धोनी सोडा ,बजेट मध्ये " धन" रणआउट झाले .
(भागवत तावरे जेष्ट पत्रकार)
गेली दोन दिवस सर्व देशभक्त भारत न्यूझीलंड सामन्यात आपली देशभक्तीचे प्रतिबिंब पाहत होते , वास्तवात जे देशाचे प्रतिनिधित्व करतात ते खेळाडू ते प्रतिनिधित्व करण्याचे मोल घेतात म्हणजे एका सामन्याचे फक्त एक कोटी वैगेरे , त्यांनी घातलेल्या अंडर पैंटी , बूट , बनियन , कोल्ड्रिंक्स वैगेरे वैगेरे आम्ही देखील घेतो म्हणून उत्पादक कंपन्या त्यांना जाहिरातीचे काही कोटी वरून आणखी देतात , एकूण विचारांची गोळाबेरीज केली तर काय आम्ही त्या क्रिकेट आणि क्रिकेटर्स यांच्यावर प्रेम करतो म्हणून त्यांना हे सर्व मिळते . मात्र त्यांच्यावर एवढे प्रेम केल्याने किवा ते जिंकले हरल्याने आम्हाला काय मिळते ? त्यांना प्रत्येक मिनिटाचा मोबदला मिळत असताना यात मला काय मिळते याचा विचार आम्ही कधी केलाय का ? नाही न ? वरच्या चार ओळी वाचल्या नंतर काहींना वाटेल आपला देश आहे , अभिमान पाहिजे इथेच खरी गोम आहे , आमचे भारतीयत्व केवळ क्रिकेट मध्येच सिद्ध होते का , आम्हाला हे जाणून घेतले पाहिजे कि क्रिकेट देशाचे अवधान केंद्रित करण्याचा खेळ आहे आणि तो पिढीजात आम्हाला खेळवत आला आहे .
खेळाडू धनसंपन्न आणि कीर्तीसंपन्न बनवले . एकीकडे ज्या देशातला शेतकरी आत्महत्या करून मरत असताना देशाचा अभिमान - स्वाभिमान क्रिकेट मध्ये कुणी बरे एकवटला असावा . क्रिकेट अफूची गोळी आहे , केवळ क्रिकेट च्या पायथ्याशी आमची राष्ट्रभावना एकवटते म्हणून जाहिरात क्षेत्र या खेळावर पैसे उधळते मात्र यातल्या आर्थिक व्यवहाराचा आणि सामान्य भारतीयांचा कुठे संबंद आहे काय ? धोनी विराट हि लोक कोण आहेत , विराट कोहली याचे लग्न जगातल्या सर्वात महागड्या हॉटेल मध्ये झाले , ज्या देशाच्या जीवावर तो येवढा श्रीमंत आहे त्याने भारतात किमान लग्न करून मंडप ची सुपारी तरी द्यायची . म्हणजे क्रिकेट मधले पैसे कुणी उधळावेत असी अपेक्षा अजिबात नाही मात्र लोकांनी एखाद्या खेळावर केलेल्या निस्सीम प्रेमाचा कुठे व्यवहार होतो आणि ते निस्सीम प्रेम कशासाठी उधळतो याचा आम्ही विचार करू नये काय ? सामना हरल्यामुळे काल काही लोक कोरभर भाकर कमी खाऊन मातम मनवत असतील तर त्यांनी एकदा स्वतला प्रश्न विचारला पाहिजे हे कुणासाठी कशासाठी . गेली अनेक वर्षे एक खेळ या देशाच्या समाजमनाला मूर्ख बनवत आहे . "सचिन हाय का" म्हणणारे आणि टपरी समोर काळ्या पांढऱ्या टी व्ही पुढे घोळका करणारे आयुष्य भरकटलेली पोर लाखोंच्या घरात आहेत . खेळावर प्रेम असावे ,त्यात राष्ट्रभावना असावी ,मात्र त्यातले अर्थकारण राजकारण आम्ही समजून घेतले पाहिजे . भारत माझा देश आहे म्हणून कुठला क्रिकेटर एकादा सामना मोफत खेळतो का ,नाही . आम्ही हे समजून घेतले पाहिजे . क्रिकेट हा पैश्यांचा खेळ आहे . तीन लाकड आणि ११ माकड असे याच खेळाला म्हटले जाते . क्रिकेट मधील रोमांच, उत्साह ,ओढ, उत्कंठा निश्चित यातला गोडव्याचा भाग आहे . मात्र याच क्रिकेटच्या खांद्यावर या देशाचे राजकारण वाहून नेले जाते यावर आम्ही आता विचार केला पाहिजे . खेळा मध्ये हार जीत असते तुमच्या प्रयत्नांना सलाम करणारे तत्वेत्ते म्हणजे सच्चे भक्त ? क्रिकेट एक षड्यंत्र वाटावे एवढे यात अर्थकारण आहे . सामना हारून बायका पोरांना लंडन फिरवून १० - १० कोटी घेऊन प्रत्येक क्रिकेटर घरी सरकारी विमानाने परतेल . आम्ही विमानतळावर त्यांच्या आरत्या करणारे देशभक्त इथे याचा विचार कधीच करणार नाही कि क्रिकेटच्या नावाखाली आमचे मनुष्यबळ चेंडू चेंडू श्वास रोखून पाहत असते . भारताचे मोदी ते क्रिकेट ,लोकप्रिय या साठी कि जगाला भारत एक बाजारपेठ म्हणून हवी आहे . चीन सारखा देश आमच्या एवढाच लोकसंख्येचा मात्र आम्ही खरेदीदार आहोत आणि तो उत्पादक . पिचकाऱ्या सुद्धा आम्हाला त्यांच्याच असतात ,आमचे मोबाईल चार्जर पासून साध्या पिना देखील चीन मधून येतात . भारत हरल्या नंतर मोदींनी देशाला उद्येशून म्हटले " हार जीत होते रहेती है" मात्र त्यांच्या स्वप्नातील ५ ट्रीलीयन डॉलर इकोनोमी कशी होणार आहे . बातम्या करणारे सुपर मैन पत्रकार, १३० कोटी लोक श्वास रोखून पाहत असल्याचे सांगतात म्हणजे एका खेळासाठी संपूर्ण देश स्तब्ध होणार असेल आणि सामना हरल्यावर जर तर वर ४ तास चर्चा करणार असेल तर या देशाची इकोनामी झालीच ५ ट्रीलीयन . क्रिकेट हि अफूची गोळी आहे . येणाऱ्या पिढीला आम्ही हे सांगितले पाहिजे क्रिकेट एक बिजनेस आहे. आमची राष्ट्रभावना रोज नियम कायदे तोडताना ,फक्त स्वतचा विचार करताना कुठे गेलेली असते . टिबल सीट जाताना आपण आपल्या भारताचा कायदा मोडतो तेव्हा ती देशभक्ती असते का देशद्रोह . विकास कामात भृष्टाचार करणारा अधिकारी नेता भारतीय असतो का त्यात पैसे खायला न्युजीलंड वरून कुणी परदेशी येतो . कफल्लक परिघातून आम्ही बाहेर आले पाहिजे . काही ठराविक लोकांना क्रिकेट मध्ये देशाला व्यस्त ठेवायचे आहे . कारण आम्ही क्रिकेट मध्ये व्यस्त नाही राहिलो तर प्रश्न विचारू, काम मागू. आणि त्यांच्याकडे ना तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहेत ना तुम्हाला द्यायला काम ? मग काय बेरोजगार आहात ना , पहा क्रिकेट आणि वाजवा टाळ्या , टाळ्या साठी रिकामे हाते लागतात . ते कधी धोनी साठी लागतात तर कधी नेत्यांच्या भाषणासाठी .....नाही का ?
*या साठी लागते क्रिकेट*
प्रत्येक सरकार ने क्रिकेटचा त्यांच्या राजकारणात अनुकूलते साठी वापर केला आहे . सचिन तेंडुलकर ला भारतरत्न कॉंग्रेस सरकार ने का दिला होता हे सर्वांना ठाऊक आहे . क्रिकेटवर वेड्यासारखे प्रेम करणारे लोक आहेत म्हणून क्रिकेटचा वापर राजकारण्यापासून तर उद्योजक करतात . पेप्सी सारखे शीतपेय केवळ आमचे क्रिकेटर पितात म्हणून देशात सर्वाधिक पिले जाते ज्याचा शरीरला ० % फायदा असतो . असो आजच्या क्रॉसलाईन चे मुख्य कारण म्हणजे धोनी रणआउट झाला तेव्हा १३० कोटी लोकांना धक्का बसल्याचे काही पत्रकारांनी सांगितले. मात्र १३० कोटी लोकांना निर्मला सीतारामन यांनी १ लाख ७० हजार कोटी देशापासून लपवले याची माहिती आहे . ज्याच्या आपल्या दैनदिन जीवनाशी संबंद आहे त्यावर भारतात सिंगल माणसाला माहिती नाही मात्र धोनी आउट होणे ज्याचा कौडीचा संबंद नाही त्यावर आम्हाला घेऊन जाणारी मिडिया समजून घेतली पाहिजे . पंतप्रधान कार्यलयाचे आर्थिक सल्लागार रथीन रॉय यांनी सरकार ने आर्थिक सर्व्हे मध्ये २०१८/२०१९ ची कमाई १५.६ लाख करोड दाखवली आहे मात्र आर्थिक बजेट मध्ये मात्र १७.३ लाख कोटी कमाई दाखवली आहे . यातली तफावत आहे १.७० लाख कोटी रु . बजेट मध्ये निर्मला सीतारामन यांनी यांनी दाखवलेला खर्च २४.६ लाख कोटी तर सर्व्हे मध्ये २३.१ लाख कोटी दाखवला आहे . यातली तफावत सांगते कि माझे सरकार मला दोन आकडे देऊन फसवत आहे . स्वप्न दाखवून माझे झालेले नुकसान लपवत आहे . २०१४ ते २०१९ चा अभ्यास करता १.१ ने जीडीपी आमची खाली आली आहे . मात्र दुर्दैवाने आमची व्यवस्था आणि मिडिया आम्हाला क्रिकेटचा स्कोर , वाईड , यार्कर , फुल टोस , स्टंप , ओव्हर थ्रो शिकवते मात्र जीडीपी अर्थसंकल्प कसा वाचावा हे शिकवले जात नाही . तुम्हाला जीडीपी कळला नाही पाहिजे त्यासाठी क्रिकेट सारख्या अफूच्या गोळ्या पिढ्यान पिढ्या चारल्या जातात . आणि त्यातच आमचे भविष्य आउट होते आणि आम्ही मैदानाच्या बाहेर .