लवकरच नंदगांव शिवारात उभा राहणाऱ्या सूतगिरणी प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन.....
अमळनेर :- "हाताला काम शेतीला पाणी हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असताना ह्या वर्षी वरुण राजाच्या कृपेने अमळनेर मतदार संघात हिरा उद्योग समूह, जलयुक्त शिवार अभियान व लोकचळवळीच्या माध्यमातून शेतीला पाणी याची स्वप्नपूर्ती झालेली आहे. तसेच दिलेल्या शब्दानुसार अमळनेरच्या गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी व श्रीमंत प्रताप शेठजीचे कार्य पूर्णत्वास आणण्यासाठी आपण जे रोजगाराचे स्वप्न पाहिले होते, त्या राजमाता जिजाऊ सहकारी सूतगिरणी च्या जागा खरेदीस शासनाने मान्यता दिली असून अा. शिरीष चौधरी व मित्र परिवाराची पाठपुराव्याने हे यश मिळाले असल्याची माहिती हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ रवींद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अमळनेर तालुक्यातील नंदगाव शिवारात गट न. १३४ मध्ये सुमारे २५ एकर जागेत हा भव्य प्रकल्प उभारला जाणार असून लवकरच मुख्यमंत्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती डॉ रवींद्र चौधरी यांनी दिली. दि. २३ जुलै रोजी सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने शासन निर्णय काढून ही मान्यता दिल्याचे सांगत भूमिपूजनानंतर अवघ्या तीन वर्षात सूतगिरणीचे काम पूर्णत्वास आणून कोणत्याही परिस्थितीत प्रोडक्शन काढून दाखवणार असे आ. शिरीष चौधरी व डॉ रवींद्र चौधरी यांनी सांगितले. या प्रकल्पाविषयी माहिती देताना डॉ. चौधरी म्हणाले की, अडथळ्यांची शर्यत पार पाडून राज्यात एकमेव सूतगिरणी प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. बेरोजगार युवकांच्या हाताला काम देणार हा आ. शिरीष चौधरी यांचा शब्द असल्याने गेल्या अडीच वर्षांपासून अतिशय झपाटल्याप्रमाणे आम्ही काम करत होतो. या प्रकल्पासाठी आतापर्यंत २ कोटी रुपये खर्च केला असून दुष्काळी परिस्थितीत ही शेतकरी बांधवांनी २० ते २५ लाख रुपये भाग भांडवल जमा करून दिले आहे. आता पुन्हा ह्या महिन्यात सुमारे २० ते ३० लाखापर्यंत भाग भांडवल जमा होईल असा अंदाज आहे. एकूण १ कोटी २३ लाख भाग भांडवल गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
१ हजार लोकांना मिळणार रोजगार.....
हा प्रकल्प २५ हजार जात्यांचा असून यात सुमारे ७०० ते ८०० कुशल कामगारांची आवश्यकता भासणार असून त्याव्यतिरिक्त अकुशल कामगार व जोड व्यवसाय यात जवळपास १५०० रोजगार निर्मिती होणार आहे. नवीन शासन मान्यतेनुसार सुमारे ८४ कोटी चा हा प्रकल्प असून नंदगाव शिवारात २५ ऐकर जमिनीपैकी अर्धी जमीन खरेदी झाली असून अर्ध्या जागेची खरेदी ह्या आठवड्यात होणार आहे.
आता तरी या रोजगार भिमुख प्रकल्पास लोकप्रतिनिधी व त्यांच्या ढोंगी कंपूने विरोध करू नये - डॉ. रवींद्र चौधरी
या बाबत डॉ चौधरी म्हणाले की, येथे रोजगाराची कोणतीही संधी नसल्याने तरुण चुकीच्या मार्गाने जात आहेत. त्यांच्यासाठी हा प्रकल्प दिशा देणारा आहे. मात्र ह्या प्रकल्पासाठी अनेकांनी आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्यावर विशेष प्रेम करणाऱ्या काही स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कंपूच्या पोटात दुखल्याने तसेच या प्रकल्पामुळे त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात येणार त्यामुळे त्यांनी वस्त्रोद्योग व पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना कोर्टात खेचण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे ह्या प्रकल्पाला एक वर्ष उशीर झाला. त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत. योग्य वेळी ते समोर येतीलच. मात्र रोजगारनिर्मिती करणाऱ्या ह्या प्रकल्पास विरोध करू नये. लढायचे असेल तर सर्व शक्तिनिशी आमच्याशी लढावे. मात्र बेरोजगार बांधवाच्या आस्था असेल तर ह्या प्रकल्पास असलेला विरोध थांबवावा असे आवाहन डॉ. रवींद्र चौधरी यांनी केले आहे.