Halloween party ideas 2015


कसोटी पदार्पणातच हॅट्रीक घेणारेे गोलंदाज

ज्याप्रमाणे आतंरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राष्ट्रीय संघातून पहिला अधिकृत सामना खेळताना फलंदाजावर दडपण असतं अगदी तसंच दडपण गोलंदाजावरही असतं. उच्च दर्जाच्या क्रिकेटमधील वातावरण फार वेगळं असतं. तेथे खेळणारे फलंदाजही कसलेले असतात. गोलंदाजाच्या देहबोलीवरून ते त्याची कुंडलीच जाणून घेतात. अशा वेळी तो गोलंदाजही बावरलेला असतो. हात थरथरत असतात, पाय लटपट करतात जेंव्हा तो गोलंदाज गोलंदाजीसाठी चेंडू हातात घेतो तेंव्हा त्याचं डोकं बिघडलेल्या संगणकासारखं तर शरीर बंद पडलेल्या मशिन सारखं असतं.
परंतु काही गोलंदाज असेही आहेत की ज्यांनी आपल्या नवखेपणाचा लवलेशही आपल्या चेहऱ्यावर न दाखवता एखादया अनुभवी खेळाडूप्रमाणे चेंडू हातात घेऊन प्रतिपक्षाच्या गोटात घबराट निर्माण केली आहे व तिही साधी सुधी नाही तर एका मागोमाग एक चेंडूवर फलंदाजांना बाद करून हॅट्रीकचा नजराना समस्त क्रिकेट जगताला पेश केला.
कसोटी क्रिकेटला १४३ वर्षांचा इतिहास साक्षीला आहे. या भल्या मोठया कालखंडात १२ देशांनी कसोटी क्रिकेट खेळले. या दरम्यान २३०० पेक्षा जास्त कसोटी खेळल्या. त्यात ३००० पेक्षा जास्त खेळाडूंनी आपले नशीब अजमावले. त्यात भन्नाट वेगाचे जलदगती गोलंदाज होते तर आपल्या बोटांच्या, मनगटाच्या जादूने भल्याभल्या फलंदाजांना नाचायला लावणारे फिरकी गोलंदाजही होते. तरी आतापर्यंत केवळ तीनच गोलंदाज असे निघाले की, ज्यांनी कसोटीच्या पदार्पणाचे कुठलेही दडपण जाणवू न देता सराईताप्रमाणे टिच्चून मारा करत आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच हॅट्रीक साधली. विशेष म्हणून क्रिकेटमध्ये असे अनेक रथी महारथी होऊन गेलेत की, त्यांना आपल्या उभ्या कारकिर्दीत कधीही कसोटीत हॅट्रीक घेता आली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये आजवर एकूण ४५ हॅट्रीक नोंदल्या असून फक्त तीनच गोलंदाज स्वतःच्या पदार्पणाच्या कसोटीत आपली हॅट्रीक करू शकले. सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे या तिनही गोलंदाजांनी आपल्या हॅट्रीक विदेशी भूमिवर केल्या आहेत.
इंग्लंडचा तत्कालीन जलदगती गोलंदाज मॉरीस अलॉम याने सन १९३० मध्ये न्यूझिलंड विरूध्द कसोटी पदार्पण करताना सलग तीन चेंडूवर तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून हॅट्रीक साधली. १० जानेवारी १९३० रोजी ख्राईस्टचर्चच्या लॅन्सेस्टर पार्कवर त्याने न्यूझिलंडच्या पहिल्या डावात सर्वप्रथम टिम लॉरीला पायचित केले. दुसऱ्या चेंडूवर केन जेम्सला टिच कॉर्नफोर्डकडे झेल देण्यास भाग पाडले, तर पुढच्या चेंडूवर टेड बेडकॉकला त्रिफळाचित केले.
न्यूझिलंडचा ऑफस्पिन गोलंदाज पिटर पॅथरीक हा दुसरा गोलंदाज आहे की ज्याने पदार्पणातच हॅट्रीकचा आस्वाद घेतला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडीयमवर ९ ऑक्टोबर १९७६ रोजी पिटरने पाकिस्तानच्या पहिल्या डावातच हॅट्रीक नोंदविली. सर्वप्रथम त्याने पाकचा हुकमी फलंदाज जावेद मियाँदादला रिचर्ड हॅडलीद्वारे झेलचित केले. दुसऱ्या चेंडूवर त्याने स्वतःच वासिम राजाचा झेल टिपला. तर तिसऱ्या चेंडूवर जेफ हॉवर्थने इंतिखांब आलमला अलगद टिपले.
सन १९९४-९५ च्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना कांगारूंचा ताडमाड उंचीचा, दिसायला शिडशिडीत बांध्याचा, लांंबलचक नाकाचा, सदृढ शरिर व मन असलेल्या जलदगती गोलंदाज डेनियन फ्लेमिंगने आपली पदार्पणाची कसोटी खेळली.
आमिर मलिक, इंझमाम उल हक व सलिम मलिक हे त्याच्या हॅट्रीक मध्ये शिकार झालेले पाकचे पहिल्या फळीतील दिग्गज फलंदाज होते.
९ ऑक्टोबर १९९४ या दिवशी रावळपिंडी येथे पाकच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना फ्लेमिंगने सर्वप्रथम अमिर मलिकला मायकेल बेव्हनद्वारे झेलबाद केले. नंतरच्या चेंडूवर त्यांचा सर्वात भरवशाचा फलंदाज इंझमाम उल हक पायचितच्या जाळ्यात फसला तर पुढच्या चेंडूवर खंदा फलंदाज सलिम मालिक यष्टीरक्षक इयान हिलीकडे झेल देऊन बाद झाला.
    या तिन पैकी दोन हॅट्रीक पाकिस्तानविरूध्द झाल्या. योगायोगाची गोष्ट म्हणजे दोन्ही हॅट्रीक झाल्या त्या दिवसाची तारीख होती ९ ऑक्टोबर.
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email:  dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.