Halloween party ideas 2015


सावधान ! येत्या ४८ तासात रायगड जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा संभाव्य धोका नागरिकांनी घराबाहेर पडू नये : तहसीलदार प्रियांका आयरे

बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) राज्यासह संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे महाभयंकर संकट घोंगावत असताना आता संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील सर्व गावांना नवीन संकटाचा सामना करावा लागणार आहे. तो म्हणजे महाभयंकर विनाशकारी ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा. सदर निसर्ग चक्रीवादळ मंगळावर दिनांक ०२ जून २०२० सायंकाळी ०५ वाजल्यापासून ते गुरुवार दिनांक ०४ जून च्या दरम्यान कोकण किनारपट्टीवर येऊन धडकणार आहे. या मध्ये विशेष करून बुधवार दिनांक ०३ रोजी हे निसर्ग चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर येवून धडकणार आहे. सदर निसर्ग चक्रीवादळाची वेग मर्यादा ताशी शंभर ते एकशे तीस - चाळीस प्रती तास असू शकते. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पर्जन्य वृष्टी होऊ शकते. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या सर्व गावांना याचा मोठा फटका बसण्याची मोठी शक्यता आहे. या निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर माननीय रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी मॅडम यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेला सतर्कतेच्या दिलेल्या सूचनेनुसार माणगांव तालुक्याच्या माननीय तहसीलदार प्रियांका आयरे मॅडम यांनी तात्काळ माणगांव तालुक्यातील सर्व विभागांचे प्रमुख, आपत्कालीन यंत्रणा आणि माणगांव तालुक्यातील सर्व पत्रकार यांची मंगळवार दिनांक ०२ जून रोजी मिटींग घेऊन त्यांना संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या धोक्याची सविस्तर माहिती देऊन या संकटाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणेला सतर्कतेचा इशारा आणि या संदर्भातील लोक जनजागृती संबंधी सूचना दिल्या.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन व रोहा या ७ तालुक्यांतील किनार्‍यालगतच्या गावांमधील नागरिकांना आज ०२ जून रात्री सायंकाळी ५ वाजल्यापासून ०३ व ०४ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
या संदर्भात रायगडच्या जिल्हाधिकारी माननीय निधी चौधरी मॅडम यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये हा मनाई आदेश लागू केला आहे. ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे होणारे नुकसान व जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने (सदर चक्रीवादळाचा किनार्‍यापासून ०५ किमी क्षेत्रात असलेला अधिकचा प्रभाव विचार घेता) सागरी तसेच खाडी किनार्‍यावरील अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यातील खाडी, समुद्र किनार्‍यालगतच्या गावांमधील नागरिकांना ०२ जून रोजी रात्री १२ वाजल्यापासून ०३ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत घराबाहेर पडण्यास तसेच त्यांच्या पाळीव प्राण्यांना मोकळ्या जागेत सोडण्यास मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.
हा आदेश शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस, आरोग्य सेवा व अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक, कोरोना विषाणूंचा संसर्ग टाळण्यासाठी कार्यरत संबंधित आपत्ती निवारण व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिलेल्या व्यक्तींना लागू असणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती कलम १८८ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ सह अन्य कायद्यातील तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशान्वये देण्यात आला आहे.
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सतर्कतेच्या सूचनेनुसार माणगांव तालुक्याच्या माननीय तहसीलदार प्रियांका आयरे मॅडम यांनी माणगांव तालुक्यातील सर्व सरकारी निमसरकारी खात्यांचे प्रमुख व सर्व आपत्कालीन यंत्रणेला या संदर्भात मिटींग घेऊन या संदर्भातील खबरदारी आणि आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. त्याच बरोबर माणगांव तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना आणि वार्ताहर/ प्रतिनिधी यांची मिटींग घेऊन त्यांना निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्धारित वेळेत नागरिकांनी घ्यावयाची काळजी, खबरदारी, घराबाहेर न पडण्याच्या सूचना व सविस्तर माहिती देऊन या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून जाणीव जागृती करण्या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.