सचिन रमेश तेंडुलकर भारतीय क्रिकेटचा कोहीनूर हिराच नव्हे तर खराखुरा भारतरत्न होता व अखेर बनलाही ! निवृत्त होऊन सात वर्ष होत आलीत, त्याने रचलेले काही विक्रम मोडीत निघालेत तर काहींच्या भोवती संकटाचे ढग जमा झाले आहेत. तरीही सचिनचे महात्म्य जराही कमी झाले नाही. त्याचे फलंदाजीतील विक्रम कदाचित मोडलेही जातील परंतु जो खेळाडू सचिनचे ते विक्रम मोड़ील तोच खेळाडू सचिनने गोलंदाजीत केलेल्या पराक्रमाच्या जवळपासही फिरकण्याची सुतरामही शक्यता नाही. शिवाय सचिनचा शांत, संयमी स्वभाव, सर्वांचा आदर करण्याची कला हे सगळं अजबच ! हे गुण तर त्या खेळाडूत असणे जरा कठीणच. म्हणजे याचा अर्थ सरळ होतो की सचिन इज सचिन ! सचिन इज अलवेज ग्रेट !!
सचिनने कसोटी व वनडेत विक्रमांचा एवरेस्ट उभा केला हे सर्वश्रूत आहे. परंतु गोलंदाज म्हणून सचिनने केलेल्या पराक्रमाकडे कोणाचेही विशेष लक्ष गेलेच नाही. छोट्या चणीचा खेळाडू सचिनला तर फलंदाजाऐवजी वेगवान गोलंदाज व्हायचे होते त्याचा मोठा भाऊ अजित व कोच रमाकांत आचरेकर यांनी त्याच्यातील प्रतिभा ओळखून फलंदाज म्हणून सचिनच्या पैलूवर काम केले. त्याचाच परिपाक म्हणजे सचिन सारखा जगविख्यात फलंदाज नावारूपास आला. परंतु सचिनने आपल्या आवडत्या गोलंदाजीकडे जराही दुर्लक्ष होऊ दिले नाही. हे त्याच्या गोलंदाजीतील आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईलच.
सचिन उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी शिवाय खेळपट्टीचे स्वरूप बघून लेग स्पीन व ऑफ स्पीन या दोन्ही प्रकारे गोलंदाजी करू शकायचा. त्याच्या प्रदिर्घ कारकिर्दीत त्याने २०० बळी मिळविले आहेत. त्यामध्ये वनडेत १५४ तर कसोटीत ४६ बळी त्याच्या खात्यात जमा आहेत. प्रस्तुत लेखात त्याने गोलंदाजीत केलेल्या दुर्लक्षित पराक्रमांवर एक नजर टाकूया.
सामन्याच्या निर्णायक क्षणी शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला चांगले चांगले गोलंदाज कचरतात पण या आणीबाणीच्या प्रसंगीही सचिनने टिच्चून मारा करताना अशक्य कोटीतले विजय भारताला मिळवून दिले आहेत. सन १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द शेवटच्या षटकात सहा धावांचा बचाव करताना सचिने अवघ्या तीन धावा दिल्या व भारताला विजय मिळवून दिला. सन १९९७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूध्दही अशीच परिस्थिती होती. तेव्हाही सचिनने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा शेवटचा गडी बाद करून भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला होता.
सचिन तेंडुलकर जवळ विरोधी संघाची जमलेली जोडी तोडण्याची मोठी कला होती. म्हणून त्याला गोल्डन आर्म बोलर म्हणून गणले जायचे. परंतु फलंदाज म्हणून त्याच्यावर असलेला संघाचा भार बघता तो गोलंदाजीवर खास लक्ष पुरवू शकला नाही. त्यामुळे त्याच्यात एक गोलंदाज म्हणून असलेल्या प्रतिभेला तो न्याय देऊ शकला नाही. अन्यथा सचिन एक महान गोलंदाज म्हणूनही नावाजला असता.
सन २००४ च्या आशिया चषक स्पर्धेत सचिनने निव्वळ फिरकी गोलंदाज म्हणून संघात घेतलेल्या फिरकीपटूंपेक्षा टिच्चून गोलंदाजी करताना सर्वाधिक १२ बळी पटकविले. त्याच्यापेक्षा सर्वाधिक १४ बळी घेणारा इरफान पठाणच काय तो त्याच्या पुढे होता. यावरून त्याची गोलंदाजीतील चमकही सर्वांसमोर आली.
दोनशे कसोटयात ४२४० चेंडू टाकून ५४.१७ च्या सरासरीने ४६ बळी त्याने घेतले आहेत. दहा धावात ३ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. शिवाय त्याने ११५ झेलही पकडले.
एक दिवशीय सामन्यात ८,०५४ चेंडू टाकून ४४.४० च्या सरासरीने १५४ बळी त्याने मिळविताना डावात ५ बळी घेण्याची किमया दोनदा केली. ३२ धावात पाच बळी ही त्याची वनडेतील सर्वोत्तम कलाकारी होय. क्षेत्ररक्षक म्हणून १३५ झेलही त्याच्या हाती लागले आहेत.
सचिनची गोलंदाजातील ही कामगिरी एखादया गोलंदाजालाही लाजवेल अशी असून नकळत सचिन संघात एक अष्टपैलू खेळाडू म्हणूनच खेळत होता असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
.
