टि -२० क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू धावांसाठी टोलविण्यासाठीच असतो अशी फलंदाजांची धारणा असते. मग तो चेंडू कसाही असो फलंदाज त्याच्यावर तुटून पडतो. प्रथम फलंदाजी करणारा संघ आपल्यापरीने जास्तीत जास्त धावा जमविण्याचा प्रयत्न करतो, जेणे करून त्यांच्या संघाला विजयासाठी पुरेशा ठरतील. तर दुसरा फलंदाजी करणारा संघ त्या धावांचा पाठलाग शक्य तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करतो. शक्यतो बरेचसे संघ सामना शेवटच्या षटकापर्यंत जाऊच नये म्हणून प्रयत्न करतात. जर सामना अंतिम षटकापर्यंत खेचला गेला तर तो दोन्ही संघांसाठी खुला असतो. फलंदाज जीवाचं रान करून सामना आपल्या बाजूने खेचण्यासाठी प्रत्येक चेंडूवर तुटून पडतो. अशा वेळी सर्वात कठीण कार्य असतं ते शेवटचं षटक टाकणाऱ्या गोलंदाजाचं. करो अथवा मरोच्या स्थितीत तो गोलंदाजही आपल्या परीने धावा दाबून फलंदाजाला रोखण्याचा व शक्य झाले तर बाद करण्याचाही प्रयत्न करतो.
सदर लेखात आपण टि-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शेवटच्या षटकाचं कुठलंही दडपण न घेता विरोधी फलंदाजाला वेसण घालत एकही धाव खर्च न करता सामना आपल्या संघाच्या झोळीत टाकणाऱ्या जीगरबाज गोलंदाजांची कामगिरी बघणार आहोत. या चार गोलंदाजांत भारत, पाकिस्तान, न्यूझिलंड व सिंगापूरच्या प्रत्येकी एका गोलंदाजाचा समावेश आहे.
हा अफलातून कारनामा करणारा पहिला गोलंदाज आहे भारतीय वंशाचा न्यूझिलंडकडून खेळणारा फिरकी गोलंदाज जीतन पटेल. सन २००८ मध्ये विंडीजविरूध्द त्याने हा करिश्मा केला. या सामन्यात न्यूझिलंडने प्रथम फलंदाजी करून २० षटकात ९ बाद १९१ धावा काढल्या. १९२ धावांचा पाठलाग करताना विंडीजला २० व्या षटकात जिंकण्यासाठी ३७ धावांची गरज असताना जीतन पटेलने त्या षटकात पहिल्या चेंडूवर दिनेश रामाधीनला बाद केले. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर किरॉन पोलॉर्ड बाद झाला व अखेरचे तीन चेंडू सुलेेमान बेनने निव्वळ तटवले.
सन २०१० च्या टि- २० विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूध्द पाकिस्तान सामन्यात शेवटचं षटक पाकच्या मोहम्मद आमिरने टाकले. या षटकात पाच ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद झाले. त्यात एक धावबाद होता. आमिरने एक चेंडू डॉट टाकला होता. या रितीने सामन्यातलं विसावं व शेवटचं षटक निर्धाव टाकणारा तो जगातला दुसरा गोलंदाज बनला.
सन २०१९ मध्ये आयसीसी क्वालीफायर सामन्यात तिसऱ्यांदा विसावे षटक निर्धाव टाकण्याचा प्रसंग घडला. सामना होता सिंगापूर व कतार यांच्यात. शेवटचं षटक टाकले ते सिंगापूरच्या जनक प्रकाश या गोलंंदाजाने. कतारला विसाव्या षटकात जिंकण्यासाठी ३५ धावांची गरज असताना केवळ लेगबायची एक अवांतर धाव निघाली की, जी गोलंदाजाच्या खात्यात जमा होत नाही. बाकीचे सर्व चेंडू निर्धाव गेले. अशा रितीने नियमाप्रमाणे ते षटक निर्धाव ठरले.
सन २०१९ मध्ये विंडीज विरूध्द विसावे षटक निर्धाव टाकून भारताचा नवोदित वेगवान गोलंदाज नवदिप सैनी या अनोख्या क्लबमध्ये सामील झाला. त्या षटकात सैनीने पहिले दोन चेंडू किरॉन पोलॉर्डला डॉट टाकले, तर तिसऱ्या चेंडूवर त्याला बाद केले मग राहिलेले तिन चेंडू थॉमसलाही डॉट करून ते षटक निर्धाव बनविले.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
