कसोटी क्रिकेट हे खेळाडूच्या कौशल्याबरोबरच शारीरीक व मानसिक सदृढतेची परीक्षा घेणारे फार मोठे व्यासपिठ आहे. हे जरी सत्य असले तरी नशिबाची साथ लाभणे हे देखील त्याच्यासाठी फार महत्त्वाचे असते. फलंदाजी हा क्रिकेटचा मुख्य गाभा असला तरी त्या फलंदाजीला आपल्या कलात्मकतेने साजश्रृंगार करणारा फलंदाज हा एक माणूसच असतो. फलंदाज कितीही प्रातिभावान असला तरी त्याला सजवणाऱ्या माणसाला कुठेतरी मर्यादा असतातच.
कसोटीत शतक -द्विशतक -त्रिशतक करणारे अनेक फलंदाज आपण बघितले आहेत. तसेच शतक व द्विशतका जवळ जाऊन ते हुकलेले कमनशिबी खेळाडूही आपण बघितले आहेत. मात्र त्रिशतका जवळ जाऊनही ते त्यांच्या नशिबी नसलेले पाच खेळाडू या क्रिकेट विश्वाने उघडया डोळ्यांनी पाहिले आहे. या पाच जणातला एक तर इतका दुर्देवी ठरला की बिचारा २९९ धावांवर बाद झाला. आजच्या या लेख प्रपंचात याच पाच अभागी खेळाडूंच्या धिरोदात्त खेळीची पण चुटपुट लावणाऱ्या हुकलेल्या त्रिशतकाची कहाणी वाचू या.
कसोटी सामन्यात त्रिशतक हुकलेला पहिला खेळाडू आहे विंडीजचा धडाकेबाज फलंदाज विव्हीयन रिचर्डस. सन १९७६ मध्ये इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळला. ३८२ चेंडूंना तोंड देऊन ३८ चौकार तडकवले पण २९१ धावांवरच डेरेक अंडरवुडने त्याचा त्रिफळा उडवून त्याची खेळी संपुष्टात आणली.
सन २००९ च्या मोसमात वेस्ट इंडिजचा फलंदाज रामनरेश सरवनने ब्रिजटाऊन येथे इंग्लंड विरूध्दच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४५२ चेंडूचा सामना करत ३० चौकार व २ षटकारांनिशी २९१ करून बाद झाला. अवघ्या ९ धावांनी हुकलेले त्याचे त्रिशतक त्याच्या बरोबर सर्वांनाचा दुःखी करून गेले.
सन २००९ मध्ये श्रीलंकेविरूध्द मुंबईच्या वानखेडे स्टेडीयम भारताचा खंदा सलामीवीर विरेंद्र सेहवाग २९३ धावांची तडाखेबाज खेळी खेळला. अवघ्या २५४ चेंडूत ४० चौकार व ७ षटकार त्याने त्या डावात लगावले. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने त्याला बाद केले होते. त्यानंतर त्याने कसोटीत दोन त्रिशतके झळकवली.
इंग्लंडचा तत्कालीन सलामीवीर अलिस्टर कुक सन २०११ मध्ये बर्मिंगहॅम कसोटीत भारताविरूध्द खेळताना २९४ धावांवर बाद झाला. ईशांत शर्माच्या चेंडूवर सुरेश रैनाने त्याचा सुरेख झेल घेतला. या खेळीत त्याने ३३ चौकार मारले होते.
वरील चार फलंदाजांचे त्रिशतकं ९, ९, ७, ६ धावांनी हुकले. तरीही आपणास फार वाईट असलेे असेल. मात्र न्यूझिलंडचा दिग्गज फलंदाज मार्टीन क्रो हा फार कमनशिबी खेळाडू ठरला. सन १९९१ मध्ये श्रीलंकेविरूध्द मायदेशात वेलिंग्टन येथे २९९ धावांवर बाद झाला. अवघ्या एका धावेने त्रिशतक हुकलेला तो कसोटी जगतातील एकमेव दुर्देवी फलंदाज आहे. २९९ धावांची हि मॅरेथॉन खेळी सजवताना मार्टीनने ५२३ चेंडू खेळून २९ चौकार व ३ षटकार मारले होते. हीच त्याची कसोटीतील सर्वोच्य खेळी ठरली.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
