Halloween party ideas 2015

*प्रकाशनाच्या वाटेवर*

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका "कोरोना" योंध्याने आपल्या थरारक अनुभवांचे लिहलेले *देशातील पहिलेच पुस्तक* (प्रकाशकाचा दावा)

*मृत्यू घराचा पहारा*

*लेखक* - पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे, पोलीस मुख्यालय जळगाव
*प्रस्तावना* - मा.विश्वास नांगरे पाटील(IPS), आयुक्त नाशिक

*शुभेच्छा* - डॉ.पंजाबराव उगले(IPS),पोलीस अधीक्षक जळगाव

*शुभेच्छा* - मा.धनराज वंजारी, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई

*मूल्य* - १५०/-

*लेखकाचे मनोगत*

दिनांक 21 4 2020 रोजी माझी कोरोना कक्षात सहकार्‍यांसोबत गार्ड ड्युटी लागली त्यावेळेला संपूर्ण भारत भरामध्ये कोरोणा बद्दल प्रचंड भीती निर्माण झाली होती ज्याप्रमाणे समाज माध्यम आणि मीडिया मध्ये कोरोना महामारी बद्दल दाखवले जात होते. मला अजूनही कळत नाही, की ते कोरोनाचे उदात्तीकरण होतं की प्रबोधन होते कि कोरोना बद्दल भीती पसरवली जात होती. एक मात्र नक्की, की एकंदरीत संपूर्ण समाज यामुळे प्रचंड भयभीत झालेला होता; त्यातल्या त्यात आपल्याला इतर देशात गेलेले युवक त्या ठिकाणाहून व्हिडिओ व्हायरल करून तिकडील देशाची परिस्थितीचं असं काही वर्णन करायचे, की त्यामुळे भीतीमध्ये अधिकच भर पडत होती. म्हणजे कोरोना म्हणजे मृत्यू आणि मृत्यू म्हणजे कोरोना असाच समज समाजामध्ये पसरला होता. आणि शेवटी पोलिसही माणूस आहे, त्यालाही भावभावना आहेत, तरीदेखील कोणतेही प्रशिक्षण नसताना पोलिसांनी या कोरोना माहामारीचा मोठ्या धैर्याने सामना केला. अनेक पोलिसांनी आपल्या देहाचे दान दिले. हजारो पोलीस कोरोनाच्या डंखानी घायाळ झाले माझ्याही मनामध्ये भीती ही होतीच मला देखील इतरांप्रमाणे कोरोना बद्दल प्रचंड भीती होती कारण कोरोनाचा मृत्यू हा काही आपल्या पुरता मर्यादित नसून तो आपल्या आप्तस्वकीयांना आपल्या कवेत घेत असतो आणि 21/4/20 रोजी माझी कोरोना कक्षात माझ्या सहकार्‍यांसोबत गार्ड ड्युटी( रात्रपाळी) लावण्यात आली, आणि त्या वेळेला मला जे जाणवलं, ज्या माझ्या भावना होत्या त्या शब्दबद्ध करून दिनांक 22/4/ 2020 रोजी फेसबुकवर पोस्ट टाकली. आणि त्या पोस्ट ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि त्यानंतर मी माझ्या कोरोना संदर्भातील इतरही अनुभवाच्या पोस्ट टाकत गेलो. त्या माध्यमातून मला महाराष्ट्रभरातून सर्व स्तरातील अनेकांचे फोन आले; त्यापैकी बहुतांशी व्यक्तींनी सांगितलं की, आपण ज्या पद्धतीने लिखाण करत आहात, ज्या पद्धतीने कोरोना बद्दल आपल्या भावना मांडत आहात तर आपण याचे एक पुस्तक का लिहत नाही? म्हणून फेसबुकच्या माध्यमातून वाचकांनी दिलेल्या प्रेरणेने 21 दिवसात आलेल्या माझ्या अनुभवांचे हे पुस्तक लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं की, मला ज्या भावना जाणवल्या त्याच भावना मी या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेल्या आहेत. मला असं वाटतं की, हया कदाचित माझ्याच भावना नसतील तर यंत्रणेतील कोरोणाविरुद्ध काम करणाऱ्या प्रत्येक योद्ध्याच्या अशाच भावना असल्या पाहिजेत. परंतु आपण म्हणणार कि, कोरोना कक्षामध्ये कोरोना पेशंटवर उपचार केला जातो. ते मृत्यूचे घर कसं असू शकतं? परंतु मी आपल्याला सांगतो की, ज्या परिस्थितीमध्ये आम्ही कोरोना कक्ष येथे गार्ड ड्यूटी सहकार्‍यांसोबत केली तेव्हा आम्हाला खरोखरच मृत्यूची भीती वाटत होती. असं वाटत होतं की, या घरांमध्ये अदृश्य स्वरूपात "कोरोना" नामक राक्षस राहतो. म्हणजे अक्षरशः तिथे मृत्यु राहतो आहे. आम्हाला देखील कोरोनाची लागण होईल आणि माझ्यामुळे माझे कुटुंब देखिल संक्रमित होईल. म्हणूनच मनामध्ये प्रचंड भीती निर्माण झाली होती. तरीही आम्हा पोलिसांसाठी देश महत्त्वाचा होता, कर्तव्य महत्त्वाचे होते, पण कुटुंबाला या रोगाची लागण झाली तर..... या नुसत्या कल्पनेने मी अक्षरश भेदरून गेलो होतो आणि त्या पद्धतीच्या मला वेदना आतून जाणवल्या त्याच वेदना मी शब्दबद्ध केल्या. त्या वेदनेतूनच या पुस्तकाचा जन्म झाला.... परिणामी 'मृत्यू घराचा पहारा' या शीर्षकाचा जन्म झाला दिनांक 21 4 2020 ते 12/5/20 असे सलग एकवीस मी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (सिविल हॉस्पिटल) येथे कोरोना संसर्गजन्य कक्षाची गार्ड ड्युटी (रात्रपाळी) म्हणून कर्तव्य पार पाडले. त्या दरम्यान आलेल्या अनुभवांचे कथन दिनांक 16/5/20 पर्यंत पूर्णपणे लिहून झालेले होते. जेव्हा एखादी युनिफॉर्म फोर्स मधील कर्मचारी एखादं पुस्तक लिहितो तेव्हा त्याला वरिष्ठ स्तरावरून परवानगी घ्यावी लागते परवानगी थोडी उशिरा मिळाल्याने थोडा विलंब झाला.जेव्हा हे पुस्तक प्रकाशित होईल तेव्हा कदाचित कोरोना बद्दल समाजाच्या मनातून भीती काहीशी कमी झाली असेल. मला माझ्या कुटुंबियांचा खरोखरच अभिमान आहे की, या कठीण प्रसंगी मी माझा भाऊ राहुल अहिरे (तलाठी), लहान भाऊ छोटू (केंद्रीय गृह मंत्रालय) असे आम्ही तिघेही भाऊ शासकीय सेवेच्या माध्यमातून देश आणि महाराष्ट्र देवतेच्या सेवेसाठी, संरक्षणासाठी तत्पर होतो.माझ्या आई-वडीलांना घराबाहेर पडण्यासाठी आम्ही मज्जाव करून देखील त्यांनी स्वतःची पिठाची गिरणी सुरू ठेवून समाजाला एकप्रकारे मदतच केली. त्याचप्रमाणे पत्नी माधुरी ही नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि तिने घरामध्ये प्रचंड काळजी घेऊन आम्हाला सर्वांनाच सुरक्षित ठेवले. मी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्य पार पाडीत असताना माझी मुले आर्यन, अनुष्का, व बंडू (संघर्ष) हे माझ्यापासून नेहमीच लांब राहिले. मी दिनांक 21/ 4/ 2020 ते 12 /5 /2020 अश्या या 21 दिवसात कोरोना कक्षाची गार्ड ड्युटी (रात्रपाळी) कर्तव्य पार पाडले. 18/5/20 ते 22/5/2020 शाहूमहाराज रुग्णालय कोरोना कक्ष येथे गार्ड केली, तदनंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील evm गार्ड येथे एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागन झाल्यामुळे तेथील संपूर्ण गार्ड काँरनटाईन करण्यात आले. त्या ठिकाणी 23/5/20 ते 30/5/20 पावेतो कर्तव्य पार पाडले. त्यानंतर 3/6/20 ते 8/6/20 कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) येथे कर्तव्य पार पाडले. त्यानंतर पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव (सिव्हिल हॉस्पिटल )कोरोना संसर्गजन्य कक्ष येथे 9/6/20 रोजी मला ड्युटीचा मेमो देण्यात आला तेव्हापासून मी तिथेच कर्तव्य पार पाडीत आहे .हे मनोगत देखील मी कोरोना कक्षाची ड्युटी करीत असतानाच मी लिहीत आहे. म्हणजे जवळपास 90 दिवस कोरोणाच्या परिघातच संपूर्ण कर्तव्य पार पाडीत आहे.सदरचे कर्तव्य पार पाडीत असताना मी घेत असलेल्या सुरक्षे बाबत आतापावेतो कुठलीही तडजोड केलेली नाही. पूर्णपणे काळजी घेत आहे. स्वतःची आपण घेतलेली योग्य काळजी हीच सध्यातरी कोरोणावर एकमेव उपाय आहे.आणि त्याच जोडीला आपल्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास असला पाहिजे. या दोन्ही गोष्टी जर आपल्याकडे असल्या तर कोरोना आपलं काहीही बिघडवू शकत नाही...... म्हणूनच कि काय.... कदाचित मी घेत असलेल्या सुरक्षेला आजपावेतो कोरोना भेदू शकलेला नाही.

मा. पोलीस अधीक्षक, डॉ.पंजाबराव उगले साहेब यांनी पुस्तक प्रकाशनासाठी परवानगी दिली. त्यादरम्यान त्यांच्या वाचनात सदर चे पुस्तक आले असताना त्यांनी वेळोवेळी फोन करून माझे कौतुक केले. आणि या पुस्तकाची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या त्यांचे खूप खूप आभार
अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचे देखील आभार.
ज्या वेळेला मला कळलं कि, मा. विश्वास नांगरे पाटील साहेबांनी माझ्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिण्याची मान्य केलं तेव्हा माझा स्वतःवरच विश्वास बसला नाही. आनंदाला पारावार उरला नाही. नागरे पाटील साहेबांनी या पुस्तकाला प्रस्तावना लाभल्याने मी खरोखरच माझ्या लेखणीचा सन्मानच समजतो. नागरे पाटील साहेबांचे आभार न मानता कायमच त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. तसेच नासिक आयुक्तालयातील जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भावना महाजन यांनीही विश्वास नागरे पाटील साहेबांची प्रस्तावना मिळवून देणे कामी मोलाचे सहकार्य केले. त्यांचे देखील मी अगदी मनापासून आभार मानतो.
तसेच निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई धनराज वंजारी साहेब यांनी या पुस्तकाला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचे देखील आभार.
पोलीस खात्यामधील अत्यंत घनिष्ठ मित्र सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर यांनी या पुस्तकाला अर्थसाहाय्य केलेल आहे त्यांचे देखील आभार.
मी पोलिस दलात भरती झाल्यापासून मला कुलवंतकुमार (IPS), प्रवीण साळुंके (IPS), दिलीप सावंत(IPS), संतोष रस्तोगी (IPS), एस जयकुमार (IPS), डाँ.जालींदर सुपेकर (IPS), दत्तात्रय कराळे (IPS), विलास सोनवणे (मपोसे) या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्या कलागुणांना नेहमीच वाव दिलेला आहे. त्यांचे देखील अगदी मनापासून आभार.
तसेच 'अथर्व पब्लिकेशन्स' चे संचालक युवराज माळी यांनी पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारुन ते यशस्वीरित्या प्रकाशित केले. स्वप्निल फलटणकर यांनी अत्यंत तन्मयतेने सदरील पुस्तकास आकर्षक रूप देऊन सहकार्य केले म्हणून आपण दोघांचेही आभार मानतो.
वेदना ह्या साहित्याचा केंद्र बिंदू आहे.
साहित्य हे वेदने भोवतीच फिरत असते.
फुले- शाहू- आंबेडकरी विचारांची लाभलेली थोडीफार साहित्य दृष्टी मला नेहमीच प्रेरणा देत असते..... म्हणूनच हे पुस्तक मी लिहू शकलो आणि या पुस्तकाच्या मुळाशी माझी वेदनाच आहे, फक्त मी त्या वेदनेचा बाजार न मांडता मी लिखाणाने ती वेदना शमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
धन्यवाद....

पोलीस नाईक, विनोद अहिरे
पोलीस मुख्यालय जळगाव
9823136399

*मराठी लाईव्ह न्युजच्या वतीने मनापासून शुभेच्छा!💐💐💐💐💐💐




WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.