आमदारांच्या आवाहनास प्रतिसाद देत लॉकडाऊन यशस्वी केंल्याने मानले सर्वांचे आभार
अमळनेर- गेल्या अनेक वर्षांपासून आ.अनिल पाटलांचा प्रत्येक 7 जुलैला थाटात होणारा वाढदिवस यंदा त्यांच्याच विनम्र आवाहनामुळे लॉकडाऊन होऊन घरगुती वातावरणात साजरा झाला, मात्र हितचिंतक व प्रेमींनी लॉकडाऊनचे 100 टक्के पालन करत घरूनच शुभेच्छा देऊन बंद यशस्वी केल्याने सर्वांचे आमदारांनी आभार व्यक्त केले.
गेल्या अनेक वर्षापासून मतदारसंघात प्रत्येकाशी जिव्हाळ्याचा संबंध असल्याने आमदार नसतानाही अनिल पाटील यांच्या निवासस्थानी वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देणाऱ्यांची दिवसभर रीघ लागत असे एवढेच नव्हे तर अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम देखील ग्रामिण शहरी भागात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत असत. यामुळे त्यांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक पर्वणी असायचा. यामुळे मतदारसंघाचे आमदार झाल्यानंतर अनिल पाटलांचा पाहिला वाढदिवस जंगी साजरा होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती परंतु देश व राज्यावर कोरोना सारख्या भयंकर आजाराचे संकट येऊन जनता लॉकडाऊन मध्ये त्रस्त झाल्याने आ.अनिल पाटील यांनी आपला वाढदिवसही लॉकडाऊन करण्याचा निश्चय केला होता.
अमळनेर येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अमळनेरसह तीन तालुक्यात 7 जुलै ते 13 जुलै दरम्यान कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेतला, यासाठी अमळनेर मतदारसंघाचे आमदार या नात्याने आ.अनिल पाटील यांनीही विश्वासात घेण्यात आले, खरेतर 7 जुलै रोजी आ.पाटील यांचा वाढदिवस असतांना देखील त्यांनी यात राजकारण न आणता जनतेच्या आरोग्याची काळजी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयास त्वरित मान्यता दिली, यामुळे जिल्हाधिकारी व प्रशासनाने देखील त्यांचे आभार व्यक्त केले.
आमदारांनी स्वतः आवाहन केल्याने त्यांच्या भावना कार्यकर्ते, हितचिंतक व प्रेमींनी समजून घेत कोणीही त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली नाही, अनेकांनी भ्रमणध्वनी द्वारे त्यांना शुभेच्छा दिल्यात. काही थोडीफार मंडळी विशेष प्रेम म्हणून पोहोचल्याने आमदारांनी भावना समजून घेत त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या मात्र शाल, बुके व हार कोणाचेही त्यांनी स्वीकारले नाहीत. राज्य व जिल्हाभरातील नेते आणि पदाधिकारी, सर्वपक्षीय आमदार, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी आदींनी फोनवर त्यांना शुभेच्छा कळविल्या. तर सोशल मिडीयावरील फेसबुक व व्हाट्सएपवर मात्र शुभेच्छांचा पाऊसच पडला. आमदारांनी काल आपला संपूर्ण वेळ कुटुंबियांसोबत घालवून त्यांच्यासोबत साधेपणाने वाढदिवस साजरा केला.
दरम्यान जनतेने पुढील 13 जुलै पर्यंत याच पद्धतीने लॉकडाऊन पाळत घरातच थांबावे असे आवाहन आ.अनिल पाटील यांनी केले आहे.