग्रुप यांच्यातर्फ मोफत ग्रंथालय स्थापन करण्यासाठी कोठली ता.शहादा येथील रहिवासी व पुणे येथे नोकरीस असलेला युवक प्रवीण सुरेश महाजन हा धडपडत आहे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाच्या धर्तीवर प्रवीण महाजन यांनी गेल्या चार वर्षात राबवलेल्या वाचन चळवळीचा लेखाजोखा दै.साईमत ला मांडला.
ज्या गावात जन्मलो त्या गावाचा, जिल्ह्याचा,राज्याचा परिणामी सम्पूर्ण देशाचा मला अभिमान आहे.या गावासाठी,देशासाठी काहीतरी करावे हा विचार अनेक दिवसांपासून सतावत होता.म्हणून २०१३ साली गावातील काही युवकांना संघटित करून सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली.त्याच काळात पुणे येथे नोकरी मिळाली.असंख्य मित्रांच्या ओळखी व जनसंपर्क असल्याने अशा तब्बल १००पेक्षा अधिक युवकानीं एकत्र येत'युवकमित्र परिवार' ही संस्था स्थापन केली.त्याद्वारा ग्रामीण भागातील शाळांमध्ये मोफत वाचनालये स्थापन करण्याचा छोटासा प्रयत्न केला.या प्रयत्नांना पुढे प्रचंड प्रतिसाद मिळून पुणे येथील 'सेवा सहयोग,' ज्ञान की वाचनालय,अक्षरभारती या संस्थांनी मदत केली.त्याबळावर 4 वर्षाच्या कालावधीत आज तब्बल 92 शाळांमध्ये मोफत ग्रंथालये स्थापन केली असून 18 हजार वाचनीय कथा,कांदम्बऱ्या,छान छान गोष्टीची पुस्तके,करिअर विषयक पुस्तके यांचे यशस्वी वितरण झाले आहे.ह्या पुस्तकांचे खरोखर वाचन केले जाते का.?हे तपासण्यासाठी आम्ही पुस्तकामध्ये पुस्तक दात्याच्या पत्ता असलेलं पोस्ट कार्ड टाकत असतो त्यावर विद्यार्थी अभिप्राय लिहून पाठवत असतात त्यामळे दिलेली पुस्तके वाचनासाठी ज्ञान मिळवण्यासाठी वापरले जात असल्याचे समाधान लाभत असल्याचे महाजन यांनी सांगितले.याच ग्रंथालय स्थापन झालेल्या शाळांमध्ये पुस्तकावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते व त्यात विशेष उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकही दिले जात असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत असल्याचे महाजन यांनी सांगितले.
आम्हा युवकांसाठी मार्गदर्शक असलेलं भारतरत्न डॉ.अब्दुल कलाम साहेब हे प्रेरणास्थान असून त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्र सरकारने 'वाचन प्रेरणा दिवस' साजरा करण्याचा निर्णय अतिशय चांगला असून सोशल मीडियाच्या जगात लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला टिकवून ठेवण्यासाठी असे उपक्रम राबवले जाणे आवश्यक असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.येत्या 5 वर्षाच्या कालावधीत धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यातील वाचनालय नसलेल्या सर्व माध्यमिक शाळा, आश्रमशाळामध्ये वाचनालय स्थापन करण्याचा मानस असून भविष्यात ग्रामीण भागात 'गाव तेथे वाचनालय' ही चळवळ राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
फोटो
प्रविण महाजन