Halloween party ideas 2015

*चिमठाणे जि.धुळे ब्रिटिश खजिना लूट प्रकरण-क्रांतीस्मारक एक शोध*
-प्रवीण महाजन,पुणे

-दीर्घकाळ चाललेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतिकारी चळवळीला महत्वाचे स्थान आहे.अगदी खांदेशातील चिली नाईकांच्या सशस्त्र उठावापासून शहिद शिरीशकुमार मेहतांचे बलीदान आजही देश विसरू शकत नाही.तत्कालीन इंग्रज काळात भोळाभाबड्या जनतेचा म्हटला जाणारा खांदेश देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून तब्बल दीडशे वर्षापासून आग्रही होता. व त्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी होऊन खांदेशातील तत्कालीन क्रांतिकारक नेत्यांनी इंग्रजाबरोवर शेवटपर्यन्त संघर्ष चालू ठेवला.प्रखर संघर्षाने अखेर स्वातंत्र्य प्राप्त करून घेतले.असाच एक स्वातंत्र्यलढ्यातील संघर्ष आणि संघर्षाचे राष्ट्रीय प्रतीक धुळे-दोंडाईचा रस्त्यावरील चिमठाणे गावाजवळील साळवे फाट्यावर पाहायला मिळते.
महात्मा गांधींजीची 'चले जावं'चळवळ संपूर्ण देशभरात जोमाने चालू होती. सातारा प्रतिसरकारमध्ये क्रांतीसिह नाना पाटील यांनी 'प्रतिसरकार चळवळ'प्रभावी ठरत होती. याच प्रतिसरकारमधील स्वातन्त्र्यसैनिकांनी खानदेशातील क्रांतिकारक विष्णुभाऊ पाटील यांना आवाहन केले की'पश्चिम खानदेशातिल क्रांतिकारकांनी ब्रिटिश खजिना लूटला तर पत्री सरकारमधील हवे तेव्हढया संख्येने कार्यकर्ते पुरविण्यात येतील.' त्यामुळे विष्णुभाऊ पाटील(रा.कापडणे) यांना हुरूप आला आणि त्यांनी धुळे जिल्ह्यातील खजिना लूटणयाचा बेत आखला.याकामी शिवराम पाटील, दमयंतीबाई गुरव, व्यंकटरावअण्णा धोबी(रा. बोराळी ता. शिरपुर),शंकरराव माळी, राम माळी (रा. शिरपुर),डॉ.उत्तमराव पाटील,अप्पादाजी पाटील,रावसाहेब शेळके,यशवंतराव पाटिल(रा.जुणवणे),सखाराम शिंपी(रा. शहादा),नरोत्तमभाई पटेल,माणिक भील(रा. प्रकाशा जि. नंदूरबार),फकीरा पाटील,केशवराव वाणी(रा. वडजाई ता. धुळे),मेनकाबाई नाना देवरे,रामदास पाटील(रा. देऊर ता.साक्री),झुलाल भिलाजीराव पाटिल,गोविंदभाई पाटील, वामनराव पाटिल या सैनिकांनी मदत केली तर अनेक सैनिकांनी भूमिगत राहून मदत केली.दि.१४ एप्रिल १९४४ हा दिवस अंतिम दिवस ठरवला जाऊन याच दिवशी तब्बल साडेपाच कोटी रुपये ब्रिटिश खजिना लूट योजना यशस्वी ठरली. भारताच्या इतिहासात इंग्रज सरकारला हादरा देणारा हा दिवस भारतीय स्वातंत्र्यलढयात परिणामी खानदेशच्या स्वातन्त्र्यचळवळीत 'क्रांतीदिवस'म्हणून लिहला जातो.ज्या ठिकाणी खजिना लूटला गेला हे ठिकाण'क्रांतिस्मारक'म्हणून ओळखले जाते.धुळे-दोडांईचा रस्त्यावरील चिमठाणे गावाच्या पुढे साळवे फाटयाजवळ भव्य असे क्रांतिस्मारक उभारलेले असून जाता येतांना या क्रांतिकास्मारकास आपण अभिवादन करायला हवे.देशासाठी बलिदान देणाऱ्या महान क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे म्हणून हा लेखप्रपंच..!
मार्च १९४४ च्या दुसऱ्या आठवड्यात साताऱ्याहुन नागनाथअण्णा नायकवडी, जी.डी. लाड,निवृत्ती कळके यांच्यासह १६ क्रांतिकारक बंदुकासह धुळे येथे आले. व बोरकुंड(जि. धुळे)जवळ एका शेतात त्यांनी १५ दिवस मुक्काम केला.त्यांना दयाराम पाटिल,भाऊराव पाटील हे क्रांतिकारक गोपनीय माहिती पुरवित असत.असच एके दिवशी ब्रिटिश खजिना असलेली बस धुळे येथून नंदूरबारला जाणार असल्याची बातमी या क्रांतिकारकाना मिळाली.त्यानुसार पद्धतशिररित्या खजिना लुटिचे नियोजन आखण्यात आले. दि.१४ एप्रिलच्या सकाळी ब्रिटिश खजिना घेऊन नंदूरबारला निघालेल्या बसमध्ये चालकाशेजारी खजिनदार कारकुन,मधल्या कप्यात खजिन्याच्या पेटया व मागे सुरक्षेसाठी शस्त्रधारी पोलिस बसलेले होते.क्रांतिकारक सैनिक धुळेहुन गाडीचा पाठलाग करत नियोजनबद्ध समूहाने चिमठाणे येथे आले. चिमठाणा येथे पोलिस चौकी असल्याने तिथे खजिना न लुटता आज जिथे क्रान्तिस्मारक आहे तिथे खजिना लूटण्याची योजना आखण्यात आली. दोन टोळ्या पिशव्या घेऊन पुढे गेल्या तर दोन टोळ्या चिमठाणा येथेच खजिना बसमागे थांबल्या.या टोळीमधील काही सैनिकांनी खजिना बसमधील पोलिसांना आम्हाला मालपुर (ता.शिंदखेड़ा)येथे लग्नासाठी जावयाचे कारण सांगून बसमध्ये प्रवेश मिळवला.बरोबर साडेदहा वाजता गाड़ी साळवे फाटयाजवळ चढ़ावावर (सध्या सा.बा.विभागाने हा चढाव कमी करून सरळ रस्ता तयार केला आहे) आली. बसमध्ये असलेल्या सैनिकांनी खोकला उलटीचे नाटक करत खिडकीतुन डोके बाहेर काढत उभ्या असलेल्या सैनिकांना लाल रुमाल दाखवत इशारा केला.सावध असलेल्या सैनिकांनी गाड़ी अडवत सर्व सैनिक बसवर तूटून पडले.'महात्मा गांधी की जय! वंदे मातरम!' अशा घोषणा देत तब्बल साडेपाच लाख रुपये खजिना धोतर,रुमाल पीशव्यामध्ये भरून ठरल्याप्रमाणे क्रांतिकारक सैनिक लामकानी,दोन्डाईचाकड़े पळून गेले.'वंदे मातरम, महात्मा गांधी की जय'घोषणा ऐकून ब्रिटिश खजिना बसमधील पोलिसाना हे क्रांतिकारक असल्याचे कळले.व त्यांनी तत्काळ वरिष्ठाना घटना कळवली.अनेक दिवस चाललेल्या शोधमोहिमेत काही क्रांतीकारक पकड़ले गेले.पकडलेल्या क्रांतीकारकावर गुन्हे नोंदविण्यात येऊन शिंदखेड़ा व धुळे कोर्टात केस चालविण्यात आली. तब्बल १४८ पानाच्या या निकालपत्रात १८ फेब.१९४६ रोजी व्यंकटराव रणधीर,शंकर पांडु माळी, धोड़ीराम तुकाराम माळी यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली तर विष्णु पाटील, शिवाजी सावंत यांना निर्दोष सोडून देण्यात आले.१५ ऑगस्ट १९४७ ला भारतताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र सर्व क्रांतीकारकांची आपोआप सुटका झाली.
स्वातन्त्र्यपूर्व काळात धुळे,नंदूरबार जिल्ह्याचे मोठे योगदान असून १५ऑगस्ट रोजी भारताला जरी स्वातंत्र्य मिळाले असले तरी ९ ऑगस्ट हा दिवस 'क्रांतिदिन'म्हणून साजरा केला जातो.धुळे-दोंडाईचा मार्गावरील साळवे फाट्याजवळ 'क्रांतीस्मारक'उभारले असून 'क्रांतीस्मारक समिती दोंडाईचा यांनी स्मारक सुशोभित केले आहे.इथे प्रतिकात्मक स्वरुपात खजिना पेटीची प्रतिकृती असून भव्य अशी कमान बांधण्यात आली आहे.धुळ्याहुन शहादा,नंदूरबारला कधी जाण्याचा प्रसंग आला तर नक्कीच या स्मारकाला भेट द्यायला हवी व आपल्या पूर्वजांच्या बलीदानाचे स्मरण करायला हवे.

-प्रवीण महाजन,पुणे
www.yuvakmitra.org

pravinpune123@gmail.com


WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.