सचिन तेंडुलकरची प्रत्येक गोष्ट विश्वविक्रमी ठरली आहे. सचिनचा जन्मच जणू विश्वविक्रमांसाठीच झाला आहे असे म्हंटले तरी वावगे ठरू नये. अशी परिस्थिती दस्तुरखुद्द सचिनच्या विश्वविक्रमांनीच सिध्द करून दाखविली आहे. सचिनचा जन्म क्रिकेटचा कुठलाही अनुवंशीक संबंध नसलेल्या कुटुंबात झाला. परंतु सचिनमध्ये क्रिकेटसाठी लागणारी असामान्य गुणवत्ता होती. त्या बळावर अगदी बालवयातच सचिनने त्याच्या वयाला न शोभणारे एक एक महापराक्रम केले आहेत हे आख्ख्या जगाने बघितले. सचिनने क्रिकेटच्या मैदानावर केलेल्या करिश्म्याने त्याचे जगभर विश्वविक्रमी प्रशंसक आजही आहेत. त्याचबरोबर त्याला मिळालेले मानसन्मानही तितकेच विश्वविक्रमी ठरलेत.
सचिनच्या २४ वर्षांच्या मोठ्या कारकिर्दीची सांगता त्याचे गृहमैदान मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर झाली. त्यानंतर अवघ्या साडेपाच तासात त्याला भारताचा सर्वोच्य नागरी पुरस्कार " भारतरत्न " जाहीर झाला. तसेच भारत सरकारच्या टपाल खात्याने सचिनचा फोटो असलेले टपाल तिकिटही जारी केले.
सचिनच्या यशस्वी कारकिर्दीची महती येथेच थांबत नाही, तर लंडनस्थित ईस्ट इंडिया कंपनीने जुलै २०१४ मध्ये सचिनचं छायाचित्र असलेलं सोन्याचं चलनी नाणं बाजारात आणलं. ईस्ट इंडिया कंपनी म्हटल्यावर आपल्याला काही आठवले का ? हो तीच कंपनी, जिचा सहारा घेत इंग्रंज व्यापाराच्या नावाखाली भारतात आले व तब्बल १५० वर्ष भारतावर राज्य केलं. त्याच कंपनीने सचिनच्या कर्तृत्वाचा गौरव करणे नक्कीच कौतुकास्पद बाब म्हणावी लागेल.
ईस्ट इंडिया कंपनीने बनविलेल्या सुवर्णमुद्रेला अधिकृत चलनी नाणं म्हणूनही ब्रिटीश सरकारने मंजूरी दिली आहे. २४ कॅरेट सोन्याचे २०० ग्रॅम वजन असलेले हे नाणे असून त्याच्या एका बाजूवर सचिन तेंडुलकरचा फोटो दुसऱ्या बाजूला सचिनने स्वाक्षरी केलेली बॅट, हेल्मेट व त्याचे गृहनगर असलेल्या मुंबईतील प्रसिद्ध गेट वे ऑफ इंडियाची झलक आहे. याचे मुल्य १२ हजार पौंड ( सुमारे २ लाख रूपये ) असून त्यावर त्याचा कसोटी कॅप नंबर १८७ हा सुध्दा मुद्रीत केला आहे. या सुवर्णमुद्रेची निर्मिती पॅरीसची प्रसिद्ध डिझायनर जोक्विन जिमनेजने केली आहे.
सचिनचा फोटो असलेले अनेक नाणे यापूर्वी तयार झाले होते. परंतु चलनी नाणं म्हणून अशा प्रकारे हे चलनात आलेलं पहिलं अधिकृत नाणं ठरलं. सर्वसाधारण नाण्यांसारखं हे नाणं बाजारात मिळणार नसलं तरी ते अधिकृत चलन म्हणून मान्यताप्राप्त असेल. सचिन तेंडुलकरच्या जगभरातील चाहत्यांसाठी सचिनचा अमूल्य ठेवा जतन करण्याची ही नामी संधी आहे. ईस्ट इंडिया कंपनीने सचिनच्या अगोदर फक्त जगप्रसिध्द मुष्टीयोध्दा ( बॉक्सर ) मोहम्मद अली व फॉर्म्यूला वन ड्रायव्हर निजेल मानसेल यांचीच अधिकृत चलन असलेली सुवर्ण मुद्रा बाजारात आणली आहे. तर राणी एलिझाबेथच्या शासनकाळाला ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अशीच सुवर्णमुद्रा काढली होती.
ईस्ट इंडिया कंपनीने सचिनचा गौरव करून एकप्रकारे त्याच्या क्रिकेट पराक्रमाला अधिकृत मान्यताच दिली आहे. शिवाय यामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील सर्व प्रकारचे संबंध सौहार्दपुर्ण होण्यास मदत मिळू शकते.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
