Halloween party ideas 2015

जागतिक साक्षरता दिवस
प्रतिवर्षी ८ स्पटेंबर या दिवशी "जागतिक साक्षरता दिवस" साजरा केला जातो.आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास आणि त्यातून शांतता आणि सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या युनेस्कोने शिक्षणाचे ,साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सष्टेंबर हा दिवस "जागतिक साक्षरता दिन" म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर १९६५ रोजी झाला. आणि ८ स्पटेंबर १९६६ पासून जगभरात "जागतिक साक्षरता दिवस" साजरा केला जाऊ लागला.निरक्षर लोकांना साक्षरतेची संधी मिळावी हा त्यामागचा युनेस्कोचा उद्देश आहे.जगभरातील शैक्षणिक अनुशेष दूर करण्याचा हा एक प्रकारे संकल्पच होता.
निरक्षरता हा मानवाच्या जीवनातील सर्वात मोठा अभिशाप आहे. साक्षरता म्हणजे फक्त वाचन - लेखन करता येणे किंवा पदवी संपादन करणे नाही तर लोकांचे हक्क, अधिकार, कर्तव्यांची जाणीव, कौशल्य विकास, समाजात विकासाकरिता योगदान देण्याची भावना निर्माण करणे म्हणजे साक्षरता आहे. महिला आणि पुरुषांमध्ये समानता आणण्याचे महत्त्वाचे काम या साक्षरतेमुळे झाले. देशाच्या सर्वागीण विकासासाठी साक्षरता एक मुख्य आधारशिला आहे. गेल्या काही काळात भारतातही साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे,परंतु ते समाधानकारक नाही आहे.साक्षरतेच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी आणि नागरिकांचा आत्मविश्वास वाढावा यादृष्टीने भारत सरकारने ग्रामीण आणि शहरी भागात वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.त्यात सर्व शिक्षा अभियान, सम्रग शिक्षा अभियान,माध्यान्ह भोजन योजना, प्रौढ शिक्षा योजना ,राजीव गांधी साक्षरता मिशन या योजनांचा प्रामुख्याने समावेश आहे.
पूर्वीच्या काळी निरक्षर लोकांची संख्या जास्त होती. आणि त्यातच सावकाराकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात असे. हे सावकार या लोकांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्या अंगठयाचे ठसे घेऊन जमिनी, आर्थिक मालमत्ता हडप करत असे. पुढे सरकारकडून सावकारांवर बंधने आली आणि या अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसला. परंतु निरक्षरतेमुळे अशा समाजाची वाढ खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असताना ही असा निरक्षर समाज पारंपरिक व्यवहारांमध्ये गुंतून पडला,त्यामुळे त्यांचे आर्थिक प्रगतीचे मार्ग खुंटले.बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यावर भीक मागणारे अनेक लहान लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली.
"एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं" असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणत असे. स्त्री शिक्षणाचा पाया घालण्याचे श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आहे.
साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही ? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नाही. तर मानवी प्रगतीच्या वाटयात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.गरिबीचे उच्चाटन,बालमृत्यू, लोकसंख्या वाढ, स्त्री-पुरुष समानता,शांती आणि प्रजासत्ताक धोरण या समाज उन्नतीशी निगडित बाबींच्या मुळाशी शिक्षण आहे, जर त्याचा प्रसार झाला तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.
युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला निगडित दैनंदिन बाबींविषयी लिहिता-वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे,व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वतःच्या
व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.
दुदैवाची गोष्ट अशी आहे की जगभरात ७७ हजार कोटीहून जास्त किंवा त्यातील बरीच मुले नियमित शाळेत जाऊ शकत नाही,किंवा काही कारणास्तव त्यांना शाळा अर्धवट सोडावी लागते.जगातील ३५ देशात तर साक्षरतेचे प्रमाण ५० टक्कयांपेक्षा ही कमी आहे.त्यात पुन्हा स्त्रियांचा वाटा दोन टक्के आहे.इ.स .२००० पासून राष्ट्रकुलाने चार कलमी कार्यक्रम हाती घेऊन निरक्षरतेवर मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
१) सकलांना शिक्षण
२) सहस्त्रकाच्या प्रगतीचे एक उद्दिष्ट.
३) राष्ट्रकुलाचे साक्षरता दशक.
४) राष्ट्रकुलाचे शिक्षण आणि प्रगतीचे एक सातत्य राखण्याचे दशक.
या कार्यक्रमांतर्गत विविध देशांची सरकारे साक्षरता प्रसारासाठी कटीबद्ध झाली आहेत.आपल्या देशात" केरळ "हे एकमेव राज्य असे आहे तेथे साक्षरतेचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे.
आज प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आपल्या अशिक्षित देशबांधवांना साक्षर करण्यासाठी सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी स्तरावर जे प्रयत्न सुरू आहे त्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हातभार लावणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य ठरते आणि जर हे प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी म्हणून केले तर देश खऱ्या अर्थाने साक्षर होईल.

लेखिका
प्रा.अमिता कदम
Venus World School
हडपसर ,पुणे.
9819395788.


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.