महाराष्ट्र पत्रकार संघाचा कोहिनूर...राजेश जोष्टे
राज्य शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराचे 27 जुलैला वितरण
मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरावरील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार दै. पुढारीचे चिपळूण येथील पत्रकार व दिशान्तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश जोष्टे यांना जाहीर झाला आहे. वृत्तपत्रीय लिखाण व त्याचजोडीने अपेक्षित सामाजिक काम अशा कृतीयुक्त पत्रकारितेसाठी हा सन्मान दिला जातो. चिपळूणात गत 25 वर्षे पत्रकारिता करणाऱ्या राजेश जोष्टे यांनी कोकण विषयक वैशिष्ठ्यपूर्ण लेखन केले आहे. विविध विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण वृत्तमालिका, शोधपत्रकारिता, वंचितांच्या वाड्यावस्त्यांचे वास्तव, स्तंभलेखन, शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांवर आधारित लेख, यशकथा या लक्षवेधी ठरल्या आहेत. वंचितांच्या वस्तीवरचे व ग्रामीण भागातील वृत्तांकन व त्या भागात संवेदनशील वृत्तीने केलेले काम यामुळे त्यांना भारत सरकारच्या प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया या स्वायत्त व घटनात्मक संस्थेचा देशपातळीवरचा अत्यंत प्रतिष्ठेचा पहिला राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार मिळाला आहे. 24 कॅरेट सुवर्ण मानपत्र तसेच 50 हजाराची धनादेश देवून त्यांना दिल्ली येथे गौरविण्यात आले होते. देशभरातील हजारो पत्रकारांतून लेखनाच्या निकषावर ही निवड करण्यात येते. याशिवाय महात्मा फुले दिनबंधू राष्ट्रीय पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा कोकण वैभव सन्मान, आदर्श बहुजन लोकसेवा गौरव, नॅशनल अमेस्टी अँँन्ड रिडम्षन आर्गनारझेशनचा राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा पत्रकार भूषण, समर्थनचा मानव हक्क वार्ता अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना यापूर्वी गौरविण्यात आले आहे. पत्रकारितेसह दिशान्तर संस्थेच्या माध्यमातून वंचितांच्या वस्त्यांवर पाणी, आरोग्य, शिक्षण, सौर कंदिल, सहकार्याचा स्नेहार्द हात, आरोग्य शिबिरे अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठया स्वरूपात काम सुरू आहे. याशिवाय आतबट्ट्याच्या शेतीवर उतारा मिळवून देतांना सहकारातून सामुदायिक शेती, सेंद्रिय शेती, महिला शेतकऱ्यांनी केलेली शेती तसेच शेतकऱ्यांनीच पिकवायचं नि त्यांनीच विकायचं अशी दलालमुक्त शेती संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात दिशान्तर संस्थेला यश मिळालं आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयांतील 25 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मोफत क्रमिक पुस्तक पेढीला लाभ मिळवून देण्यात आला आहे. अनेक बचतगटांसाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक सक्षमीकरण साधण्यात सहकार्य व यंत्र, मंत्र व तंत्र देण्यात दिशान्तर संस्थेचे अध्यक्ष या नात्याने श्री. राजेश जोष्टे यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.
मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे राज्यशासनातर्फे दिला जाणारा पत्रकारितेतील सर्वात प्रतिष्ठेचा हा सन्मान आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व 51000 /- असे त्याचे स्वरूप आहे. खऱ्या अर्थाने हा कृतीयुक्त पत्रकारितेचा स्पर्धा सन्मान असल्याची भावना सर्वदूर व्यक्त करण्यात येत आहे. श्री. जोष्टे यांचे अभिनंदन होत आहे.
त्यांचे अभिनंदन महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर व राज्य कार्यकारणी व सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, जिल्हा व तालुका कार्यकारणी व सदस्य यांनी सोशलमिडीयावर अभिनंदनाचा वर्षाव केला.