भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलविणारे अविस्मरणीय झेल
क्रिकेट खेळातील कोणतेही प्रारूप असो त्यात फलंदाजी व गोलंदाजी इतकेच महत्व क्षेत्ररक्षणाला असते, आणि क्षेत्ररक्षणात सर्वात जास्त महत्व "झेल" या बहुचर्चित कौशल्याला असते. म्हणूनच क्रिकेट मध्ये एक म्हण प्रचलित आहे, "कॅचेस विन मॅचेस." म्हणजे झेल घ्या व सामने जिंका. क्रिकेटमध्ये एक झेल सामन्याचा नूरच पलटून टाकतो. घेतलेला झेल हारणाऱ्या संघाला विजेता बनवितो व सुटलेला झेल जिंकू शकणारा संघ हारतो. त्यामुळे खेळाडूंना झेल घेण्याचे कौशल्य चांगल्या प्रकारे सराव करून घोटवावे लागते. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्वाचे आहे. जर एखादया सामन्यात एक खेळाडू फलंदाजी किंवा गोलंदाजी मध्ये अपयशी ठरला तर त्याची उणीव त्याचे दुसरे सहकारी भरून काढू शकतात. परंतु जर तो खेळाडू क्षेत्ररक्षणात चुका करू लागला तर खेळाचा फासाच बदलून जातो. त्यामुळे खास करून क्षेत्ररक्षकांना डोळ्यात तेल घालूनच मैदानात उभे राहावे लागते. आता तर जगातल्या प्रत्येक संघाने केवळ क्षेत्ररक्षणाचा दर्जा उंचविण्यासाठी खास फिल्डींग कोच नियुक्त केले आहेत. यावरून झेलाचे महत्व आपोआप अधोरेखीत होते.
आजच्या स्थितीला क्षेत्ररक्षणाचा दर्जा उच्च स्तरावर नेण्यात भारतीय संघही आघाडीवर आहे. भारताचे खेळाडूही अगदी जीव झोकून क्षेत्ररक्षण करतात. त्यांच्या काही अफलातून कर्तबगारीने भारताला अविस्मरणीय यश मिळाले व भारतीय क्रिकेट संघाला जागतिक स्तरावर वेगळी उंची मिळवून दिली. नव्हे तर भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलून गेला.
प्रस्तुत लेखात भारतीय खेळाडूंनी घेतलेल्या तीन अविस्मरणीय झेलांविषयी जाणून घेऊ या.
भारताने जिंकलेल्या सन १९८३ च्या विश्वचषक स्पर्धेनंतरच खऱ्या अर्थाने भारतीय क्रिकेटचा रंगच बदलून टाकला. विजेतेपद डावावर लागलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव मात्र १८३ धावा उखडल्याने विंडीज विश्वविजयाची हॅट्रीक करणार हे स्पष्ट होते.
वेस्ट इंडिजच्या डावाला सुरूवात झाल्यानंतर त्यांचे सलामीवीर गॉर्डन ग्रिनिज व डेसमंड हेन्स स्वस्तात परतले, खरे परंतु त्यांचा धडाकेबाज फलंदाज किंग विव्हीयन रिचर्डसने दे दणादण करत विंडीजच्या आशा पल्लवित केल्या. रिचर्डस ३३ धावांवर खेळत असताना त्याने मदनलालच्या चेंडूला मिडविकेटच्या वरून मारले. परंतु मिडऑनला उभ्या असलेल्या कर्णधार कपिलदेवने मागच्या बाजूला उलटे धावत एक कठिण झेल टिपला. रिचर्डसच्या पतनानंतर विंडीजचा संपूर्ण डाव केवळ १४० धावात कोसळला व भारताने सामनाच नाही तर विश्वकरंडक आपल्या नावे केला. कपिलने रिचर्डसचा तो झेल घेतल्याने भारताचा विजय सुकर झाला.
सन २००२ च्या श्रीलंकेतील चँपीयन्स ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात कोलंबो येथे भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना एका अशाच एका अफलातून झेलाने पलटवला होता. त्या सामन्यात द. आफ्रिकेचा संघ विजयीपथावर होता, कारण त्यांना ७१ चेंडूत ६८ धावा हव्या होत्या व त्यांचे नऊ गडी शाबूत होते.
नेमके त्याच वेळी जाँटी -होडसने एक बेजबाबदार फटका मारला व युवराज सिंगने सूर मारून एक अफलातून झेल पकडला. त्यानंतर द. आफ्रिकेचे खेळाडू एकामागोमाग एक बाद होत गेले व भारताने एका अशक्यप्राय विजय नोंदवून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना पावसामुळे होऊ न शकल्याने भारत व श्रीलंकेला संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. म्हणजे बघा युवराजच्या त्या झेलाने तो सामनाच नव्हे तर विजेतेपदही भारताच्या चरणी लिन झाले.
सन २००७ मध्ये पहिली टि-२० विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत संपन्न झाली. त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत व पाकिस्तान आपसात भिडले. सामन्याच्या शेवटच्या षटकात नवख्या जोगिंदर सिंगच्या षटकात १३ धावा हव्या असताना पहिल्या तीन चेंडूत ७ धावा निघाल्या व शेवटच्या तीन चेंडूवर जिंकण्यासाठी सहा धावा पाकला करायच्या होत्या. त्यावेळी पाकची शेवटची जोडी मैदानात होती. शिवाय त्यांचा हुकमी फलंदाज मिसबाह उल हक स्ट्राईक वर होता. परंतु मिसबाहने मोठा फटका मारण्याच्या उद्देशाने चेंडू स्कुप केला पण त्याचा फटका चुकला व चेंडू उडाला, मग डीप फाईन लेगला उभ्या असलेल्या शांताकुमार श्रीशांतने तो झेल अलगद टिपला. या झेलाने भारताने सामनाच नाही तर टि-२० चा पहिला विश्व करंडकही जिंकला.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
