*वाचन प्रेरणा दिवस : एका दिवसाची प्रेरणा?*
15 ऑक्टोबर हा दिवस आपण गेल्या काही वर्षांपासून वाचन प्रेरणा दिवस किंवा वाचन दिवस म्हणून साजरा करतो. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी म्हणजेच 15 ऑक्टोबर या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून 'वाचन प्रेरणा दिवस' साजरा केला जातो. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, वाचनाचे महत्व समजावे, शाळा-महाविद्यालयातील अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. फक्त अभ्यास एके अभ्यास न राहता अवांतर वाचनही महत्वाचे आहे, अवांतर वाचनाचे अनेक फायदे आहेत. अवांतर वाचनाने आकलन शक्ती वाढते, अनेक संदर्भ मिळतात, सामान्य ज्ञान वाढते आणि सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. या सर्व उद्देशातून वाचन प्रेरणा दिन महत्वाचा ठरतो.
वाचनाचे अनेक फायदे मोजून सांगितले जातात, वाचनाचे महत्व पदोपदी पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो, आणि त्याच उद्देशातून 15 ऑक्टोबर या दिवशी सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो, परंतु या दिवसाचा खरच फायदा होत असेल ? अंशतः हा दिवस साजरा करण्याचा फायदा होतही असेल परंतु जेवढ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे तेवढ्या प्राणावर तो फायदा होत नाही. आजच्या काळातील वाचनाबद्दलची असलेली उदासीनता स्पष्टपणे दिसून येते.
आजची पिढी हि इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या मोहजाळात अडकलेली आहे असे म्हणण्यास काही हरकत नाही. दिवसातील कित्येक तास मुलं इंटरनेटवर भ्रमण करत असतात, दिवसातील कित्येक तास मुलं स्मार्ट फोन हाताळण्यात व्यस्त असतात अशी मुले खरंच वाचन करत असतील का? किंवा या मुलांवर वाचन प्रेरणा दिनाचा काही परिणाम होत असेल का ? काही लोक म्हणतात आजची पिढी स्मार्ट आहेत, ते ई-बुक्स, ई-साहित्य वाचतात, वाचतही असतील परंतु फक्त एक दोन टक्के बाकी इतरांचे वाचनाकडे लक्ष नसते.
स्मार्ट फोन आणि इंटरनेटच्या मोहजाळात अडकलेली पिढी सुरवातीपासूनच वाचनापासून दूर गेलेली आहे, आणि इतर गोष्टींमध्ये गुरफटलेली आहे दिवसातील कित्येक वेळा ते स्मार्टफोन आणि इंटरनेटवर घालवत आहेत अशातच कोरोनामुळे शिक्षण व्यवस्था ऑनलाईन सुरु आहे त्यामुळे मुलांचा स्मार्टफोन आणि इंटरनेट वापराचा वेळ अजूनच वाढत चाललेला दिसत आहे. अशा पिढीला या सर्व गोष्टींतून बाहेर काढून वाचनास प्रवृत्त करणे म्हणजे तारेवरची कसरतच आणि अशा पिढी साठी केवळ एक दिवस वाचन प्रेरणा दिवस साजरा करून त्यानं वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे जरा विचित्रच.
हा एक दिवस वाचन प्रेरणा दिन साजरा करून बाकी वर्षभर स्वस्थ बसने आणि पुढच्या वर्षी पुन्हा एका दिवसासाठी वाचन प्रेरणा दिवस साजरा करणे योग्य नाही. केवळ शिक्षण विभागाचे आदेश येतात किंवा शासनाचे फतवे निघतात म्हणून वाचन प्रेरणा दिन एका दिवसापुरता साजरा करण्यात काही अर्थ नाही.
मुलांमध्ये खरोखर वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयोग आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे. केवळ एका दिवसाच्या प्रयत्नांनी मुले प्रेरित होतील असे जर वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे. वर्षातील केवळ एक दिवस साजरा करून स्वस्थ न बसता वर्षभर, ३६५ दिवस विविध प्रयोग आणि प्रयत्नांच्या माध्यमातून मुलांना वाचनाकडे घेऊन जाणे, वाचनास प्रवृत्त करणे आणि त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणे हीच खरी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली ठरेल.
*प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे*
(ग्रंथपाल) श्रीरामपूर.
९७६५९७२१०८
