सन १९९९ च्या इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत २९ मे १९९९ रोजी एक अत्यंत महत्वपूर्ण सामना यजमान इंग्लंड व स्पर्धेत काहीसा दोलायमान खेळ करणाऱ्या भारत यांच्या दरम्यान होणार होता. खास करून स्पर्धेतील आव्हान टिकविण्याच्या दृष्टीने भारतासाठी करो वा मरो या स्थिती होती. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस पाचारण केलं.
भारताने आपल्या संघाची सर्वांना चकीत करणारी निवड केली. मागच्या सामन्यात श्रीलंकेविरूध्द पाच बळी घेणाऱ्या रॉबिन सिंगला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. तर श्रीलंकेविरूध्द यष्टीरक्षण करणाऱ्या राहुल द्रविडला निव्वळ फलंदाज म्हणून खेळविण्याचा निर्णय घेतला. तर अष्टपैलू रॉबिनच्या जागेवर यष्टीरक्षक नयन मोंगिया संघात आला. या वादग्रस्त निर्णयाने संघात दुफळी निर्माण होण्याची भितीही व्यक्त केली जात होती.
भारताच्या डावाची सुरूवात दोन्ही डावखुरे फलंदाज सदागोपन रमेश व सौरव गांगुलीने केली. सलामीला ७७ चेंडूत ४९ धावांची भागीदारी झाल्यानंतर रमेश बाद झाला. द्रविड ५३, गांगुली ४० व अजय जडेजा ३९ यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने जेमतेम २३२ धावा फलकावर नोंदविल्या.
जिंकण्यासाठी २३३ धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज अलेक स्टुअर्ट केवळ दोन धावा काढून कर्णधार अझहरच्या हाती झेल देऊन तंबूत परततो तोच पुढच्याच चेंडूवर ग्रॅहम हिक त्रिफळाबाद होऊन आल्या पावली परत गेला. त्यावेळी इंग्लंडच्या खात्यात अपशकुन दर्शविणाऱ्या १३ धावा झाल्या होत्या. त्यानंतर ग्रॅहम थॉर्प व नासिर हुसेनने इंग्लंडचा पडता डोलारा काहीसा सावरला होता.
इंग्लंडच्या डावाचे १९ वे षटक सुरू असताना आकाशात ढगांनी गर्दी करून एकमेकांवर आदळायला सुरूवात केली. मैदानाची निगा राखणारे कर्मचारी ताडपत्र्या घेवून खेळपट्टी झाकायला मैदानात घुसण्याच्या तयारीत होते. परंतु त्यावेळी पाऊस न झाल्याने ते मैदानात काही आले नाही. परंतु ढगांच्या गडगडाटाने त्यावेळी खेळात काहीसा व्यत्यय आल्याने खेळ थोडा वेळ थांबला होता, आणि येथेच थोडी गडबड झाली. व्यत्ययानंतर खेळ सुरू होताच एकाग्रता भंगलेला नासिर हुसेन सौरव गांगुलीच्या पहिल्याच चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या होती ३ बाद ७२.
या दरम्यान पावसाचा व क्रिकेटचा आँखमिचौलीचा खेळ सुरूच होता. तरी मैदानात खेळ पुढे रेटायचं काम पंच करतच होते. गांगुलीने ते षटक पुर्ण केले. मात्र त्यानंतरच्या षटकात देवाशिष मोहंतीने तीन चेंडू टाकले आणि पावसाला सुरूवात झाली व खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर काही कालांतराने पाऊस थांबला खरा परंतु मैदान खेळण्यायोग्य नसल्याने पंचाने त्या दिवशी खेळ पुन्हा सुरू करण्यास असमर्थता दर्शवली. त्याचबरोबर उर्वरीत सामना राखीव दिवशी आहे त्याच परिस्थितीत खेळवण्याचेही पंचानी जाहीर केले.
३० मे १९९९ रोजी खेळ नियोजित वेळेवर सुरू झाला तेंव्हा इंग्लंडला जिंकण्यासाठी २९.३ षटकात १६० धावांची गरज होती व त्यांच्याकडे ७ गडीही शिल्लक होते. आदल्या दिवसाचे नाबाद फलंदाज ग्रॅहम थॉर्प व नीलफेअर ब्रदर यांनी खेळाची सुरुवात केली. जवागल श्रीनाथ टाकत असलेल्या बावीसाव्या षटकात थॉर्पने सणसणीत चौकार मारून श्रीनाथला डिवचले. मात्र त्या अपमानजनक चौकाराने दुखावलेल्या श्रीनाथने पुढच्याच षटकात थॉर्पला पायचितच्या जाळ्यात अडकविले. त्यावेळी इंग्लंडची अवस्था ४ बाद ८१ अशी बनली होती. या सामन्यातील पाकिस्तानी पंच जावेद अख्तर यांचा तो निर्णय काहीसा वादग्रस्त ठरला, कारण टिव्ही रिप्लेत तो चेंडू लेग स्टंपच्या बाहेर जात असल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यावेळी आजच्या सारखी डिआरएस प्रणाली अस्तित्वात नसल्याने मैदानातील पंचाच्या निर्णयाला आव्हान देण्याची नियमात तरतूद नसल्याने पंच जावेद अख्तर यांचा तो निर्णय अंतिम मानावाच लागला.
त्यानंतर पुढील षटकात अनिल कुंबळेच्या चेंडूवर थॉर्पच्या जागेवर आलेल्या अँड्रयू फ्लिंटॉफने जोरदार षटकार मारून इंग्लिश प्रेक्षकांना खूष केले खरे कारण कुंबळेने त्याच षटकात फ्लिंटॉफचा काटा काढून हिशोब बरोबर केला. त्यानंतर कुंबळेने एडम होलियाकला बाद केले. मग सौरव गांगुलीने नील फेअरब्रदर व मार्क एल्हॅमला तंबूत धाडून इंग्लंडचा डाव १६९ धावात थांबवला. या विजयाने भारताला सुपर सिक्समध्ये प्रवेश मिळाला. सामन्यात महत्वपूर्ण असे तीन बळी व फलंदाजीत ४० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा सौरव गांगुली सामनावीर ठरला.
अशा रितीने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन दिवस चाललेला हा पहिला एक दिवसीय सामना ठरला. शिवाय विश्वचषकातीलही हा पहिला किस्सा ठरला.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
