Halloween party ideas 2015


अभिनंदन देशात तीन हजार वाघ

खान्देशात कधीकाळी विपुल प्रमाणात वाघ होते. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त काही महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी. 

(पक्षीमित्र अश्विन पाटील अमळनेर)
----------------
जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचे निमित्तमात्र ठरलेला वाघ
वाघाच्या शिकारीचे निमित्तमात्र ठरल्याने तब्बल १९७ वर्षांपूर्वी समोर आलेल्या आणि आता जागतिक वारसास्थळ म्हणून लौकिकप्राप्त अजिंठा लेण्या आजही हजारो अभ्यासकांना भुरळ घालतात. मात्र, जंगलाचा राजा असलेल्या ज्या वाघाच्या शिकारीच्या निमित्ताने हा हजारो वर्षांपूर्वींचा अनमोल ठेवा जगासमोर आला, तो जिगरबाज प्राणी वाघ आता अजिंठा डोंगररांगासाठी केवळ कागदावरच उरला आहे. काही वंदतांनुसार अजिंठा डोंगररांगामध्ये अजूनही वाघ असल्याची चर्चा असली त्यातील सत्यता पडताळून पाहण्याबाबत वन्यजीव अथवा वनविभागाने कधीही रस दाखवलेला नाही. आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिनाच्या पार्श्वभूमीवर याविषयी घेतलेला आढावा.

देशावर ब्रिटीशांचा अंमल असताना एप्रिल १८१९मध्ये तत्कालिन मद्रास रेजीमेंटचे अधिकारी जॉन स्मिथ औरंगाबादमध्ये वाघांच्या शिकारीसाठी आले होते. वाघाचा पाठलाग करताना धनदाट जंगलातील अजिंठा लेण्या त्यांच्या नजरेस पडल्या. भारताच्या ऐतिहासिक समृद्धीचा हा ठेवा कालांतराने जगभर लौकिकप्राप्त ठरून जागतिक वारसास्थळांमध्ये गणला गेला. मात्र, हा गौरव मिळवून देण्यासाठी निमित्तमात्र ठरलेले वाघ अजिंठा डोंगररांगामधून कुठे गेले? पाटणादेवी-गौताळा-अजिंठा आणि पुढे बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य, तर उत्तरेकडील बोदवडमधून वढोदा (ता.मुक्ताईनगर) हा त्याचा कधीकाळी असलेला नैसर्गिक कॉरिडॉर अजूनही कायम आहे का? असा प्रश्न व्याघ्रप्रेमींना पडतो. ब्रिटीश अधिकारी स्मिथ हे वाघाचा पाठलाग करत असतानाच अजिंठा लेण्यासमोर आल्या, ही बाब अजिंठा डोंगररांगामध्ये वाघांचा अधिवास होताच हे सिद्ध करते. शिवाय त्याचा पाटणादेवीपर्यंत कॉरिडॉर होता याला तेथे सन १९५५मध्ये नरभक्षी वाघाच्या केलेल्या शिकारीच्या घटनेने पुष्ठी मिळते. याचाच अर्थ १९व्या आणि २०व्या शतकात सातपुडा पर्वतराजीप्रमाणेच अजिंठा डोंगररांगामध्येही वाघांचा अधिवास होता, हे अधोरिखत होते. मात्र, जंगलच नाहीसे झाल्याने इतर अनेक ठिकाणांप्रमाणेच वाघाला अजिंठा डोंगररांमधूनही परागंदा व्हावे लागले. यामुळेच की काय गेल्या ६० वर्षात अजिंठा डोंगररागांमध्ये व्याघ्र अधिवासाचे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत.

----
ठाण्यातही होते वाघ
सन १९७४मध्ये प्रसिद्ध झालेल्या महाराष्ट्र स्टेट गॅझेटिअरमध्ये टायगर्स इन महाराष्ट्र स्टेट या शिर्षकाखाली वाघांवर एक स्वतंत्र प्रकरण दिलेले आहे. पुरावे दर्शवण्यासाठी त्यात त्या-त्या जिल्ह्याचे व निजाम राजवटीतील १९व्या शतकातील गॅझेटिअरचा सनावळी-पानासह संदर्भ दिला आहे. आताच्या औरंगाबाद, बुलडाणा जिल्ह्यासह लगतचा खान्देश, कोकण, पुणे, नगर, नाशिक आणि सध्याची वाघांची राजधानी असलेल्या विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वाघ होते. एवढेच नव्हे तर मुंबई, ठाण्यातही वाघ होते, असे त्यातील उल्लेख सांगतात. ठाणेमध्ये १८७८ ते ७९ पूर्वीच्या पाच वर्षात ९९ वाघ मारले गेले होते. 

----

खान्देश होता वाघांचा प्रदेश 
१८८०च्या नोंदीनुसार तत्कालिन खान्देशात (आताचा जळगाव, धुळे, नंदूरबार) सातपुड्यात वाघांचा अधिवास बहरला होता. सन १८२२मध्ये वाघाने ५०० मानवप्राणी, २० हजार प्राण्यांच्या शिकारी केल्या होत्या. मात्र, पुढील वर्षाच्या म्हणजेच १८२३च्या केवळ तीन महिन्यात तब्बल ६० वाघ शिकारीत बळी पडले. तरीही १८६०पर्यंत खान्देशात वाघांचा दबदबा होताच. या वाघांपासून सुरक्षेसाठी ब्रिटीशांनी पोलिसांच्या मदतीकरीता स्वतंत्र स्पेशल टायगर डिस्ट्रक्शन युनीट गठीत केले होते. यानंतरही १८७९च्या शेवटच्या पाच वर्षात वाघांनी १६ मनुष्य आणि ३९१ प्राण्यांची शिकार केल्याचे दस्तऐवज म्हणतात. मात्र, याची प्रतिक्रिया म्हणून १८६६ ते १८७० दरम्यान वार्षिक सरासरी १५ आणि १८७१ ते ८० दरम्यान १० वाघांचा बळी घेतला गेला.

-----
नाशिकमध्ये वाघ दिसणे सामान्यबाब
१८८३च्या नोंदीनुसार यापूर्वीच्या २० वर्षात बागलाण, मालेगाव आणि जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कडेने वाघ दिसणे अतिशय सामान्य बाब होती. पावसाळ्यात वाघ डोंगररांगामध्ये मुक्कामी असायचा. मात्र, कालांतराने विरळ झालेले जंगल, आवडते खाद्य असलेले सांबर, डुकरांची संख्या घटल्याने वाघाला नाशिकमधून परागंदा होणे भाग पडले. १८७९पूर्वीच्या पाच वर्षात नाशिकमध्ये १३ वाघांना मारण्यात आले होते. तर १८८४च्या नोंदीनुसार पुणे जिल्ह्यातही वाघ होते. मात्र, १८८२च्या आसपासच्या आठ वर्षात १५ वाघांची शिकार झाली. याबद्दल काहींना सरकारने बक्षीसही दिले होते.
----

ज्येष्ठ अभ्यासक म्हणतात....
मध्य भारतातील वाघांचा सर्वात पुरारन नैसर्गिक संचारमार्ग सातपुड्यातून जातो. आताही शेजारील गुजरातला केवळ खान्देशच वाघ देवू शकतो. अजिंठा डोंगररांगासह पूर्वी महाराष्ट्रात सर्वत्र वाघ होते.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.