भारताचा संघ सध्या एकदिवसीय मानांकनांत भले अव्वल स्थानी नाही. आजच्या घडीला भारताचा संघ विश्वविजेताही नाही. परंतु एकदिवसीय सामन्यात भारताच्या खात्यात अनेक विश्वविक्रम आहेत. एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक सामने खेळणारे, सर्वाधिक धावा काढणारे, सर्वाधिक शतके, अर्धशतके फटकविणारे, सर्वाधिक द्विशतक, व्यक्तीगत सर्वोच्च धावा बनविणारे फलंदाज भारताचेच आहेत. याचा अर्थ भारतीय संघाचा जागतिक क्रिकेटमध्ये दरारा अजूनही आहे.
एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा भारताच्या रोहित शर्माचा विश्वविक्रम इंग्लिश कर्णधार आयोन मॉर्गनने तोडून आपल्या नावे केला हा भाग जरा बाजूला ठेवला तरी भारत एकदिवसीय सामन्यातला तगडा आव्हानवीर आहे हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही.
प्रस्तुत लेखात आपण भारताकडून एकदिवसीय सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर एक नजर टाकणार आहोत.
एकदिवसीय सामन्याच्या एका इनिंगमध्ये भारताचे दोन फलंदाज असे आहेत की, ज्यांनी एका सामन्यात दहा पेक्षा अधिक षटकार मारले आहेत. विशेष म्हणजे यातील दोन वेळा हा पराक्रम सफेद चेंडूच्या खेळातील भारतीय उपकर्णधार रोहित शर्माने केला आहे. तर असा पराक्रम करणारा दुसरा फलंदाज आहे जाँबाज महेंद्रसिंग धोनी.
आपल्या आतिषी षटकारबाजीमुळे हिटमॅन ही उपाधी मिळविणाऱ्या रोहीत शर्माने सन २०१३ मध्ये बंगलोर येथे ऑस्ट्रेलिया विरूध्द हा कारनामा केला. २ नोव्हेंबर २०१३ रोजी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रोहीत शर्माने ऑस्ट्रेलियन गोलंदाजीच्या चिंधड्या उडविताना अवघ्या १५८ चेंडूत २०९ धावांची तुफानी द्विशतकी खेळी केली होती. या डावात रोहीतने १२ चौकारांबरोबरच १६ गगनचुंबी षटकार ठोकले होते. रोहीतने आजवर सर्वाधिक तीन द्विशतके ठोकली आहेत त्यातील हे पहिले द्विशतक होय.
एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा भारताकडून क्रमांक दोनचा पराक्रमही रोहीत शर्माच्याच नावावर आहे. १३ डिसेंबर २०१७ रोजी मोहाली येथे रोहीतने वनडे सामन्यातील आपले तिसरे द्विशतक झळकविले. त्या डावात १५३ चेंडूच्या खेळादरम्यान रोहीतने नाबाद २०८ धावांची खेळी साकारली. त्या खेळीत त्याने १३ चौकारांसह १२ गगनभेदी षटकार ठोकले होते.
भारताकडून एका डावात सर्वाधिक षटकार मारण्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे माजी यष्टीरक्षक - फलंदाज व कर्णधार महेंद्रसिंग धोनी. वास्तविक भारताकडून वनडे सामन्याच्या एका डावात १० पेक्षा अधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू एम. एस. धोनी हाच आहे. सन २००५ मध्ये जयपूर येथे श्रीलंकेविरूध्द स्वतःच्या बावीसाव्या सामन्यात श्रीलंकेच्या २९९ या पहाडाएवढया धावांचा पाठलाग करताना धोनीने मात्र १४५ चेंडूत १८३ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली होती. धोनीच्या या खेळीत १५ चौकार व १० गगनभरारी षटकार आहेत. धोनीच्या या शतकाचे वैशिष्टये म्हणजे आजही कोणत्याही यष्टीरक्षक फलंदाजाने एकदिवसीय सामन्यात साकारलेली ही सर्वोच्च धावांची खेळी आहे.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
