Halloween party ideas 2015


सौरव गांगुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने

भारतीय क्रिकेटमध्ये जान फुंकणारा तत्कालीन कर्णधार व बीसीसीआयचा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली याचा ८ जुलै १९७२ रोजी कोलाकात्याच्या बेहाला मध्ये जन्म झाला. या घटनेला बुधवारी ८ जूलै २०२० रोजी ४८ वर्ष पूर्ण होत असल्याने सौरव गांगुलीला आपण या लेखाच्या माध्यमातून शुभेच्छा देऊया. तसेच त्याच्या क्रिकेट करिअरमध्ये घडलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपणासमोर सादर करत आहोत.
सन १९९२ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरला सुरुवात करणाऱ्या सौरवची कारकिर्द सन १९९६ मध्ये बहरली. गांगुलीने एक कर्णधार म्हणून संघ सहकाऱ्यांकडून निव्वळ सर्वोत्तम कामगिरी करवून घेतली नाही तर जगातील कोणत्याही मैदानावर जिंकण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात जागृत केला.
सौरव गांगुलीच्या क्रिकेट जीवनातील काही महत्त्वपूर्ण खेळ्यांचा उल्लेख सदर लेखात करणं मला अगत्याचे वाटल्याने त्याच्या काही वैशिष्टये पूर्ण कामगिरीचा समावेश खास आपल्या माहीती साठी करणार आहे.
सन १९९६ ते १९९८ दरम्यान कॅनडा येथे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान प्रत्येकी ५ एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळविण्यात आल्या. सन १९९७ मध्ये झालेल्या मालिकेत भारत ४-१ असा विजयी ठरला. या मालिकेत पाचही सामन्यात भारतीय खेळाडू सामनावीर ठरले. त्यापैकी हा पुरस्कार चार वेळा गांगुलीने पटकविला. त्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात सौरवने १० षटकात १६ धावा देत ४ बळी घेऊन स्वतःच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीचं पृथक्करण साधलं.
सन १९९७ मध्ये बांगलादेशच्या २५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेल्या इंडिपेंडस कप स्पर्धेच्या अंतिम सामन्या भारताची गाठ पारंपारीक प्रतिद्वंद्वी पाकिस्तानशी पडली. फायनल सामने बेस्ट ऑफ थ्री पद्धतीने खेळविण्यात आले. यातील पहिला सामना भारताने जिंकला, दुसरा पाकच्या खिशात गेला तर तिसऱ्या निर्णायक सामन्यात पाकने ४८ षटकात ३१४ धावा बनवून भारतापुढे विजयासाठी कठिण कार्य ठेवले. परंतु भारताने एक चेंडू राखून विजय मिळवत विजेतेपद पटकविले. त्या सामन्यात सौरव व रॉबीनसिंगने उल्लेखनीय खेळ केला होता.
सन २०००-०१ मध्ये सलग १५ कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ सलग विजयाचा विश्वविक्रम साधण्यास भारतावर स्वारी करून आले. मुंबईच्या पहिल्या कसोटीत त्यांनी विजयश्री खेचून तो आकडा १६ वर नेला. कोलकात्याच्या दुसऱ्या कसोटीतही भारताला फॉलोऑन बसला. परंतु फॉलोऑन स्विकारणाऱ्या भारताच्या व्हिव्हिएस लक्ष्मण व राहुल द्रविड यांच्या अविश्वसनीय विक्रमी खेळामुळे भारताने चक्क तो सामना जिंकला व ऑस्ट्रेलियाचा सलग विजयांचा अश्वमेघ रोखला. पुढे जात चेन्नईचा तिसरा सामनाही भारताने लिलया जिंकत ऑस्ट्रेलियाला पिछाडीवरून २-१ असे लोळवून गांगुलीच्या नेतृत्वाखाली चमत्कार घडविला.
गांगुलीचे एक खेळाडू व कर्णधार म्हणून आक्रमकता जगजाहीर होती. त्याच काळात सन २००२ मध्ये लॉर्डसच्या भव्य मैदानावर नेटवेस्ट ट्रॉफीचा अंतिम सामना यजमान इंग्लंड व भारत यांच्यात खेळला गेला. इंग्लंडने जोरदार खेळ करत ३२६ धावांचं अवघड लक्ष्य भारता समोर ठेवलं. भारताची अवस्था ५ बाद १४६ अशी झाली असताना युवराज ( ६९ ) व मोहम्मद कैफ (नाबाद ८७ ) यांनी चिवट झुंज देत भारताला विजय मिळवून दिला. त्या डावात गांगुलीनेही ४१ चेंडूत ६० धावांचा कॅप्टन्स नॉक केला होता. त्या सुप्रसिद्ध विजयानंतर कर्णधार गांगुलीने टि शर्ट काढून इंग्रजांच्या नाकावर टिच्चून लॉर्डसच्या बाल्कनीत झळकवला होता. तो प्रसंग आजही मोठया चवीने चर्चीला जातो.
बंगाली माणसांसाठी दुर्गापूजा उत्सव खास महत्वाचा असतो, याला अपवाद सौरवही कसा असू शकतो ? एकदा दुर्गा विसर्जनाच्या मिरवणुकीत सौरवलाही सहभाग घ्यायचा होता, परंतु त्याच्या सरळ सहभागाने सुरक्षा यंत्रणेवर ताण पडून गोंधळ उडण्याची शक्यता असल्याने सौरवने वेगळंच डोकं चालविलं व हरभजनसिंगची पगडी घालून थेट सरदारजीच्याच वेशात मिरवणुकीच्या ट्रक मध्ये चढला. परंतु एका चाणाक्ष पोलिसाने त्याला ओळखलेच. त्यानंतर सौरवला त्या पोलिसाने खाली उतरवून त्याच्या कारमध्ये बसून मिरवणुकीत सहभागास परवानगी दिली.
सौरवचे वैशिष्टये म्हणजे तो डाव्या हाताने फलंदाजी व उजव्या हाताने गोलंदाजी करायचा. फुटबॉल वेडया बंगालमध्ये जन्मल्यामुळे सुरुवातीला त्यालाही फुटबॉलपटू बनावेसे वाटत होते, परंतु त्याचा मोठा भाऊ स्नेहाशिषमुळे तो क्रिकेटकडे वळला व हा "महाराजा" पुढे जात क्रिकेटचा "दादा"बनला.
सन १९९२ च्या त्याच्या पहिल्या दौऱ्यात ऑस्ट्रेलियात असताना त्याला वरिष्ठ खेळाडूंच्या दादागिरीलाही सामोरे जावे लागले होते. एकदा संजय मांजरेकर त्या दौऱ्यात सौरववर जाम भडकला होता. संजय सिनियर होता व त्याआधी झालेल्या विंडीज दौऱ्यात संजयने झोकदार खेळ केल्याने त्याचा रुबाब वाढला होता. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची डाळ काही शिजली नाही. त्यावेळी एका सामन्यानंतर संजयने आपल्या अपयशाला वाट मोकळी करून देत सौरववर चांगलेच तोंडसुख घेतले.
त्याच दौऱ्यात सौरवला एकही सामना खेळायला मिळाला नाही. पण दौऱ्यावर असताना तत्कालीन वलयांकीत फलंदाज दिलीप वेंगसरकर त्यांचा रूम पार्टनर होता. दिलीपच्या कर्नली धाकापुढे सौरवच्या तोंडून शब्दही फुटत नसायचे. त्यामुळे तो त्याचा समवयस्क खेळाडू सचिनच्या रूममध्ये जाऊन वेळ घालवायचा. सचिनचा रूम पार्टनर असलेला सुब्रतो बॅनर्जी हा कोलकात्याचाच असल्याने सौरवचा विरंगुळा व्हायचा परंतु ही गोष्ट वेंगसरकरला आवडत नसायची तेंव्हा वेंगसरकरने रागाच्या भरात गांगुलीला तू भारताकडून खेळण्याच्या लायकीचा नाहीस असेही सुनावले होते.
त्यानंतर सौरवने स्वतःला कणखर व मजबूत बनवत भारतीय क्रिकेटचं रूपच बदलून टाकलं. अशा या हरहुन्नरी खेळाडूला वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा देवून आपणही त्याच्या आनंदात सहभागी होऊ या !

लेखक : -
दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटरनॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल, प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com
मोबाईल. ९०९६३७२०८२.
.

    WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

    लोकप्रिय बातम्या

    महत्वाच्या घडामोडी

    Powered by Blogger.