सन १९७१ मध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान मेलबोर्न येथे जागतिक क्रिकेटमधला पहिला एकदिवसीय सामना अपघाताने झाला. परंतु त्या सामन्याला असलेली प्रेक्षकांची उपस्थिती व नंतर मिळालेला उदंड प्रतिसाद बघता क्रिकेटची सर्वोच्च संस्था आयसीसीने सन १९७५ पासून दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. सन १९७५ पासून आजतागायत १२ विश्वचषक स्पर्धा पार पडल्या असून सर्वाधिक ५ वेळा ऑस्ट्रेलिया विजेते ठरले आहेत. भारत व विंडीजला प्रत्येकी दोनदा हा करंडक मिळाला असून इंग्लंड, श्रीलंका व पाकिस्ताननेही एकेकदा हा चषक मायदेशी नेला आहे.
प्रस्तुत लेखात आपण प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत शुभारंभाच्या लढतीत पहिलं षटक करणाऱ्या म्हणजे पहिला चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांविषयी जाणून घेऊया.
सन १९७५ च्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेचा पहिला सामना यजमान इंग्लंड व नवशिखा भारत यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात इंग्लंडची फलंदाजी असल्याने पहिलं षटक टाकण्याचा मान अर्थातच भारतीय गोलंदाजाला मिळाला, आणि तो गोलंदाज होता मध्यमगती मारा करणारा मदनलाल शर्मा ! मदनलाल निव्वळ त्या स्पर्धेतीलच नव्हे तर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातला पहिला चेंडू फेकणारा गोलंदाज ठरला. मदनलालच्या त्या पहिल्या चेंडूचा सामना करणारा फलंदाज होता इंग्लंडचा सलामीवीर डेनिस एमिस.
सन १९७९ च्या विश्वचषकाचा पहिला सामना गतविजेता विंडीज व भारत यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. प्रथम फलंदाजी भारताची होती. त्यामुळे विंडीजचा वेगवान गोलंदाज अँडी रॉबर्टसला
विंडीजकडून पहिलं षटक टाकण्याचा मान मिळाला. त्या सामन्यात रॉबर्टसला ३२ धावात दोन विकेट्स मिळाल्या.
सन १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेतली शुभारंभाची लढत यजमान इंंग्लंड व न्युझिलंड यांच्या दरम्यान झडली. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर न्यूझिलंडच्या रिचर्ड हॅडलीने पहिलं षटक टाकलं. हि स्पर्धा भारतीय संघाने जिंकून इतिहास घडविला हे आपल्या लक्षात असेलच.
सन १९८७ मध्ये चौथी विश्वचषक स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतला उदघाटनाचा सामना श्रीलंका व पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या पाकिस्तानच्या डावात पहिला चेंडू श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज विनोदन जॉन याने टाकला होता.
सन १९९२ च्या पाचव्या विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना दोन यजमान देश न्यूझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला. या सामन्यात न्यूझिलंडने प्रथम फलंदाजी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडून पहिले षटक त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज क्रेग मॅक्डरमॉटने फेकले.
सन १९९६ च्या स्पर्धेचा श्रीगणेशा इंग्लंड व न्यूझिलंड यांच्यातील सामन्याने झाला. इंग्लंडचा जलदगती गोलंदाज डॉमिनिक कॉर्क याने पहिला चेंडू फेकला याचा अर्थ न्युझिलंडची प्रथम फलंदाजी होती.
सन १९९९ च्या सातव्या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात यजमान इंग्लंड व श्रीलंका यांच्यातील लढतीने झाली. प्रथम फलंदाजी श्रीलंकेेची होती, तर पहिलं षटक इंग्लिश जलदगती गोलंदाज डॅरेन गॉगने टाकले.
सन २००३ ची स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली. या स्पर्धेत श्रीगणेशाचा सामना यजमान द. आफ्रिका व विंडीज यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी वेस्ट इंडिजची असल्याने दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीची सुरुवात जलदगती गोलंदाज शॉन पोलॉकने केली. भारत या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाला हे आपणास आठवत असेलच.
सन २००७ मध्ये वेस्ट इंडिजने यजमानपद मिळविले होते. या स्पर्धेत यजमान विंडीज व पाकिस्तान पहिल्या लढतीत आपसात भिडले. पाकिस्तानचा जलदगती गोलदाज उमर गुल प्रथम फलंदाजी करणाऱ्या विंडीजच्या डावात पहिलं षटक टाकणारा गोलंदाज होता.
सन २०११ ची स्पर्धा जिंकून भारताने आपले दुसरे विश्वविजेेतेपद मिळविले हे आपणास ठाऊक आहेच. या स्पर्धेची सुरूवात यजमान भारत व बांगलादेश या सामन्याने झाली. प्रथम फलंदाजी भारताने निवडल्याने बांगलादेशकडून पहिला चेंडू फेकण्याचा मान त्यांचा तेज गोलंदाज शफीउल इस्लाम याला मिळाला.
सन २०१५ च्या स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया व न्यूझिलंडने भूषविले व अंतिम लढतीत हेच दोन संघ भिडले. अंतिम सामना यजमान देशांदरम्यान होण्याचा हा विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातला पहिलाच प्रसंग ठरला. या स्पर्धेची पहिली झुंज यजमान न्यूझिलंड व श्रीलंका यांच्यात झाली. प्रथम फलंदाजी न्यझिलंडच्या
वाटयाला गेल्याने श्रीलंकेकडून नुवान कुलशेकराने आक्रमणाची सुरुवात केली.
सन २०१९ च्या स्पर्धेची सुरुवात एका चमत्कारीक प्रयोगाने झाली. पहिल्या अकरा स्पर्धात जलदगती गोलंदाजांनी आक्रमणाची सुरुवात केली होती. मात्र या स्पर्धेत पूर्वीचे सर्व संकेत झुगारुन दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यूूफ्लेसिसने फिरकी गोलंदाज इम्रान ताहीच्या हाती चेंडू सोपवून इतिहास घडविला. सदर सामना यजमान इंग्लंड व द. आफ्रिका यांच्यात खेळविण्यात आला.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
