लोंढवे येथील स्व आबासो एस.एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी दिली "पॅथॉलॉजी प्रयोग शाळेला भेट"
जाणून घेतली सूक्ष्मजीव व तपासणी पद्धती. विज्ञानाचा उत्कृष्ट उपक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो.एस. एस.पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शालेय विज्ञान उपक्रमाअंतर्गत अमळनेर शहरातील उच्च विद्या विभूषित तज्ज्ञ डॉक्टर मनीषा भावे यांच्या "भावे पॅथॉलॉजी प्रयोग शाळेला" भेट दिली. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवताली असलेल्या आणि दृष्टीपथासही न दिसणाऱ्या अशा विविध सूक्ष्मजीव त्यांच्या निरीक्षण पद्धती आणि सुक्ष्मदर्शिका यांची प्रात्यक्षिकांसह माहिती घेत विज्ञानाचे धडे गिरवले. यातून मिळाल्याने ज्ञानाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जिज्ञासातून मिळालेल्या ज्ञानाचे समाधान दिसून आले.
शालेयस्तरावर विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांतर्गतच आठवीच्या विद्यार्थ्यांनी डॉ. भावे यांच्या पॅथॉलॉजीला भेट देत आपल्या विज्ञानाविषयीच्या जिज्ञास पूर्ण केल्या. शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक मिलिंद पाटील यांच्या संकल्पनेत हा उपक्रम झाला.
यात शाळेचे विद्यार्थी राहुल मिस्तरी, वैष्णवी पाटील, नूतन पाटील, माहेश्वरी धनगर, कुणाल पाटील, साहील पाटील, हिमांशू पवार, भावेश पाटील, नीलेश धनगर, रितू पाटील, हर्षल पाटील, भावना पाटील हे विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांनी या भेटीत दुधापासून दही बनवण्यासाठी उपयोगी असणारे लॅक्टोबीसीलाय सारखे विविध उपयोगी सुष्मजीव तसेच ज्याच्यामुळे मलेरिया होतो, असा प्लाझमोडियम व्ह्यायवैक्स सारखे उपद्रवी सूक्ष्मजीव त्यांच्या निरीक्षण पद्धती तसेच विविध सुक्ष्मदर्शिका बाबत माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारून समाधान करून घेतले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त माहिती मिळाल्याने भविष्यात निश्चितपणे त्यांना या ज्ञानाचा उपयोग होणार आहे.
विद्यार्थ्यांना कळाला आपला रक्तगट या उपक्रमात विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना प्रत्यक्षिकाद्वारे माहितीही देण्यात आली. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला आपला रक्तगट कोणाता आहे, त्याचे महत्त्व काय आहे? आपण कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतो, कोणता रक्तगट अधिक मिळतो, कोणता दुर्मिळ आहे, याची सविस्तर माहितीही विद्यार्थ्यांना मिळाल्याने त्यांच्या ज्ञानात अधिकच भर पडली.