कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे पदार्पणवीर
कसोटी क्रिकेट मध्ये सावध व संयमी सुरुवात करून आपला डाव उभा करण्याची बऱ्याचशा फलंदाजांची पद्धत आहे. शांत सुरुवातीनंतर मग तो फलंदाज आपला धावांचा बुरूज मोठा मोठा करत जातो. परंतु काही आक्रमक फलंदाज कसलाही विचार न करता, येईल त्या चेंडूला पिटाळून धावा काढण्याचे तंत्र अवलंबतात. त्यात काही जण यशस्वीही होतात. पण कसोटी क्रिकेट हे दिर्घ काळ चालणारे क्रिकेट असल्याने यात संयम व सामंजस्य असणं जास्त गरजेचे असते. परंतु त्या धडाकेबाज फलंदाजांना हे सांगणार कोण ?
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना बरेचसे खेळाडू नर्व्हस असतात. फलंदाजीला गेल्यानंतर सुरुवातीचे काही चेंडू ते चाचपडत खेळतात. परंतु कसोटी क्रिकेटच्या पटलावर गेल्या १४३ वर्षात बारा असे खेळाडू अवतरले की, ज्यांनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीत पहिल्याच चेंडूचा सामना करताना सणसणीत षटकार मारून आपल्या कसोटीतील धावांचं खातं उघडलं आहे. त्यामध्ये सर्वाधिक चार बांगलादेशचे, तीन वेस्ट इंडिजचे तर भारत, श्रीलंका, न्यूझिलंड, झिंबाब्वे व ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे.
या क्लबचा पहिला सदस्य आहे ऑस्ट्रेलियाचा एरिक फ्रीमन. १९ जानेवारी १९६८ रोजी ब्रिस्बेन येथे भारताविरूध्द खेळताना भारताचा फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्नाच्या चेंडूवर त्याने खणखणीत षटकार ठोकून कसोटी क्रिकेटमधलं आपलं धावांचं अकौंट षटकाराने उघडलं.
वेस्ट इंडिजच्या कार्लीस्ले बेस्ट याने २१ फेब्रुवारी १९८६ रोजी किंगस्टन येथे इंग्लंडच्या इयान बोथमला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून पदार्पण दणदणीतपणे साजरं केलं.
झिंबाब्वेच या किथ डी बांगवा याने न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरी याला १५ ऑगष्ट २००५ रोजी बुलावायो येथे कसोटी सामन्यातील पहिलाच चेंडू खेळताना षटकारासाठी मैदानाबाहेर भिरकावले.
वेस्ट इंडिजच्या डेल रिचर्डसने ९ जुलै २००९ रोजी किंगस्टन येथे जीवनातला पहिला चेंडू खेळताना बांगलादेशच्या मुश्रफे मुर्तजाला षटकार मारून कसोटी धावांचं खातं उघडल.
बांगलादेशच्या शफीफुल इस्लाम याने १७ जानेवारी २०१० रोजी चितगाव येथे कसोटी पदार्पण भारता विरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून कसोटी जीवन सुरू केले. भारताचा लेगस्पिन गोलंदाज अमित मिश्राला त्याने षटकाराचा तडाखा दिला.
इंग्लंडच्या ग्रॅमी स्वानच्या गोलंदाजीवर षटकाराने हल्ला करत बांगलादेशच्या जहरूल इस्लाम याने ढाका येथे २० मार्च २०१० रोजी कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा सहावा फलंदाज बनला.
बांगलादेशचाच आमिन हुसेन याने २७ जानेवारी २०१४ रोजी ढाका येथे कसोटी पदार्पण करताना श्रीलंकेच्या रंगना हेरथचा पहिला चेंडू खेळला व थेट प्रेक्षकांत भिरकावून षटकार वसूल केला व कसोटी धावांचं खातं खोललं.
न्यूझिलंडच्या मार्क क्रेग याने ८ जून २०१४ रोजी किंगस्टन येथे विंडीजविरूध्द कसोटी पदार्पण केले व त्याने खेळलेला पहिला चेंडू सहा धावांसाठी स्टेडियमध्ये टोलवून स्वतःचं टेस्ट स्कोरींग अकौंट सुरू केले.
धनंजय डिसील्व्हा या क्लबमध्ये सहभागी असलेला श्रीलंकेचा एकमेव खेळाडू असून २६ जुलै २०१६ रोजी पल्लीकेले येथे ऑस्ट्रेलियाविरूध्द खेळताना स्टिव्हन ओकिफेचा त्याने खेळलेला पहिला चेंडू सरळ प्रेक्षकात भिरकावून देत सहा धावा वसूल करत स्वतःला ऐतिहासिक बनवून टाकले.
कामरूल रब्बी हा बांगलादेशचा या क्लबमधील चौथा खेळाडू असून २८ ऑक्टोबर २०१६ रोजी ढाका येथे इंग्लंडविरूध्द पदार्पण करताना मोईन अलीच्या पहिल्याच चेंडूवर घणाघाती हल्ला करत षटकार ठोकला.
सुनिल अँब्रीस या विंडीजच्या फलंदाजाने वेलिंग्टन येथे न्यूझिलंडविरूध्द पदार्पण करताना पहिल्याच चेंडूवर १ डिसेंबर २०१७ रोजी षटकाराने कसोटी क्रिकेटचा श्रीगणेशा केला. गोलंदाज होता न्यूझिलंडचा स्पीडस्टार ट्रेंट बोल्ट.
भारताच्या रिषभ पंतने नॉटींगहॅम येथे १८ / ८ / २०१८ रोजी इंग्लंडच्या आदिल राशिदला अस्मान दाखवत पदार्पण षटकाराने साजरे केले.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
