फलंदाज
रोहीत शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सन २००७ मध्ये सुरुवात झाली. एक मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळताना रोहीतच्या सफेद चेंडूच्या खेळात बऱ्यापैकी धावा होत होत्या. सन २०१३ च्या इंग्लंडमधील चॅपीयन्स करंडक स्पर्धेत त्याला सलामीवीर म्हणून बढती मिळताच त्याच्यातील हिटमॅन जागा झाला. त्याचा फायदा तो करंडक जिंकण्यात भारताला मिळाला व रोहीतला संघात स्थिरावण्यास हक्काची जागा मिळाली. वनडेत सर्वाधीक तीन द्विशतके त्याच्या नावावर आहेत. तर टि-२० मध्येही विक्रमी चार शतकांची नोंद त्याच्या खात्यात आहे. पूर्वी त्याच्या चांगल्या गुणांचा लाभ फक्त सफेद चेंडूच्या खेळातच घेतला जायचा. परंतु सन २०१३ ला विंडीजविरूध्द कसोटी पदार्पण करत त्याने सलग २ कसोट्यात शतके झळकवून झोकात आगमन केले. परंतु हा यशाचा टेंपो त्याला कसोटीत राखता न आल्याने त्याचे कसोटी संघातील स्थान तळ्यात मळ्यात असेच होते. परंतु एका चांगल्या फलंदाजाची कसोटी कारकिर्द मातीमोल होऊ नये म्हणून निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला सलामीला आजमवण्याचा प्रयत्न केला. विशाखापट्टणमच्या पहिल्या कसोटीत संधी मिळताच त्याने खणखणीत १७६ धावांचे दान संघाच्या झोळीत टाकताना मयंक आग्रवालसह प्रथमच सलामीत खेळताना द. आफ्रिकेविरूध्द विक्रमी ३१७ धावांची सलामी दिली. रोहीतच्या या शतकाबरोबरच एक असामान्य विक्रम त्याच्या नावे लागला. वनडे, टि- २० व कसोटीच्या विश्वचषकात शतके नोंदविणारा तो जगातील पहिला फलंदाज बनला. या तिनही विश्वचषकात आजवर रेकॉर्ड आठ शतके ठोकून तो जगातील सर्वच फलंदाजांचा बाप बनला आहे. शिवाय भारताच्या कसोटी संघातही एक सलामीवीर म्हणून त्याची सिट रिझर्व्ह झाली आहे. रोहितच्या कारकिर्दीत अनेक उलथापालथ करणाऱ्या घटना घडल्या असून मधल्या फळीतून कसोटी सलामीवीर म्हणून प्रमोशन मिळाल्यानंतर शतक करणारा तो जगातला सहावा फलंदाज ठरला. तर कसोटी पदार्पणात व सलामीवीर म्हणून पहिलाच कसोटी खेळताना शतक झळकाविणाारा जगातल तो दुसरा फलंदाज बनला आहे. रोहीतच्या पूर्वी ज्या पाच जणांनी मधल्या फळीतून सलामीवीर म्हणून बढती मिळाल्यानंतर शतकी सुरुवात केली अशा पंचरत्नांची ओळख आपण करून घेऊ या.
विरेंद्र सेहवाग : - मधल्या फळीतला फलंदाज म्हणून कारकिर्द सुरू करणारा सेहवाग आपल्या कसोटी पदार्पणातच शतक करणारा खेळाडू होय. शिवाय मधल्या फळीतून सलामीला बढती मिळाल्यानंतरही पहिल्याच सामन्यात शतक ठोकण्याचा दुर्लभ लाभ सेहवागला झाला. असा चमत्कार करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला. तरीही मधल्या फळीत त्याची कामगिरी १० सामन्यात ३७.९ च्या सरासरीने ३७९ एवढी साधारणच होती. मग कर्णधार सौरव गांगुलीने प्रयोग करत सेहवागलासलामीवीर बनवलं. त्यानंतर त्याचे व भारताचे नशिबच उजळले. त्यापुढील १०७ सामन्यात ५०.०४ च्या सरासरीने ८२०७ धावा बनवून सेहवाग भारताचा सुनिल गावस्कर नंतर दोन नंबरचा यशस्वी सलामीवीर बनला.
सायमन कॅटीच: - या ऑस्ट्रेलियन फलंदाजाने सन २००१ मध्ये मधल्या फळीतला फलंदाज म्हणून खेळायला सुरुवात केली. परंतु खराब खेळामुळे तो सन २००५ मध्ये संघाबाहेर फेकला गेला.एवढेच नाही तर सन २००७ मध्ये त्याला मध्यवर्ती करारही गमवावा लागला. मात्र त्यानंतर त्याने देशांतर्गत स्पर्धेत न्यू साऊथ वेल्सकडून खेळताना १५०६ धावा काढून एका ऑस्ट्रेलियन सत्रात सर्वाधिक धावा काढण्याचा मायकेल बेव्हनचा विक्रम मोडला. याचे फळ त्याला लगेच मिळाले. विंडीज दौऱ्यासाठी त्याची निवड झाली. परंतु त्याला सलामीला खेळायला सांगीतले. त्यानंतर एक सलामीवीर म्हणून त्याने ५० च्या सरासरीने २९२८ धावा काढल्या. त्यापूर्वी त्याची सरासरी केवळ ३६ एवढीच होती.
रवी शास्त्री : - सन १९८१ मध्ये न्यूझिलंड दौऱ्यावर एक फिरकी गोलंदाज म्हणून कारकिर्द सुरु करणाऱ्या या भारताच्या विद्यमान प्रशिक्षकाने पहिल्या सामन्यात १० व्या क्रमाकांवर फलंदाजी केली होती. नंतर त्याचा क्रम पुढे सरकतच गेला. त्यानंतर इंग्लंडविरूध्द ६ व्या नंबरवर शतक केले. त्याची प्रगती बघून सन १९८२ मध्ये त्याला सलामीवीर बनविले. सुरुवातीला ३३. २८ ची असणारी शास्त्रीची सरासरी सलामीवीर बनल्यावर ४४.०४ अशी चांगली झाली.
सनथ जयसुर्या : - हा श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज. सन १९९३ मध्ये सर्वप्रथम भारताविरुद्ध सलामीला खेळला. त्यानंतर थोडयाच अवधीत एकदिवशीय सामन्यात श्रीलंकेचा सुपरस्टार सलामीवीर ठरला. त्यानंतर कर्णधार अर्जुना रणतुंगाने रोशन महानामासह त्याला सलामीस धाडले. परंतु त्या सामन्यात १ व ९ अशा १० धावाच करू शकल्याने संघातून हाकलवला गेला. एक वर्षाच्या कालावधीनंतर तो १९९६ मध्ये संघात परतला. त्याने श्रीलंकेला विश्वचषकही मिळवून दिला. शिवाय १९९७ मध्ये भारताविरूद्ध ३४० धावांची खेळी साकारली. शेवटी ४१.४८ अशी त्याची सरासरी पोहचली.
तिलकरत्ने दिलशान : - हा श्रीलंकेचा खेळाडू आपल्या ५२ व्या कसोटीत सलामीवीर बनला. पहिल्या डावात न्यूझिलंडविरुध्द ७२ चेंडूत ९२ केल्या व दुसऱ्या डावात शतक झळकवले. सलामीला त्याने २९ सामन्यात २१७० धावा ४२.५४ च्या सरासरीने ठोकल्या.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.