Halloween party ideas 2015


आत्महत्या आणि मानवी हक्क

आताच्या काळात समाजात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. माणूस प्रमाणापेक्षा जास्त निराश झाला आणि त्याला काही मार्ग मिळाला नाही तर तो आत्महत्येचा मार्ग स्वीकार करतो. अशा या आत्महत्या प्रयत्नपूर्वक रोखायला हव्यात. त्यासाठी काय करता येईल हा विचार होणे आवश्यक आहे.
प्रत्यक्ष आत्महत्येची कारणे अनेक असली तरी बहुतेक घटनांमध्ये संबंधित व्यक्तीची वैफल्यग्रस्त मानसिक अवस्था हा महत्त्वाचा समान धागा आढळून येतो.काही वेळा त्या व्यक्तीला संवाद करायला कोणी मिळत नाही,काही वेळा मदत वेळेवर मिळत नाही. आपण कोणांकडे मदत मागावी हे कळत नाही किंवा काही वेळा मदत मागणे हे कमीपणाचे वाटते. काही वेळा त्या व्यक्तीच्या वागण्याबोलण्यातून त्याची अस्वस्थता व्यक्त होत असली तरी त्यांना जवळची माणसे फार गंभीरपणे घेत नाही.आपल्याला कोणी समजून घेत नाही, आपले कोणी नाही असा विचार करता करता व्यक्ती एवढा निराश आणि हताश होता की त्याला काही मार्ग दिसत नाही अशावेळी मग व्यक्ती आत्महत्या सारखा अवघड पर्याय निवडतो.कोणालाही स्वतः चा जीव देणे सोपे नाही. आत्महत्या करताना त्याचा जीव गेला तर तो मोकळा होतो. परंतु जर तो त्यातून वाचला तर त्याला सामाजिक मानहानी आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते.
व्यक्ती वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या करतो,त्यात सामाजिक, आर्थिक, अध्यात्मिक अशी बरीच कारणे आहेत.
१)रँगिंगला कंटाळून.
२)सासरच्या जाचाला कंटाळून.
३)शेतकरी असेल तर सतत पडणाऱ्या दुष्काळाला किंवा बँकेच्या कर्जाला कंटाळून.
४) सततच्या दुखाण्यात वाढ झाल्यास.
५)आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांच्या सततच्या जाचाला कंटाळून.
६)परीक्षेत कमी मार्क मिळाले अथवा आपण नापास झाल्यामुळे आईवडील ओरडतील या भीतीने.
७)प्रेमभंग झाल्याने निराश होणे.
८) आपल्याला अधिकार मिळावा किंवा राग ,विरोध व्यक्त करण्यासाठी, उपोषण करताना अन्न आणि पाण्याचा त्याग करणे.
९) एखाद्या साधूने जिंवत पणी समाधी घेणे.
१०)आत्यंतिक गरिबी किंवा मादक पदार्थांच्या आहारी जाणे.
अशी अनेक कारणे असतात की व्यक्ती आत्महत्या करतो परंतु असे असेल तरी असा विचार करणारी व्यक्ती ही मनाने कमकुवत असते. मनाला निराश करणाऱ्या आत्महत्यांच्या या घटनेचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र होत आहे.या संदर्भात अभ्यास केला असता आणि उपलब्ध माहितीनुसार असे दिसते की आपल्या देशात बिहारमध्ये जास्त आत्महत्या होतात तर महाराष्ट्र यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.गुन्हे अन्वेषण विभागाच्या वार्षिक अहवालानुसार सन २०१२ सालचा विचार केला तर एकूण १६ हजार ११२ व्यक्तींनी आत्महत्या केल्या त्यात ११ हजार ३०४ पुरुष व चार हजार महिला होत्या, तर तेच प्रमाण २०१३ साली यात ५१० म्हणजे ३% ने वाढ झाली. आणि २०२० येईपर्यंत किती तरी पटीने हा आकडा वाढलेला दिसून येतो.
आजपर्यंत भारतीय दंड विधानाच्या कलम ३०९ अंतर्गत आत्महत्या करणे हा कायदेशीर गुन्हा मानला जातो.यासाठी संबंधित व्यक्तीला एक वर्ष तुरुंगवास अथवा दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची कायदयात तरतूद आहे.विधीमंडळाने १९७१ सालापासून ही तरतूद घटनाबाह्य असून ती रद्द करावी असा प्रयत्न केला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रश्न अपूर्ण राहिला. १९९४ साली सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात आपला एक विचार मांडला होता.अशा प्रकारच्या गुन्हेगार व्यक्तीला शिक्षा देताना सहदयतेने विचार करावा अशा व्यक्तीच्या दुर्बल मानसिक स्थिती लक्षात घेऊन त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत,समुपदेशन व इतर उपचारांची संधी उपलब्ध करून देणे .अशा प्रकारे विचार मांडून त्याप्रमाणे सूचना केल्या.
जागतिक पातळीवर आत्महत्या आटोक्यात आणण्यासाठी "डब्ल्यूएचओ" या आंतरराष्ट्रीय संस्थेनेसुद्धा या विषयात अनेक मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेतला. व अनेक देशांनी याविषयीच्या कायदयात बदल करावेत अशा सूचना केल्या. भारताबाहेर अनेक देशांतील कायदयात बदल केले गेले. भारताशिवाय पाकिस्तान, बांगलादेश, मलेशिया, सिंगापूर या देशात मात्र अजूनही बदल घडून आले नाही.एखाद्या व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न फसला त्यावर कायदयाचा बडगा दाखवून त्याच्यावर फौजदारी कारवाई करून शिक्षा करणे हे पूर्णपणे असंवेदनशीलतेचे लक्षण आहे. पण त्याचबरोबर मिळालेले जीवन अतिशय मौल्यवान असल्यामुळे असा गुन्हा घडला तर त्याकडे गंभीरतेने न पाहणे हेही मानवी हक्कांविरुदध आहे असेही मानण्याचा काहीचा कल आहे.अशावेळी त्या संबंधित व्यक्तीला कठोर शिक्षा न करता अशा व्यक्तीला पुन्हा नव्याने आयुष्य घडवण्यास संधी देणे, तसे सातत्याने प्रयत्न करणे हाच या समस्येवर उपाय आहे.
एखाद्या व्यक्तीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे हा सुद्धा एक दखलपात्र गुन्हा आहे,आणि त्यासाठी कायदेशीर कारवाई होऊ शकते. गुन्हेगाराला अनेक प्रकारच्या शिक्षा ठोठावण्याच्या कायदयात तरतूद आहे.कलम ३०५ अंतर्गत अल्पवयीन व्यक्ती, मानसिक रुग्ण शुद्धीवर नसलेल्या व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी भाग पाडणाऱ्या गुन्हेगाराला फाशी, आजन्म कारावास अथवा १० वर्ष तुरुंगवास व दंड देण्यात येतो. तसेच कलम ३०६ अंतर्गत कोणालाही आत्महत्या करण्यास गुन्हेगाराला १० वर्ष तुरुंगवास आणि दंड देण्याची तरतूद आहे.
आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी वेगवेगळ्या थरांतून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय होणे, नियम करणे गरजेचे आहे ज्यामुळे पीडित व्यक्तींना दिलासा मिळेल. तसेच समाजातील अनेक घटकांनीही पुढे आले पाहिजे. प्रखर सामाजिक जाणीव असेल तर सर्व थरांतून निश्चितच बदल घडतील. एकांगी विचाराने किंवा प्रयत्न करुन हा गंभीर प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी सर्व बाजूंनी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थाने या समस्येवर काही प्रमाणात उपाययोजना होईल.आत्महत्या केलेल्यांच्या आकडेवारीमध्ये स्त्री आणि पुरुष यांची संख्यात्मक विभागणी केल्यास असे लक्षात येते की यात जवळपास६४% पुरुषांंनी आत्महत्या केल्या म्हणजेच स्त्रियांपेक्षा पुरुषांचे प्रमाण जास्त आहे.
"इच्छामरण" कायदा करताना आत्महत्या करणे हे कलम अडथळा ठरत होते. सदर कलम रद्द केल्यानंतर इच्छामरण कायदा पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने सदर कलम रद्द करण्यासाठी विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची मान्यता घेतली असली तरी अजूनही याबाबतचे विधायक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर होऊन त्यावर राष्ट्रपतीची सही होणे आवश्यक आहे त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे.
आत्महत्येचा विचार मनात येणाऱ्या व्यक्तीला त्याच्या आत्मघातकी मनोवृत्तीपासून परावृत्त करुन त्यांना समाजात सुस्थिर होण्यासाठी मदत करणारी "गुड सँमँरेटन"नावाची एकच संस्था आज महाराष्ट्रात आहे. अप्रत्यक्ष रीतीने अनेक संस्था व सामाजिक कार्यकर्ते हे काम करतात.
आत्महत्या ही एक प्रकारची असंवेदनशीलतेची परिणती आहे .लाँकडाऊनमुळे सर्व व्यवहार आणि पैशाचा ओघ थांबला आणि त्यामुळे काही जणांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. यात काही जणांनी तर स्वतः च्या कुंटुंबाला सोबत घेऊन आत्महत्या केली. आयुष्यात अनेक वाईट अनुभव येतात त्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे,आणि यासाठी आपण सगळयांनी प्रयत्न केले पाहिजे.परमेश्वराने आपल्याला एक छान आयुष्य दिले आहे त्याचा असा अंत करणे योग्य नाही. आणि या गोष्टीचा ज्याला बोध होईल तोच खऱ्या अर्थाने आपले आयुष्य जगेल.

लेखिका
अमिता कदम
प्राध्यापिका
(Venus world school )
हडपसर, पुणे.
9819395788.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.