टि-२०, वनडे व कसोटी हे क्रिकेटचे तीन प्रकार आहेत, हे आपणांस ठाऊक आहेच. यापैकी तिनही प्रकारात देशाच्या राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व करावं हे त्या संबंधीत खेळाडूचं स्वप्न असतं. सुरुवातीला यापैकी एका प्रकारात त्याला संधी मिळते. मग त्यात जर त्याचे प्रदर्शन चांगले झाले तर त्याला दुसऱ्या प्रकारात संधी दिली जाते. सुरूवातीला खेळाडूच्या खेळण्याच्या शैलीनुसार त्याला तिन्हीपैकी एका प्रकारात संधी मिळते.
टि-२० क्रिकेट येण्यापूर्वी कसोटी व वनडे हे दोनच प्रकार होते. त्यामुळे खेळाडू चाचपायला सोपे जायचे. वनडेत चांगला खेळला तर त्याला क्रिकेटचे मुख्य प्रारूप कसोटीत संधी दिली जायची. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात वरील दोन्ही प्रकारात चमकलेले अनेक खेळाडू आहेत. तर काही जण दोन्हीपैकी एकातच यशस्वी झाले. त्यापैकी चार असे खेळाडू आहेत की ज्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये अतिशय दैदिप्यमान यश मिळविले. नंतर त्याच कामगिरीच्या भांडवलावर त्यांना कसोटीत संधी मिळाल्यावर आपले बस्तान बसविता आले नाही.
आजच्या या लेखात वनडेत हिरो ठरलेल्या परंतु कसोटीत झिरो साबीत झालेल्या याच खेळाडूंविषयी जाणून घेऊया.
सन १९९० च्या दशकात एक अफलातून क्षेत्ररक्षक, सलामीचा विश्वसनीय फलंदाज म्हणून अजय जडेजाने एकदिवसीय सामन्यात चांगलीच छाप पाडली होती. भारताचे अनेक सामन्यात त्याने नेतृत्वही केले. १९६ एकदिवसीय सामन्यात सहा शतकांसह ५३५९ धावा बनवून त्याने त्याचे कर्तव्यही योग्य प्रकारे बजावले. त्याच जोरदार खेळाच्या बळावर निवड समितीने त्याला कसोटीत अजमावण्याचा निर्णय घेतला. कसोटीत त्याला बऱ्यापैकी संधीही दिली परंतु १५ कसोटयात केवळ ५७६ धावा त्याला करता आल्या.
आशिष नेहरा हा भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज होता. अतिशय प्रतिभावान असलेल्या नेहराने सन २००० च्या सुरुवातीला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. एकदिवसीय सामन्यात जोरदार कामगिरी करत त्याने चांगल्या पैकी नावही कमावले. सन २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड विरूध्द घेतलेले ६ बळी त्याच्या गुणवत्तेची झलक दाखवून द्यायला पुरेशे आहेत. परंतु १८ वर्षाच्या त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत तंदुरुस्तीच्या कारणाने त्याला फार सतावले त्यामुळे त्याला पात्रता असूनही संघात कायमस्वरूपी स्थान बनवता आले नाही. १२० एकदिवसीय सामन्यात १५७ बळी घेत त्याने बऱ्यापैकी यश मिळविले. परंतु कसोटीत संधी मिळताच तोच जोश त्याला दाखविता आला नाही. १७ कसोटीत फक्त ४४ बळी तो मिळवू शकल्याने त्याला कसोटीत मोठी संधी मिळाली नाही.
सन २००५ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी सुरेश रैनाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आगमन केले.जबरदस्त क्षेत्ररक्षण व मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज असलेला रैना चांगल्या पैकी डावखुरी फिरकी गोलंदाजीही करायचा. २२६ एकदिवसीय सामन्यात ३५.५१ च्या सरासरीने ५६१५ धावा काढल्या. सन २०१० मध्ये कसोटीत पदार्पणातच शतकी तडाखा देत मोठया आशा निर्माण केल्या. परंतु तोच जोश त्याला पुढे टिकविता आला नाही. १८ कसोटयात २६.४८च्या मामुली सरासरीने केवळ ७६८ धावाच त्याला काढता आल्या.
नैरोबीत सन २०००- २००१ मध्ये वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूध्द धडाक्यात सुरू करणारा युवा युवराजसिंग पुढे जात भारताचा सफेद चेंडूच्या खेळाचा संकट मोचक ठरला. त्याच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर भारताने सन २००७ चा टि-२० व सन २०११ चा वनडेचा विश्वकरंडक जिंकला. त्याच्या बॅटचे तडाखे जगभरातील तमाम संघांनी अनुभवले. हाच युवराज त्याच्या वैयक्तीक जीवनात कॅन्सरसारख्या दुर्धर आजारानेही त्रस्त होता.
युवराज ३०४ एकदिवसीय सामने खेळला. त्यात ८७०१ धावा फटकविल्या मात्र हाच जोश त्याला कसोटीत दाखविता आला नाही. ४० कसोटीत त्याला संधी मिळाली पण धावा मात्र १९०० बनविल्या. त्यामुळे निवड समितीने त्याला कसोटीत परत निवडलेच नाही.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
