छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली.
शिवव्याख्याते प्रा.माणिक पाटील.
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शिवरायांनी राजकारणात कधीही धर्म आणला नाही. ते मुस्लीम विरोधी कधीच नव्हते. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. शिवरायांनी कधीही अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. म्हणूनच निम्मेपेक्षा जास्त लढाया त्यांनी अमावस्येच्या दिवशी जिंकल्या आहेत, असे मत शिवव्याख्याते प्रा. माणिक पाटील यांनी आज व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती (नवी दिल्ली) यांच्यातर्फे झालेल्या शिवकालीन इतिहासाचे जागरण या विषयावर झालेल्या व्याख्यानात ते बोलत होते. आर्मी स्कूलचे प्राचार्य पी. एम. कोळी अध्यक्षस्थानी होते. शिवाजी कमिटीचे समन्वयक प्रा सुनील गरुड, कनिष्ठ महाविद्यालय संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास सोनवणे, प्रा. सुनील पाटील, देविदास साळुंखे, आयटीआयचे प्राचार्य किरण बाविस्कर, स्मारक समितीचे समन्वयक विनोद पाटील आदी प्रमुख पाहुणे होते. प्रा. पाटील पुढे म्हणाले, की छत्रपती शिवरायांच्या काळात शेतकऱ्यांना नेहमी प्रोत्साहन दिले जायचे. भकास झालेल्या जमिनीही सुजलाम् सुफलाम् झाल्या. त्यामुळेच शेतकऱ्यांनी कधी आत्महत्या केल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर शिवकालीन परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे. अमळनेर तालुक्याने क्रांतिकारकांची फौज निर्माण केली. यात साने गुरुजी, लीलाताई पाटील, उत्तमराव पाटील यांचे नाव अग्रस्थानी आहे. ज्याच्या मागे पाठबळ चांगले असते, त्यांचा कधीही पराभव होऊ शकत नाही. सूक्ष्म नियोजन व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून कमी सैन्यसंख्येवर त्यांनी 70 हजार फौज असलेल्या अफजलखानाचा पराभव केला. शत्रू मेल्यानंतर त्याचा विधिपूर्वक दफन करणारा जगातील एकमेव आदर्श राजा आहे. जनता सुखी तर देश सुखी हे ब्रीद वाक्य त्यांनी नेहमी उराशी बाळगले. आई-वडिलांची सेवा करा, असा संदेशही त्यांनी दिला. यावेळी शाळेचा माजी विद्यार्थी तथा बीएसएफमध्ये कार्यरत असलेला जवान सागर घोरपडे याचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. सुनील गरुड यांनी प्रास्ताविक केले. उमेश काटे यांनी सूत्रसंचालन केले. गोपाल हडपे यांनी आभार मानले.
फोटो
आर्मी स्कुल अमळनेर येथे वाचन प्रेरणादिनानिमित्त शिव व्याख्याते प्रा.माणिक पाटील बोलतांंना व शिक्षक व विद्यार्थी
छाया ईश्वर महाजन अमळनेर