*माजी आमदार रामनाथ मोते यांची आँँनलाईन शोक सभा*
कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचे दि२३ आॅगस्ट रोजी सकाळी ७:२५ वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी आमदार निरंजन डावखरे यांनी दि.३० रोजी दुपारी १२ वाजता आॅनलाईन शोक सभेचे आयोजन केले होते. माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार नागो गाणार, आमदार प्रशांत ठाकूर, साहित्यिक प्रा.अशोक बागवे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, संस्थाचालक विजय पां.जाधव, ईरफान शाह, शिक्षण क्रांतीचे विभाग अध्यक्ष रमेश जाधव, प्रमोद घोलप, सिस्टर रुफीना तुस्कॅनो, संतोष पावडे आदी मान्यवरांनी मोते सरांच्या महान कार्याबद्दल भावपूर्ण अनुभव व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
सुमारे ४२ वर्षांपासून रामनाथ मोते यांनी घरादारावर तुलसीपत्र ठेऊन शिक्षकांसाठी केलेले कार्य न भूतो न भविष्यति असेच आहे. १२ वर्षे विधान परिषद सभागृहात त्यांनी अभ्यासपुर्ण केलेल्या कामकाजाबद्दल विनोद तावडे यांनी गौरवोदगार काढले. दरवर्षा २३ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर हा मोते सर स्मृती पंधरवाडा पाळून मोते सरांना श्रद्धांजली वाहावी अशी अपेक्षा तावडे यांनी व्यक्त केली.
आमदार गाणार यांनी मोते सरांच्याच मार्गदर्शनाखाली सभागृहाचे कामकाज शिकल्याचे सांगितले. शिक्षक हिताचे अनेक विषय हे मोते सरांच्याच अभ्यासामुळे व लढ्यामुळे मार्गी लागल्याचेही गाणार यांनी सांगितले.
मोते सर जाताना शिक्षण क्रांतीची मशाल कार्यकर्त्यांच्या हाती देऊन गेले असून ती सतत प्रज्वलीत ठेवण्याची जबाबदारी पार पाडावयाची आहे. शिक्षण क्राती संघटना मोठ्या प्रमाणात वाढवण्याचे मोते सरांचे स्वप्न साकारण्याचे आवाहन आपल्यासमोर असून ते पुर्ण करून मोते सरांना खरी श्रद्धांजली अर्पण करण्याचा मानस रमेश जाधव व सुधीर घागस यांनी व्यक्त केला. कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये मोते सरांचे स्मारक उभारण्याचा संकल्प ही यावेळी जाधव यांनी समोर ठेवला.
अनेक वक्ते हे बोलताना दु:खावेग अनावर होऊन भावनाविवश मनोवस्थेत बोलताना दिसत होते.
कमाल ५०० व्यक्ती सहभागी होऊ शकणाऱ्या या सभेमध्ये सुरूवातीच्या १० मिनीटांतच कमाल मर्यादा पुर्ण झाली होती. शोकसभेमध्ये महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह दिवंगत रामनाथ मोते यांची कन्या दिपाली माहे, त्यांचे सर्व कुटुंबीय सहभागी होते. सूत्रसंचालन शिक्षण क्रांतीचे सचिव सुधीर घागस यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गोसावी यांनी मानले. राज्यातील 32 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संघटना समितीचे राज्य समन्वयक तसेच महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटनेचे राज्याध्यक्ष किशोर पाटील कुंझरकर यांनी सदरील ऑनलाईन राज्यस्तरीय शोकसभेत सहभाग घेऊन अण्णां विषयी चा जिव्हाळा प्रकट केला. आणि सर्व संघटनांच्या वतीने लिखित मेसेज द्वारे अण्णांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी स्मृतीपंधरवाडा माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे साहेबांनी मांडलेली कल्पना उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले.
आमदार डावखरे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

