१३ एप्रिल १९८४ रोजी पहिल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना झाला. त्या घटनेला बघता बघता ३६ वर्ष पुर्ण झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हि स्पर्धा अशा ठिकाणी झाली की क्षणभर आपला त्यावर विश्वासही बसणार नाही. संयुक्त अरब अमिरातीच्या रखरखीत वाळवंटात जेथे पाण्याच्या थेंबाला लोक त्रासिक व्हायचे अशा ठिकाणी हि स्पर्धा सुरू झाली. पेट्रोलच्या उत्पादनात अव्वल असणाऱ्या या देशात अल्पावधीतच क्रिकेट लोकप्रिय झाले. अब्दुल रहेमान बुखातीर हा शारजात क्रिकेट फुलविणारा खऱ्या अर्थाने आद्यजनक ठरला.
सन १९८३ ला लॉर्डस् वर विश्वकरंडक पटकविल्याच्या पार्श्वभूमिवर पहिली आशिया स्पर्धा शारजात सुरू झाली. या स्पर्धेत फक्त ३ देशांनी सहभाग नोंदविला. भारत - पाक - श्रीलंका संघ आपसात राऊंड रॉबिन लिग पद्धतीने खेळले. त्यात गुणानुक्रमे पहिल्या २ स्थानावरील संघात अंतिम सामना झाला.
पहिल्या स्पर्धेचा पहिला सामना दोन पारंपारीक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यात झाला.शारजाच्या वाळवंटातील हिरव्यागार खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी कराव्या लागणाऱ्या भारताला इम्रान खानच्या १४ धावात घेतलेल्या ६ बळींमुळे जेमतेम १२५ धावाच करता आल्या. त्यावेळी विश्वविजेत्यांना प्रथम ग्रासे मक्षीपःत होतो का ? असा प्रश्न पडला होता. परंतु भारताचे कपिल देव- मदनलाल, रॉजर बिन्नी शेरास सव्वाशेर ठरले. पाकच्या भक्कम फलंदाजीस खिंडार पाडताना त्यांनी केवळ ८७ धावात खुर्दा करून ३८ धावांचा अनपेक्षित विजय नोंदवून आपले विश्वजेतेपद सार्थ ठरविले.
आपल्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे विश्वविजेता कर्णधार कपिल पुढचे सामने खेळला नाही. तसा तो संघा सोबतच होता, मात्र नंतर ती स्पर्धा संपल्यानंतर तो ऑपरेशनसाठी लंडनला गेला.
पाकवरील पहिल्या विजयानंतर संजिवनी प्राप्त झालेला भारतीय संघ नवख्या श्रीलंकेवर तुटून पडला. मदनलाल, मनोज प्रभाकर, चेतन शर्मा यांच्या धारदार गोलंदाजी पुढे लंकेचा डाव ९६ धावातच कोलमडला. त्यानंतर सन १९७९ नंतर संघात पुनरागमन करणारा यष्टीरक्षक फलंदाज सुरिंदर खन्ना नाबाद ५१ व गुलाम परकार नाबाद ३२ एकतर्फी विजय मिळवून देत. भारताला अंतिम फेरीत पोहचविण्यास आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले. संघात नियमित यष्टीरक्षक सय्यद किरमाणी असताना देखील कर्णधार सुनिल गावस्करने सुरिंदर खन्नावर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविली त्यामुळे खन्नाचा आत्मविश्वास दुणावला परिणामतः त्याचा लाभ मिळाला.
दुसऱ्या एका साखळी सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचे आव्हान परतवून लावत अंतिम सामन्यात भारतासोबत भिडण्याचं तिकीट मिळविलं. त्यानंतर १३ एप्रिल १९८४ हा तो ऐतिहासीक दिवस उजाडला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४६ षटकात ४ बाद १८८ धावा बनविल्या. सलामीचा फलंदाज सुरिंदर खन्नाने परत एकदा आपल्या बॅटचे पाणी पाकिस्तानी गोलंदाजांना पाजत ५६ धावांची जोरदार खेळी केली. त्याच्याशिवाय संदिप पाटील ४३ व कर्णधार सुनिल गावस्कर नाबाद ३६ यांनीही बऱ्यापैकी योगदान दिले.
विजयासाठी १८९ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पाक संघ सुरुवातीपासूनच बावरल्यागत खेळला. रॉजर बिन्नी व रवी शास्त्री यांनी घेतलेले प्रत्येकी ३-३ बळी व क्षेत्ररक्षकांनी मैदानात केलेली अफलातून जादू यामुळे पाकचे ४ खेळाडू तर चक्क धावचित झाले. कपिलदेवच्या गैरहजेरीत भारताने पाकला ५४ धावांनी पाणी पाजून पहिल्या आशिया करंडकावर आपले नाव कोरले. सुरिंदर खन्ना यष्टीच्या मागे व पुढे केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे मालिकावीर ठरला. हा विजय विश्वकरंडकापेक्षाही जास्त आनंद देणारा होता. कारण तो मिळविला होता तो पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकवर. ३६ वर्षापूर्वी मिळविलेला तो विजय आजही मन प्रसन्न करून जातोय. यातच क्रिकेटची खरी रोमांचकता आहे.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
