तुरूंगातील अनुभवाने श्रीशांतची हवाच काढली
शांताकुमार श्रीशांत हे नाव भारतीय क्रिकेट रसिकांच्या स्मृतीपटालावरून कधीही हटणार नाही. सन २oo७ च्या पहिल्या टि २० विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत मिसबाह उल हकचा हमखास चौकार देणारा स्कूप याच शांताकुमार श्रीशांतच्या हातात विसावल्यानंतर तमाम भारतीयांना जल्लोष करायची संधी मिळाली. त्या विश्वविजेता बनविणाऱ्या झेलानंतर श्रीशांत अखिल क्रिकेट जगतात रातोरात हिरो बनला होता. त्यानंतर त्याने त्याच्या लढवय्या वृत्तीने व जीगरबाज खेळाने भारताची शान वाढविण्यासाठी केलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद होती. कठीण प्रसंगातही कणखर मानसिकतेच्या बळावर कधीही हार न मानणारा हा योद्धा परिस्थिती स्वतःच्या बाजूने वळवण्यात जीवाची बाजी लावायचा. सन २०१३ पर्यंत भारताचा प्रमुख जलदगती गोलदांज म्हणून तो गणला जायचा. परंतु आयपीएल मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना स्पॉट फिक्सींगचा कचाट्यात सापडला आणि त्यानंतर या दर्जेदार गोलंदाजाच्या क्रिकेट कारकिर्दीच्या अक्षरशः चिंधड्या झाल्या.
स्पॉट फिक्सिंगच्या वादग्रस्त रहस्योद्घाटनानंतर मुळचा केरळवासी असलेल्या श्रीशांतला स्वतःला निर्दोष साबीत करण्यासाठी खूप मोठी कायदेशीर लढाई लढावी लागली. अखेर त्यात तो यशस्वीही झाला. परंतु या दरम्यान त्याला दिल्लीस्थित तिहार तुरुंगात २६ दिवस तुरुंगवास भोगावा लागला. जेलमध्ये त्याला कसं राहावं लागलं याचा अनुभव आपण जाणून घेऊया.
जेलमध्ये असताना श्रीशांत ज्या खोलीत राहात होता तिच्यात काहीही सोयीसुविधा नव्हत्या. अंधाराचं साम्राज्य असलेल्या त्या खोलीत प्रकाशासाठी एक बल्ब लावलेला होता. श्रीशांत तो बल्ब सतत सुरू ठेवायचा. दिवसाही विझवत नव्हता. त्यामुळे त्याला झोपही येत नसे. त्याच कालावधीत त्याने " रोशनी " नावाने एक शानदार गाणेही लिहीले.
जेलमध्ये अनेक प्रकारचे कैदी होते. खून, बलात्कार, दरोडे आदी गुन्ह्यातील कैदी त्या जेलमध्ये होते. अतिशय घाणेरड्या शिव्या ते द्यायचे. त्यांच्या प्रत्येक वाक्यात एक तरी शिवी असायची. त्या लोकांची श्रीशांतला फार भिती वाटायची. परंतु तेथे राहण्याशिवाय पर्यायही नव्हता. यावर त्यानेच एक उपाय शोधला. त्याने होऊन त्या कैद्यांशी बोलायला सुरुवात केली. त्यावर ते कैदी त्याला शिव्या द्यायचे " तुझ्यात काहीच दम नाही, तुझी तर फाटली " असे त्याला शिवराळ भाषेत हिणवायचे. त्यामुळे तब्बल पाच वेळा आत्महत्येचा विचारही त्याच्या डोक्यात आला होता. जेलमध्ये असताना त्याच्या डोक्यात सतत विचार यायचे " हे सर्व झाले कसे ? '' तो मानसिक दृष्ट्या खूप खचला होता. त्याला जगणं नकोसं वाटत होतं.
तिहार तुरुंगातून आल्यानंतरही त्याची मानसिक स्थिती खालावली होती. तो डिप्रेशनमध्येच बराच काळ होता. त्यासाठी त्याला खास वैद्यकीय इलाज करुन घ्यावे लागले.जेलमधून आल्यानंतर जवळजवळ सहा महीने त्याला झोप लागत नसे. विनाकारण तो रडत बसायचा.
त्याच्या आयुष्यात घडलेल्या त्या धक्कादायक प्रसंगानतर त्याच्या भोवताली काय घडतंय हे त्याला समजतच नव्हतं. त्याच्या आवडत्या संगित व गाण्यांनी त्याला डिप्रेशन म्हणून बाहेर पडायला मदत केली. नंतर त्याने चित्रपटातही काम केले. केरळ विधानसभा निवडणुकीत स्वतःचे नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्याला यश आले नाही.
एकंदर अतिशय सुसंस्कृत असलेला श्रीशांत आपली दिशा भरकटला खरा, पण तिहार जेलमधील सव्वीस दिवसांच्या वास्तव्यानंतर मात्र तो चांगल्या पैकी ताळ्यावर आला. सर्वोच्य न्यायालयानेही त्याला निर्दोष ठरविले व बीसीसीआयनेही त्याला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यास संमती दिली. तो भारताच्या मुख्य संघात परतू शकत नसला तरी कलंकरहीत जीवन तो यापुढे जगू शकतो.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.