कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये केवळ चारच फलंदाज द्विशतक ठोकण्यात यशस्वी
कसोटी क्रिकेटच्या १४३ वर्षांच्या इतिहासात आता पर्यंत १९४ द्विशतके निघाले आहेत तर एकदिवसीय क्रिकेटला सुरूवात होईन ४९ वर्ष झाले आहेत त्यामध्ये केवळ आठ द्विशतके बनली आहेत, आणि हो त्यातील तिन तर एकटया रोहीत शर्माचे आहेत. जरा बारकाईने विचार केला तर फलंदाजी हे जरी सर्वांचे आकर्षण असली तरी ती वाटते तितकी सोपी नाही. पाच - पन्नास धावा करणे ठिक आहे परंतु द्विशतक करणे बोलण्याइतके सोपे नाही. आपल्या खास माहीतीसाठी सांगतो, जागतिक क्रिकेटमध्ये केवळ चारच फलंदाज आहेत की, ज्यांना कसोटी व एक दिवसीय सामन्यात द्विशतक झळकविण्यात यश आले आहे. त्यामुळे आपल्या लक्षात आले असेल की आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली फलंदाजी करणे व मोठी धावसंख्या उभारणे किती कठीण असते.
प्रस्तुत लेखात आपण क्रिकेटच्या दोन मोठया प्रकारात द्विशतक ठोकणाऱ्या त्या चार धुरंधर फलंदाजांविषयी जाणून घेऊ या.
कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारा पहिला खेळाडू ठरला विश्वविक्रमांचा बादशहा भारतरत्न सचिन रमेश तेंडूलकर ! सचिन त्याच्या कारकिर्दीत २०० कसोटी खेळला, त्यामध्ये ५१ शतके आहेत. त्यात सहा द्विशतकांचा समावेश आहे. सन २००४ मध्ये ढाका कसोटीत बांगलादेश विरूध्द केलेली २४८ धावांची नाबाद खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली.
त्याचबरोबर पुरुषांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक ठोकण्याचा कारनामाही सचिननेच केला. २४ फेब्रुवारी २०१० रोजी ग्वाल्हेर येथे दक्षिण आफ्रिकेविरूध्द त्याने हा ऐतिहासिक पराक्रम केला. बरोबर २०० धावांच्या नाबाद खेळीत १४७ चेंडूंचा सामना करताना तीन षटकार व २५ चौकार मारत त्याने वनडे व कसोटीत द्विशतकी खेळी करणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळविला.
कसोटी व वनडेत डबल धमाका करणारा दुसरा खेळाडूही भारताचाच असून तो आहे सचिन तेंडुलकरचा वनडेतील ओपनिंग पार्टनर धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग ! सेहवागनेही कसोटीत सचिन इतक्याच सहा वेळा दोनशे धावांचा टप्पा ओलांडला. मात्र यात तो दोन वेळा त्रिशतकी खेळी करण्यात यशस्वी ठरला. कसोटीत भारताकडून दोन त्रिशतके करणारा तो एकमेव फलंदाज आहे. कसोटीत मुलतानला पाकविरूद्ध केलेल्या ३१९ धावा त्याच्या सर्वोत्तम ठरल्या.
वनडेतही द्विशतक ठोकण्यात सेहवागने सचिननंतर नंबर मारला. सन २०१२ ला इंदोर येथे विंडीज विरूध्द २१९ धावांची खेळी साकारताच कसोटी व वनडेत द्विशतक ठोकणारा तो जगातील दुसरा फलंदाज बनला.
या धमाकेदार खेळाडूंच्या गोल्डन क्लबचा तिसरा सदस्य आहे विंडीजचा सर्वात स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल ! कसोटीत दोन त्रिशतके व एक द्विशतक फटकारणाऱ्या गेलची कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या आहे ३३३. सन २०१० ला श्रीलंकेविरूध्द त्याने ही खेळी साकारली होती.
त्यानंतर सन २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेत झिंबाब्वेविरूध्द १४७ चेंडूत २१५ धावा कुटताना या अजब क्लबमध्ये समावेश केला.
वनडे मध्ये सर्वाधिक तीन द्विशतके ठोकत भारताच्या रोहीत शर्माने अव्वल क्रमांक गाठला. रोहितने अगोदर वनडेत द्विशतके ठोकली व नंतर कसोटीत द्विशतक फटकावले. त्यामुळे या क्लबचा तो चौथा मेंबर बनला. विशेष म्हणजे या चारपैकी तिन भारतीय आहेत.
रोहीतने सर्वप्रथम २ नोव्हेंबर २०१३ ला बंगलुरूत ऑस्ट्रेलियाविरूध्द २०९ धावा ठोकल्या. त्यानंतर १४ नोव्हेंबर २०१४ ला कोलकात्यात श्रीलंकेविरूध्द २६४ धावांची विश्वविक्रमी खेळी साकारली. मग डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेविरूध्दच मोहालीत २०८ धावा ठोकून वनडेतील द्विशतकांचा सम्राट बनला.
सन २०१९ च्या रांची कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरूध्द २१२ धावांची द्विशतकी खेळी करून वनडे व कसोटीत द्विशतक ठोकणारा तो जगातला चौथा फलंदाज बनला.
लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.