Halloween party ideas 2015


पंचाच्या एकतर्फी चुकांचा पंचनामा
क्रिकेटमध्ये नियमान्वये पंचाला न्यायदेवतेचा दर्जा दिला आहे. याचा अर्थ सरळ आहे की पंचाने आपला निर्णय देताना पक्षपातीपणा करायचा नसतो. वास्तव घटनेला धरून योग्य संघाला न्याय देणे पंचाचे पहिले कर्तव्य असते. पंच हाही एक माणूसच असल्याने त्यांच्याकडून चुका होऊ शकतात, परंतु जर पंच जाणून बुजून चुकीचे निर्णय द्यायला लागले तर ? चांगल्या संघावर अन्याय होऊ शकतो. नको तो संघ जिंकला जातो. कधी कधी पंचाच्या चुकीच्या निर्णयाने हैरान झालेले क्रिकेटपटू भर मैदानात पंचाशी हमरा तुमरी करतात. परंतु यामुळे पंचावर विशेष परिणाम होत नाही, कारण पंचानी दिलेला निर्णय अंतिम असल्याने खेळाडूंना तो मानावाच लागतो. उलट पंचाशी गैरवर्तन केल्याच्या सबबीखाली खेळाडूंवरच कारवाई होते. त्यात आर्थिक व सामना बंदी यांचा समावेश असतो. आजकाल दूरचित्रवाणीच्या साह्याने तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. परंतु त्यालाही काही मर्यादा असतात.
प्रस्तुत लेखात संपूर्ण क्रिकेट विश्वाला झटका देणाऱ्या पंचाच्या काही ठळक चुकांचा पंचनामा आज आपण बघणार आहोत.
सन २००१ सालच्या न्यूझिलंड व इंग्लंड यांच्या दरम्यान झालेल्या ऑकलंड कसोटीत पंचानी एक अतिशय चुकीचा निर्णय देत इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्रयू फ्लिंटॉपला अक्षरशः लाटलं. फ्लिंटॉप २९ धावांवर फलंदाजी करत असताना आंद्रे अॅडम्सच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक एडम परोरेने झेल घेतल्याचे जोरदार अपिल केले. यावर पंचानी कुठलाही मागचा पुढचा विचार करता फ्लिंटॉपला बाद दिले. नंतर रिप्लेत बघितल्यावर समजले की चेंडू व बॅट यांच्यात जवळ जवळ सहा इंचाचे अंतर होते.
सन २००३ ची ऑस्ट्रेलियाविरूध्द भारत ही ब्रिस्बेन येथे खेळलेली कसोटीही पंचाच्या चुकीच्या निर्णयाने गाजली. विंडीजचे तटस्थ पंच स्टिव्ह बकनर यांनी सचिन तेंडुलकरला बाद देताना अति घाई केली. सचिन वेगवान गोलंदाज जेसन गिलेस्पीचा एक चेंडू सोडून देत होता, परंतु तो चेंडू सचिनच्या पॅडवर आदळला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं अपिल होताच पंच बकनर यांचं बोट आकाशाकडे गेले. या निर्णयावर सचिनही चकीत झाला. त्यानंतर हॉकआय तंत्रज्ञानाने दूरचित्रवाणीवर स्पष्ट दाखविले की चेंडू स्टंप्सच्या खूप उंचावरून जात होता. तर रिप्लेने गोलंदाज गोलंदाज गिलेस्पीचा पायही पॉपिंग क्रिझच्या पुढे पडल्याचे दाखविल्याने पंच बकनर यांचे पितळ उघडे पडले. म्हणजे चेंडूही नोबॉल होता. त्यावर सचिनला बाद दिले. क्रिकेट इतिहासातील हा पंचानी दिलेला सर्वात वाईट निर्णय होता.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ असताना पाकिस्तानी पंच अलिम दर यांनी असाच एक चुकीचा निर्णय भारताच्या विरोधात दिला होता. दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज फलंदाज एबी डिव्हीलर्स फलंदाजी करत असताना झहीर खानचा एक चेंडू त्याच्या बॅटचं चुंबन घेत स्लिपमधील सचिन तेंडुलकरच्या हातात विसावला. चेंडू व बॅटच्या मिलनाचा जोरदार आवाजही झाला. तरी पंच दर यांनी फलंदाज नाबाद असल्याचा कौल दिला. नंतर दुरचित्रवाणी रिप्लेत अलिम दर यांचा निर्णय साफ चुकल्याचे स्पष्ट दिसले.
सन २०१२ मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पाकिस्तानी पंच अलिम दर यांनी झहीर खानबाबत पुन्हा एक ऐतिहासीक वादग्रस्त निर्णय दिला. फरक इतकाच होता की या वेळी झहीर गोलंदाजी नव्हे तर फलंदाजी करत होता. तर गोलंदाज होता इंग्लंडचा फिरकीपटू ग्रॅमी स्वान. झहीरने स्वानचा चेंडू फटकविण्याचा प्रयत्न केला. अपिल होताच पंचांनी चांगला विचार करून निर्णय दिला. झहीर बाद होऊन परतला. नंतर टिव्ही रिप्लेत चेंडू व बॅट यातील अंतर जवळजवळ सहा इंचाचे दिसले.
मैदानी पंचाच्या कामगिरीला काळिमा फासणारी कामगिरी सर्वात अनुभवी पंच श्रीलंकेच्या कुमार धर्मसेनाने केली. सन २०१६ च्या बांगलादेश व इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीत इंग्लंडचा मोईन अली फलंदाजी करत होता, गोलंदाज होता बांगलादेशचा साकीब अल हसन. साकीबने मोईन विरूध्द तीन वेगवेगळ्या चेंडूवर पायचितचे अपिल केले, तिनही वेळेस पंच धर्मसेनाने मोईनला बाद दिले. त्या तिनही चेंडूवर मोईनने रिव्हयू घेतले व तिनही वेळा टिव्ही पंचानी त्याला नाबाद ठरविले.
           पंचाच्या पक्षपातीपणाचे असे अनेक प्रसंग क्रिकेटच्या रणांगणावर घडले आहेत. परंतु हे अतिशय किळसवाणे निर्णय होते की जे आपल्याला सांगणे अगत्याचे वाटले.
     
लेखक : -
दत्ता विघावे 
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट, 

मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.

Email:  dattavighave@gmail.com

मोबाईल. ९०९६३७२०८२.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.