अधिवेशनात नाही मांडता आले तरी शासन दरबारी पाठपुरावा सुरूच ठेवणार- आमदार अनिल पाटील.
प्रतिनिधी अमळनेर-
कोरोनाच्या सावटाखाली दोन दिवसांचे अधिवेशन पार पडले मात्र प्रश्न मांडता आले नाही तरी केवळ अधिवेशनात प्रश्न मांडून सुटतात असे नव्हे तर सरकार पक्षाचा आमदार या नात्याने जळगाव जिल्ह्यातील विविध प्रश्न आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून आपण सिंचन प्रकल्प आरोग्य या प्रश्नांना तडीस नेणार आहोत. त्यामुळे अधिवेशनात मुद्दे मांडता आले नाहीत ही खंत भासणार नाही.
अमळनेर तालुक्यातील पांझरा माळण नदीजोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून त्याला या पाच वर्षात आपण तडीस नेणार असुन त्यासाठी आपले प्रयत्न निरंतर सुरू आहेत. तो प्रकल्प आपण सिंचन असो की इतर खात्यांच्या माध्यमातून सोडवणार आहोत याबाबत सर्वेक्षण पूर्ण झाले असून पाणी सौर माध्यमातून उचलावे की विद्युत याबाबत विचार सुरू असून गुरुत्वाकर्षण पद्धतीने येईल का याबाबत देखील विचार सुरू आहे.
धुळे पांझरा नदी ते मोहाडी अथवा जवखेडा या भागातून हे पाणी माळण पर्यंत पोहचणार आहे बंदिस्त जलवाहिनीद्वारे हे पाणी आणून माळण पर्यंत सोडण्यात येईल हा एक पर्याय तर उघड्या चारीतून आणावे असा एक पर्याय आहे. यातील दोन्ही पर्यायांची पडताळणी हा प्रश्न सोडवला जाईल जेणेकरून अर्धा तालुका दुष्काळ मुक्त होऊ शकेल तसेच
बोरी नदीवरील अमळनेर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खाटेश्वर बंधारा व कोळपिंप्री फाफोरा परिसरातील दोन बंधारे तसेच पांझरा नदीवरील बाह्मणे येथील फुटलेला बंधारा दुरुस्ती या कामांचा देखील सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निकड ठरलेल्या ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा रुग्णालयात दरजोन्नती रूपांतर कामाला देखील पाठपुरावा सुरू असून 30 ऐवजी 50 खाटांचे सुसज्ज रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे, लवकरच याला मंजुरी प्राप्त होऊन सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय अमळनेरकरांच्या सेवेत रुजू होईल. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत देखील ऑक्सिजन युक्त सर्व खाटा तयार करण्याचे आपले नियोजन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित अमळनेर तालुक्यातील 52 गावांना अतिवृष्टीचा निधी अद्याप प्रलंबित आहे. त्याला निधी प्राप्त झाल्याशिवाय आपण स्वास्थ बसणार नाहीत सातत्याने उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा सुरू आहे लवकरच त्या माध्यमातून आपण हा प्रश्न सोडवणार आहोत.
कोरोनाची गंभीर स्थिती असतांना त्या सावटाखाली अधिवेशन पार पडले मात्र अधिवेशनात प्रश्नोत्तरे न झाल्यामुळे हे महत्वाचे प्रश्न सोडवता आले नसले तरी आपण शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. व या सर्व महत्वाच्या प्रश्नांना तडीस नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.